30.3 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरक्राईमनामाजुनी मतदार यादी, हातावरच्या गोंदणामुळे २४ वर्षांनी सापडली हरवलेली बहीण

जुनी मतदार यादी, हातावरच्या गोंदणामुळे २४ वर्षांनी सापडली हरवलेली बहीण

ठाणे पोलिसांच्या अवघ्या ६ तासांच्या प्रयत्नांना यश

Google News Follow

“भेटी लागी जीवा लागलीसे आस…” या संतवचनाची प्रचिती देणारी एक हृदयस्पर्शी घटना ठाण्यात घडली आहे. बालपणी कुटुंबापासून दुरावलेली आणि तब्बल २४ वर्षांपासून आपल्या रक्ताच्या नात्यांचा शोध घेणाऱ्या एका बहिणीची अखेर आपल्या भावंडांशी भेट झाली. ठाणे शहर पोलिसांच्या बाल संरक्षण कक्षाने (CPU) ‘ऑपरेशन शोध-५’ अंतर्गत केवळ सहा तासांत हा भावनिक चमत्कार घडवून आणत एका दुरावलेल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणले आहे.

सन २००२ मध्ये भारती अश्रू कदम या लहान वयात नवी मुंबईत आपल्या मामाच्या गावी आल्या असताना अचानक बेपत्ता झाल्या. त्यावेळी बेलापूर पोलिसांना त्या सापडल्या होत्या; मात्र कुटुंबीयांचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने त्यांची रवानगी बालगृहात करण्यात आली. पुढे बालगृहातच त्यांचे संगोपन झाले आणि लग्नही झाले. लग्नानंतर त्यांचे नाव जान्हवी वैभव झांबरे असे बदलले आणि त्या सोलापूर येथे स्थायिक झाल्या. त्यांना एक मुलगा आणि मुलगी असून त्यांचा संसार सुखाचा सुरू होता; मात्र बालपणी तुटलेली नात्यांची ओढ आणि आई-वडिलांची माया त्यांच्या मनात कायम सलत होती.

दोन्ही बाजूंची आठ वर्षांची धडपड

भारती गेल्या आठ वर्षांपासून आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत होत्या. दुसरीकडे, त्यांचे भाऊ विजय अश्रू कदम यांनीही आपल्या लाडक्या बहिणीचा शोध थांबवला नव्हता. बहीण दिल्ली किंवा हरयाणात असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी थेट तिथे जाऊनही शोध घेतला होता. मात्र, दोघांच्याही पदरी केवळ निराशाच पडत होती.

८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारती यांनी ठाणे शहर पोलिसांच्या बाल संरक्षण कक्षाशी (CPU) संपर्क साधून आपली व्यथा मांडली व कुटुंब शोधून देण्याची आर्त विनंती केली. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने तपास सुरू केला. जुने रेकॉर्ड्स, नवी मुंबई पोलीस, एम.ओ.बी. आणि सीबीडी बेलापूरच्या मिसिंग सेलच्या नोंदी तपासण्यात आल्या.

हे ही वाचा:

लष्करच्या वरिष्ठ कमांडरसह चार पाक दहशतवादी भूसुरुंगाच्या स्फोटात ठार

‘हिंदूंच्याच दुकानातून बिर्याणी खरेदी करा’ बंगालमध्ये लागले पोस्टर

जयशंकर यांचा इशारा शेतकऱ्यांची कसोटी |

पॉवेल, रदरफोर्डवर आयसीसीचा बडगा!

२००२ ची मतदार यादी आणि हातावरचे गोंदण!
या गुंतागुंतीच्या तपासात पोलिसांनी महाराष्ट्रातील २००२ मधील जिल्हानिहाय मतदार याद्यांची तपासणी केली. त्यात सुदैवाने भारती यांच्या भावाच्या नावाची नोंद सापडली. पोलिसांनी संबंधित भागातील बूथ लेव्हल ऑफिसरशी (BLO) संपर्क साधला. याशिवाय भारती यांच्या हातावर लहानपणी गोंदवलेले ‘भारती अश्रू कदम’ हे नाव आणि बालपणीचा फोटो तपासात अत्यंत महत्त्वाचा धागा ठरला.

व्हिडिओ कॉल अन् अश्रूंचा बांध फुटला!

तपास सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा तासांत पोलिसांनी भारती यांचे बंधू प्रकाश, विजय आणि बहीण शालिनी यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने व्हिडिओ कॉल जोडला. २४ वर्षांनंतर समोर बहिणीचा चेहरा पाहताच दोन्ही बाजूंनी अश्रूंचा बांध फुटला. भावंडांनी भारती यांना तात्काळ ओळखले. अनेक वर्षांनंतर झालेला हा पुनर्संपर्क त्या संपूर्ण कुटुंबासाठी अतिशय भावुक करणारा ठरला असून, आता लवकरच त्यांची प्रत्यक्ष भेट होणार आहे.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, गुन्हे शाखेचे सहआयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल संरक्षण कक्षाच्या श्रेणी पोलीस उपनिरीक्षक वांती शिंदे, पोलीस हवालदार तानाजी गायकवाड, महिला पोलीस नाईक तेजश्री शिरसाठ आणि महिला पोलीस शिपाई सुवर्णा यादव यांनी ही उल्लेखनीय कामगिरी फत्ते केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा