थलपती विजय यांना अपशब्द; डीएमके आमदार जेरबंद

मुख्यमंत्री विजय यांच्यावरील वक्तव्य भोवले

थलपती विजय यांना अपशब्द; डीएमके आमदार जेरबंद

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि टीव्हीके (TVK) प्रमुख सी. जोसेफ विजय यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी डीएमकेचे आमदार आणि माजी मंत्री अनिता आर. राधाकृष्णन यांना तामिळनाडू पोलिसांनी अटक केली. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हे प्रकरण २० जून रोजी तिरुचेंदूरजवळील अथूर येथे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सार्वजनिक सभेशी संबंधित आहे. या सभेत राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या भाषणानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.

अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन राधाकृष्णन यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावताना मुख्यमंत्रीपदाचा सन्मान राखणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी राधाकृष्णन यांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामांची पाहणी करत असताना अटक केली. अथूर पोलीस ठाण्याचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोहोचले. त्यावेळी डीएमके कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध करत घोषणाबाजी केली आणि त्यांना पोलिसांच्या वाहनात नेण्यास अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अथूर पोलीस ठाण्यात नेले.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात न्यूझीलंड दौऱ्यावर

पाकिस्तानने भारताशी स्पर्धा न करता अंतर्गत प्रश्न सोडवावे!

व्हेनेझुएला भूकंपानंतर आठ दिवस ढिगाऱ्याखाली… अखेर चमत्कार!

मॅनहोल मृत्यूप्रकरणी कंत्राटदार, कर्मचाऱ्यांवर गुन्हा, चार अधिकारी निलंबित

राधाकृष्णन यांच्या अटकेनंतर डीएमकेने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पक्षाच्या खासदार कनिमोळी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना ही कारवाई “लोकशाहीविरोधी” आणि “दडपशाहीचे उदाहरण” असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून डीएमके अशा कारवायांना झुकणार नाही, असे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि प्रमुख विरोधी पक्ष डीएमके यांच्यात आधीच तीव्र राजकीय संघर्ष सुरू आहे. राधाकृष्णन यांच्या अटकेमुळे हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकरणावरून तामिळनाडूमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version