ब्रिटनची राजधानी लंडन येथे उत्तर- पश्चिम लंडनमधील ब्रेंट परिसरातील किंग्सबरी हाय स्कूलमध्ये एक हिंसक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेच्या आवारात दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्ल्यापूर्वी तो मुलगा “अल्लाहू अकबर”च्या घोषणा देत होता. या प्रकरणाची चौकशी सध्या काउंटर टेररिझम पोलिसिंग लंडन यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी झालेले दोन्ही विद्यार्थी १२ आणि १३ वर्षांचे असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एकाला प्राधान्याने ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीला घटनेनंतर काही तासांतच दुपारी अटक करण्यात आली. हल्ल्यात वापरल्याचा संशय असलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.
संबंधित घटना शाळेच्या बेकन लेन कॅम्पसमधील विज्ञान वर्गात घडली. सायमन थियोडोरू नावाच्या एका पालकांनी सांगितले की, त्यांची ८ वर्षांची मुलगी त्याच शाळेत शिकते. त्यांच्या म्हणण्यानुसार, एक माजी विद्यार्थी शाळेत परत आला आणि त्याने एका विद्यार्थ्याला लक्ष्य केले. त्यांनी पुढे सांगितले की, दुसरा एक विद्यार्थी फायर अलार्म वाजवण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावरही हल्ला करण्यात आला.
डिटेक्टिव्ह चीफ सुपरिंटेंडंट ल्यूक विल्यम्स यांनी सांगितले, “चौकशी वेगाने सुरू असून परिस्थिती सतत बदलत आहे. या हल्ल्यामागील कोणताही संभाव्य हेतू आम्ही तपासत आहोत. मात्र, आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करता, या तपासाचे नेतृत्व आता काउंटर टेररिझम पोलिसिंग लंडनकडे देण्यात आले आहे. ते आमच्या स्थानिक अधिकाऱ्यांसोबत समन्वयाने काम करत आहेत.” ते पुढे म्हणाले, “ही घटना स्थानिक समुदाय, विद्यार्थी आणि पालकांमध्ये गंभीर चिंता निर्माण करेल, याची मला पूर्ण जाणीव आहे. आमचे अधिकारी परिसरात उपस्थित राहून सहकार्य करतील आणि कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देतील. सध्या या घटनेला दहशतवादी कृत्य म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. तपास पथक सर्व पुरावे गोळा करून संपूर्ण परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी वेगाने काम करत आहे.”
हे ही वाचा:
४४ वर्षानंतर मुंबईत भाजपाचा महापौर; रितू तावडेंनी महापौरपदाची स्वीकारली सूत्रे
जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तक प्रकरणी पेंग्विन प्रकाशनाला नोटीस
भारत अमेरिका व्यापार करारात काही महत्त्वाचे बदल
मालाडमध्ये २२ फेब्रुवारीला शरीरसौष्ठवाचा थरार
लंडन ऍम्ब्युलन्स सर्व्हिस (LAS) च्या प्रवक्त्यांनी सांगितले, “मंगळवारी दुपारी १२.४१ वाजता आम्हाला कॉल प्राप्त झाला. आम्ही घटनास्थळी ऍम्ब्युलन्स पथक, इन्सिडेंट रिस्पॉन्स ऑफिसर, एक ऍडव्हान्स्ड पॅरामेडिक, टॅक्टिकल रिस्पॉन्स युनिटमधील एक पॅरामेडिक आणि एक क्लिनिकल टीम मॅनेजर पाठवले. लंडन एअर ऍम्ब्युलन्समधील ट्रॉमा टीमलाही कारद्वारे रवाना करण्यात आले. आम्ही एकूण दोन रुग्णांवर उपचार केले. एकाला रुग्णालयात नेण्यात आले आणि दुसऱ्याला प्राधान्याने मेजर ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.”
शाळेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आज किंग्सबरी हाय स्कूलमध्ये एक गंभीर घटना घडली आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून सर्व आवश्यक प्रक्रिया पाळत आहोत. परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांशी आम्ही थेट संपर्क साधला आहे.”







