वाशीतील एका हॉलिडे कंपनीने हॉलिडे पॅकेजचे आमिष दाखवून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तींनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता संबंधित प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात आतापर्यंत १७ जणांची तब्बल १९ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कंपनीच्या चार संचालकांसह कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
वाशीतील गोलीजर इंटरनॅशनल हॉलिडे प्रा. लि. कंपनीने २०१७ मध्ये वाशी रेल्वे स्थानकाजवळील रियल टेक पार्ट इमारतीत कार्यालय सुरू केले होते. कंपनीने काही नागरिकांना मोबाईलवर संपर्क करून त्यांचा नंबर लकी ड्रॉमध्ये आला असून लकी ड्रॉमध्ये गिफ्ट मिळणार असल्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते.
आमिषाला बळी पडून कंपनीत गेलेल्या लोकांना कंपनीच्या सदस्यांनी देशात आणि विदेशात हॉलिडे स्कीम देत असल्याचे आणि पुढील २५ वर्षांसाठी ही स्कीम असून त्याच्या अंतर्गत वर्षातून एकदा कुटुंबासह देशात अथवा विदेशात कुठेही ट्रीपसाठी जाता येणार असल्याचे सांगितले होते. स्कीममध्येच अजूनही अनेक सुविधा देण्याचे आश्वासन नागरिकांना कंपनीकडून करण्यात आले होते.
हे ही वाचा:
बाप रे! मुंबईत ७ महिन्यांत घडले ५५० बलात्काराचे गुन्हे
लसीकरणात अमेरिकेची का झाली घसरण?
संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण
अनिल परबांच्या ‘त्या’ अनधिकृत कार्यालयावर पडणार हातोडा!
आमिषाला बळी पडून अनेकांनी कंपनीत लाखो रुपये कंपनीकडे जमा केले होते. त्यानंतर नागरिकांनी स्कीम विषयी अधिकची माहिती जाणून घेण्याकरिता कस्टमर केअरवर संपर्क साधला असता तांत्रिक कारण देऊन त्यांना टाळले जात होते. २०१९ मध्ये कंपनीचे कार्यालय एका मॉलमध्ये स्थलांतरित झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी त्या कार्यालयाला भेट देण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालय बंद होते. कंपनीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच १७ व्यक्तींनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.







