बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला असे पुरावे सापडले आहेत की, २०१५ मध्ये एका नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनी (NBFC) ने दाखल केलेल्या ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात त्यांनी निधीचा गैरव्यवहार केला होता.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपास आणि रेकॉर्ड केलेल्या जबाबातून असे दिसून आले आहे की, उद्योगपती दीपक कोठारी यांच्या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीकडून त्यांच्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड फर्मसाठी घेतलेले पैसे संबंधित कंपन्यांद्वारे वळवले गेले. माहितीनुसार, गुन्हे शाखा आता पैशाचा नेमका मार्ग आणि वापर शोधण्यासाठी थर्ड-पार्टी कन्सल्टंटद्वारे फॉरेन्सिक ऑडिट करणार आहे.
ऑडिटमध्ये हे निश्चित केले जाईल की, निधीचा गैरवापर कसा झाला आणि ते शेट्टी आणि कुंद्रा यांच्याशी संबंधित असलेल्या इतर कंपन्यांना, जसे की सत्ययुग गोल्ड, वियान इंडस्ट्रीज, एसेन्शियल बल्क कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टेटमेंट मीडिया यांना पैसे देण्यासाठी वापरले गेले होते का. अधिकाऱ्यांना संशय होता की, हा निधी आंतरराष्ट्रीय प्रवास, प्रसारण आणि कार्यालयीन खर्चासह व्यावसायिक खर्च म्हणून दाखवण्यात आले होते, जे बनावट असू शकतात.
यापूर्वी राज कुंद्रा याची सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली . त्यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, सुरुवातीला ६० कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते परंतु नंतर ते इक्विटीमध्ये रूपांतरित केले गेले. त्यांनी दावा केला की २० कोटी रुपये प्रसारण शुल्क, सेलिब्रिटी जाहिराती आणि इतर प्रमोशनल खर्चावर खर्च झाले. ब्रँड प्रमोशनसाठी पैसे देणाऱ्यांमध्ये कुंद्राने अभिनेत्री बिपाशा बसू आणि नेहा धुपिया यांचे नाव घेतले आणि पुरावा म्हणून त्यांचे फोटो दिले. मात्र, आर्थिक दंड वसुली मंडळाला निधीच्या प्रवाहात तफावत आढळली.
हे ही वाचा:
पुढील वर्षी ट्रम्प भारत दौऱ्यावर? काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
योग, प्राणायाम अनेक आजारांवर उपाय
बहुसंख्य भागधारक असूनही, शिल्पा शेट्टीने बेस्ट डील टीव्हीच्या जाहिरातीसाठी १५ कोटी रुपये सेलिब्रिटी फी आकारल्याचा आरोप आहे, जो कंपनीच्या खर्चात दाखवला गेला होता. कुंद्रा याने असा दावा केला की, नोटाबंदीमुळे व्यवसायाला मोठे नुकसान झाले कारण ते मोठ्या प्रमाणात कॅश-ऑन-डिलिव्हरी मॉडेलवर चालत होते, ज्यामुळे अखेर त्यांना बंद करावे लागले.







