बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संध्याकाळी ५ वाजता लोकसभेत भाषण होणार होते पण त्याआधी काही मिनिटे लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिस्थिती चिघळली आणि सत्ताधारी बाकांजवळ थेट संघर्षाची स्थिती निर्माण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सभागृहात तीव्र आरोप–प्रत्यारोप झाले.
राहुल गांधी यांनी दुसऱ्या दिवशीही आपल्या भाषणात चीनचा मुद्दा उपस्थित करत माजी लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकाचे दाखले वाचून दाखविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला लोकसभा अध्यक्षांनी विरोध केला. मात्र यानंतर खासदार निशिकांत दुबे यांनी नेहरू आणि गांधी परिवारावरील काही पुस्तकांचे दाखले देऊन विरोधकांना चिमटे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरून मग विरोधक संतापले.
हे ही वाचा:
पंतप्रधानांच्या भाषणाआधीच लोकसभा तहकूब
AI च्या भीतीने आयटीचे शेअर्स गडगडले
एलन मस्क…एकदम मस्त, ८०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती
भाजप खासदार मनोज तिवारी यांनी आरोप केला की विरोधी पक्षातील काही महिला खासदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरून पंतप्रधानांच्या आसनाजवळ गेल्या आणि वरिष्ठ मंत्र्यांनी वारंवार विनंती करूनही त्या आपल्या जागांवर परतल्या नाहीत. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पंतप्रधान सभागृहात प्रवेश करू शकले नाहीत.
“जिथे पंतप्रधान बसतात, त्या भागापर्यंत त्या गेल्या. प्रचंड गोंधळ घातला,” असा आरोप तिवारी यांनी केला. विरोधी खासदारांची देहबोली आक्रमक होती आणि त्यामुळे गंभीर सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले, इतकेच नव्हे तर “पंतप्रधानांवर हल्लाही होऊ शकला असता,” असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, विरोधी पक्षाचे खासदार घोषणाबाजी करत ‘Jo uchit lage vo karo’ असा मोठा बॅनर घेऊन सभागृहाच्या वेलमध्ये उतरल्याचे दिसून आले. या आंदोलनात तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे खासदारही सहभागी झाले. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सभागृहात उपस्थित नव्हते.
सत्ताधारी बाकांजवळ थेट आमनेसामने
या गोंधळादरम्यान, विरोधी पक्षातील काही महिला खासदार सत्ताधारी बाकांकडे सरकल्या आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याशी त्यांची जोरदार शाब्दिक झटापट झाली. ज्योतिमणी आणि वर्षा गायकवाड यांच्यासह काही खासदार दुबेंकडे पुढे जाताना दिसल्या. त्यानंतर भाजपच्या महिला खासदारही त्यांच्या दिशेने आल्या आणि क्षणिक आमनेसामने संघर्ष निर्माण झाला.
सभापतींनी कामकाज तहकूब केल्याची घोषणा केल्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला. सूत्रांच्या माहितीनुसार, सभागृह तहकूब झाल्यानंतरही काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या महिला खासदारांनी पुन्हा सत्ताधारी बाकांकडे कूच केले, पंतप्रधानांच्या आसनाच्या मागील दोन रांगांपर्यंत त्या पोहोचल्या आणि दुबे यांच्या दिशेने पुढे गेल्या.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मंत्र्यांनी खासदारांना मागे हटण्याची विनंती केली; मात्र महिला खासदार पुढे सरकत राहिल्या. अखेर काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंच्या सदस्यांना आपल्या जागांवर परतण्याचे आवाहन केले.
विरोधकांची प्रतिक्रिया
दरम्यान, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी सत्ताधारी पक्षावर पलटवार करत, पंतप्रधानांनी आंदोलनामुळे सभागृह टाळल्याचा आरोप केला.
“ते घाबरले, म्हणूनच ते सभागृहात आले नाहीत,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावरही टीका करत, ते “बुलेट ट्रेनसारखे पळून गेले,” असा टोला लगावला.
समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव म्हणाल्या की, पंतप्रधान सभागृहात येऊन त्यांचे मुद्दे ऐकतील, अशी त्यांची अपेक्षा होती. “पंतप्रधान मोदी सभागृहात येऊन बोलतील अशी आम्हालाही आशा होती, कारण वाराणसीतील मणिकर्णिका घाट पाडण्याचा प्रकार आणि अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याची तोडफोड यांसारखे मुद्दे आम्हाला मांडायचे होते,” असे त्या म्हणाल्या.







