२५ वर्षीय राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादव हिची गुरुवारी सकाळी गुरुग्राममधील घरी गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिच्या सोशल मीडियावर रिल्स बनवण्यावरून नाराज असलेल्या वडिलांनीच तिच्यावर गोळी झाडली.
ही घटना सकाळी सुमारे साडेदहा वाजता सेक्टर ५७ येथील त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर घडली.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी वडिलांनी राधिकावर तीन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी वडिलांना अटक केली. गोळीबारासाठी वापरण्यात आलेला रिव्हॉल्व्हर घरातून जप्त करण्यात आली.
पोलिस सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, राधिकाच्या वडिलांना तिच्या सोशल मीडियावर रिल्स बनवण्याची सवय आवडत नव्हती आणि त्यामुळे कुटुंबाची बदनामी होत असल्याची भीती होती. गावात गेल्यावर स्थानिक लोकांकडून होणाऱ्या टोमण्यांमुळे ते गेल्या १५ दिवसांपासून तणावाखाली होते आणि अखेरीस त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
सेक्टर ५६ पोलिस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणाले, “आम्हाला रुग्णालयातून माहिती मिळाली की २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तिला तीन गोळ्या लागल्या होत्या.”
“आम्ही तिच्या काकांची भेट घेतली, परंतु त्यांनी काही सांगितले नाही. नंतर आम्ही घटनास्थळी गेलो, तिथे समजले की वडिलांनी तिच्यावर गोळी झाडली,” असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
जेनएआय मॉडेलवरील ग्लोबल एंड-यूजर खर्च किती ?
भारत करतोय कमाल, डीआरडीओ मालामाल…
शिवनगरीतील मार्कंडेय महादेव मंदिराचे वैशिष्ट्य जाणून घ्या…
‘आत्मनिर्भर विकसित भारत’ साकार करण्याची गुरुकिल्ली कोणती
राधिका यादव ही एक प्रसिद्ध टेनिसपटू होती, जिला राज्य आणि देश पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. तिने अनेक पदके व पुरस्कार मिळवले होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका दुखापतीमुळे तिला स्पर्धात्मक खेळातून दूर व्हावे लागले.
अलीकडच्या महिन्यांत, राधिका सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर म्हणून करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करत होती. ती नेहमीच इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर रिल्स तयार करून पोस्ट करत असे.







