मुंबई : सायबर फसवणूक आणि ऑनलाइन गेमिंगसाठी विविध बँकांमध्ये उघडलेल्या खात्यांचा गैरवापर करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट-२ने पर्दाफाश करत टोळीच्या प्रमुखासह सहा जणांना अटक केली आहे. या कारवाईत विविध बँकांचे ६६ एटीएम कार्ड, १२ वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांची सिमकार्डे, दोन लॅपटॉप, संगणक, कलर प्रिंटर, १७ बँक पासबुक, १२२ चेकबुक, दोन पेनड्राइव्ह, ६८ कंपनी शिक्के, बँक खाते उघडण्याचे अर्ज, वीजबिले आणि कंपनी नोंदणीची कागदपत्रे असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोहम्मद शब्बीर अब्दुल करीम (४२),चिराग मोहनलाल चावडा (२९),भावेश हिर्जी महेश्वरी (२९)
रोहन मोहनलाल चावडा (२८),विशाल प्रेमजी मारू(२२),गोविंद वीरजी बुचिया (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यातील एक जण महाराष्ट्रातील आणि इतर पाच जण गुजरात राज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा:
अवघ्या १५ वर्षांत वैभव सूर्यवंशीचा इतिहास
मुंबईत पावसाचा तडाखा; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन
हर्ष फायरिंग प्रकरणात भाजप आमदार राजू कुमार सिंह दोषी
भांडूपमध्ये रस्ता खचला; टेम्पो, झाड गेले वाहून
गुन्हे शाखेच्या युनिट-२ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, माझगाव येथील एका कार्यालयातून नव्याने उघडण्यात आलेल्या बँक खात्यांची माहिती आणि सिमकार्डे गोळा करून ती सक्रिय केली जात होती. त्यानंतर ही सिमकार्डे आणि बँक खाती दुबईसह इतर ठिकाणी ऑनलाइन गेमिंग आणि सायबर फसवणुकीसाठी वापरली जात असल्याचे तपासात उघड झाले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून सहा आरोपींना अटक केली. चौकशीत या टोळीमार्फत मोठ्या प्रमाणात बँक खाती आणि सिमकार्डांचा गैरवापर होत असल्याचे समोर आले.
या प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखेच्या युनिट-२मार्फत सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने केली.
