सायबर जनजागृती मोहिमेला गैरहजर, २ कोटींच्या फसवणुकीला पडले बळी

एक कोटी रुपये गोठवण्यात यश

सायबर जनजागृती मोहिमेला गैरहजर, २ कोटींच्या फसवणुकीला पडले बळी

सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृतीकडे दुर्लक्ष केल्याची मोठी किंमत मुंबईतील एका धातू व्यापार करणाऱ्या कंपनीला मोजावी लागली. सायबर जनजागृती सेमिनारला गैरहजर राहिलेल्या कंपनीच्या संचालकांच्या कंपनीची अवघ्या तीन आठवड्यांत तब्बल १.९९ कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. या प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी अहमदाबाद येथून एका आरोपीला अटक केली असून, फसवणुकीतील जवळपास एक कोटी रुपये गोठवण्यात यश मिळवले आहे.

ही घटना २१ आणि २२ जूनदरम्यान दक्षिण मुंबईतील लॅमिंग्टन रोड परिसरातील धातू व्यापार करणाऱ्या कंपनीत घडली. कंपनीतील एका कर्मचाऱ्याला व्हॉट्सअॅपवर कंपनीच्या संचालकांचा फोटो असलेल्या क्रमांकावरून संदेश आला. संबंधित व्यक्तीने स्वतःला संचालक असल्याचे सांगत हा त्यांचा वैयक्तिक क्रमांक असल्याचा दावा केला. त्यानंतर दुसऱ्या एका कंपनीच्या खात्यावर तातडीने १.९९ कोटी रुपये वर्ग करण्याचे निर्देश दिले.

संचालकांचाच संदेश असल्याचा विश्वास ठेवून कर्मचाऱ्याने रक्कम संबंधित खात्यात वर्ग केली. मात्र, सुमारे अर्ध्या तासानंतर संचालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेशी संपर्क साधत तातडीने १९३० सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून जवळपास एक कोटी रुपये गोठवले.

हे ही वाचा:

साई सुदर्शनचा शतकांचा सपाटा

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

गुजरातमध्ये दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आठ जणांना बेड्या

सिंधू जल करार अद्याप स्थगितच!

या प्रकरणाच्या तपासादरम्यान दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी १ जुलै रोजी अहमदाबाद येथून ध्रुव जैस्वाल (वय ३२) याला अटक केली. आरोपीने स्वतःची कागदपत्रे वापरून बँक खाते उघडण्यासाठी मदत केल्याचा आरोप असून, याच खात्यात फसवणुकीची रक्कम वळविण्यात आली होती.

तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक बाब समोर आली. फसवणूक झालेल्या कंपनीचा समावेश यापूर्वी मेटल अँड स्टेनलेस स्टील मर्चंट्स असोसिएशन आयोजित सायबर जनजागृती कार्यक्रमासाठी करण्यात आला होता. मात्र, कंपनीचे संचालक त्या सेमिनारला उपस्थित राहिले नव्हते. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात याच प्रकारच्या व्हॉट्सअॅप इम्पर्सोनेशन (बनावट ओळख वापरून फसवणूक) प्रकाराची माहिती देण्यात आली होती. सायबर पोलिसांनी नागरिक आणि उद्योग क्षेत्राला आवाहन केले आहे की, मोठ्या आर्थिक व्यवहारांपूर्वी फोनद्वारे संबंधित व्यक्तीची खातरजमा करावी. तसेच सायबर जनजागृती कार्यक्रमांना उपस्थित राहून अशा फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे.

Exit mobile version