शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची ३ लाख ६२ हजार २५३ रुपयांनी फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला सायबर पोलिसांनी चेन्नई येथून अटक केली आहे. टी. सोलोमन राजा (रा. ओल्ड पेरिनगत्तुर, जिल्हा चेंगलपट्टी, तमिळनाडू) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे आरोपीने देशभरातील विविध राज्यांत केलेल्या कोट्यवधींच्या सायबर फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आले आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जुलै २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ या काळात प्रतीक बियानी नावाच्या व्यक्तीने त्यांना ‘एशियन मार्केट सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड’चा संचालक असल्याचे भासवले. आरोपीने फिर्यादींना स्वतःच्या कंपनीच्या ‘ॲप’द्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला मोठा परतावा मिळेल असे खोटे आमिष दाखवून फिर्यादीकडून ३ लाख ६२ हजार २५३ रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
हे ही वाचा:
इन्स्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषण संबंधित जाहिरातींबाबत मेटाला नोटीस
क्रिप्टोचं ‘ब्लॅक नेटवर्क’ अमेरिकेसाठी डोकेदुखी
लोकगायिका आणि पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन
श्रद्धेचा पैसा लुटून उभारली कोट्यवधींची संपत्ती!
तपासादरम्यान, सायबर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांची पडताळणी केली. फिर्यादीची रक्कम ज्या बँक खात्यात वळती झाली होती, त्या खात्यातून आरोपीने चेकद्वारे पैसे काढल्याचे समोर आले. पोलिसांनी या खात्याचा मागोवा घेतला असता, आरोपीने बँकेत दिलेल्या पत्त्यावर तो वास्तव्यास नसल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढत चेन्नई गाठले आणि सोलोमन राजा याला बेड्या ठोकल्या.
आरोपीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलोमन राजा याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अन्य राज्यांतही फसवणुकीचे जाळे विणले होते. नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २ कोटी १ लाख ६ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय, नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर आंध्र प्रदेश, ठाणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांच्या त्याच्याविरुद्ध एकूण ३ तक्रारी नोंद आहेत.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक कपिल शिरसाठ आणि तपास पथकाने केली. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
