ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावर एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१६ जून) ही मुलगी एका पुरुष मित्रासह राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गोपालपूर समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. यादरम्यान काही लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी तरुणीसोबत असणाऱ्या व्यक्तीला बांधले आणि तरुणीवर आळीपाळीने अत्याचार केला. या प्रकरणी पिडीत मुलीने गोपालपूर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करताच पोलिसांनी दहा जणांना अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी (१७ जून) सांगितले.
पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ती आणि तीच मित्र रविवारी संध्याकाळी ‘राजा उत्सव’ साजरा करण्यासाठी गोपाळपूर समुद्रकिनाऱ्यावर गेले होते आणि एका निर्जन ठिकाणी बसले असताना तीन मोटारसायकलींवर सुमारे १० जण आले.
या गटाने कथितपणे दोघांचे फोटो काढण्यास सुरुवात केली आणि ते ऑनलाइन लीक करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी तरुणीसोबत असणाऱ्या तरुणावर हल्ला केला, त्याचे हात बांधले आणि महिलेला जवळच्या एका पडक्या घरात ओढून नेले, जिथे तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
या घटनेनंतर, पीडित महिला आणि तिच्या मित्राने गोपाळपूर पोलिस स्टेशन गाठले आणि घटनेची तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि घटनास्थळी भेट दिली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना ओडिशाच्या उपमुख्यमंत्री पर्वती परिदा म्हणाल्या की त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.
हे ही वाचा :
आत्मशुद्धीच्या वारीत सेक्युलरांची घुसखोरी
कामगार कल्याण योजनांचा फायदा बघा
इराणचा टॉप कमांडर अली शादमानी ठार
उद्यान अधिकाऱ्याच्या घरी बघा किती घबाड सापडलं !
“गोपालपूर समुद्रकिनाऱ्यावर एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने मला खूप दुःख झाले आहे. आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. मी या घटनेबाबत एसपींशी बोलले आहे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सखोल चौकशी आणि आवश्यक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत,” असे परिदा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
“आरोपी सर्व प्रौढ आहेत आणि त्यांची चौकशी केली जात आहे. यामध्ये इतरांचा सहभाग असू शकतो,” असे बेरहमपूरचे एसपी सरवण विवेक एम यांनी पत्रकारांना सांगितले. ते पुढे म्हणाले, पिडीत व्यक्तींची आणि सर्व संशयितांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. वाचलेल्या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







