गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमधील सीमावाद धगधगत असून याचे पडसाद अनेकदा सीमावर्ती भागात उमटताना दिसतात. अशातच कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला लक्ष्य करण्यात आले असून बसमधील कर्मचाऱ्यालाही काळ फासण्यात आले आहे. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी ही मुजोरी दाखवल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र सीमेच्या लगत असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिकांवर कन्नड भाषेची सक्ती आणि कन्नड रक्षक वेदिका या कानडी संघटनेकडून मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार यामुळे मराठी भाषिक त्रस्त आहेत. याचं कार्यकर्त्यांनी आता महाराष्ट्रातील बसला लक्ष्य केले आहे. कर्नाटक हद्दीतील पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग येथे या कार्यकर्त्यांनी एसटी बसला रोखले. एसटी कर्मचाऱ्याला कन्नड येतं का असं विचारत काळ फासल आहे. बसलाही त्यांनी काळे फासले असून यामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही राज्यांमधील सीमावाद चिघळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बेंगलोर- मुंबई एसटी क्रमांक MH 14 KQ 7714 ही बस चालक भास्कर जाधव चित्रदुर्ग येथून कोल्हापूरच्या दिशेने घेऊन येत होते. यावेळी रात्री ९.३० च्या सुमारास कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी अचानक एसटी अडवली. चालकाला कन्नड येत का अशी विचारणा केली. कन्नड येत नसल्याचे सांगितल्यानंतर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चालकाला एसटीतून खाली उतरवलं आणि तोंडाला काळ फासत कन्नड येत नसेल तर कर्नाटकात येऊ देणार नाही, असा इशारा दिला. शिवाय एसटीला देखील काळं फासलं आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून सुरक्षा मिळाली नाही तर कर्नाटकात गाड्या घेऊन जाणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
हे ही वाचा :
अमेरिकेच्या एफबीआय संचालकांनी भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ!
यूएसएआयडीच्या माध्यमातून देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये परकीय हस्तक्षेपाचे अहवाल चिंताजनक
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर वादग्रस्त लिखाण; लेखकांवर दाखल होणार गुन्हा
सिनेटने मंजुरी दिलेले FBI चे भारतीय वंशाचे संचालक काश पटेल कोण आहेत?
आंतरराज्य वाहतूकीदरम्यान दोन्ही राज्यांमध्ये समन्वय असायला पाहिजे. महाराष्ट्र- कर्नाटक वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. चालक आणि वाहक यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी महामंडळ घेत असेल तर आमची अडचण नाही. मात्र, चालक आणि वाहक यांना कोणतीही सुरक्षा दिली जात नाही. दोन्ही राज्यातील संघटनात्मक आणि राजकीय वादामध्ये एसटी चालकांना आणि सर्वसामान्य घटकांना ओढलं जाते. दोन्ही राज्यातील परिवहन महामंडळाने एकत्र बसून सुरक्षिते संदर्भात निर्णय घ्यावा, जोपर्यंत आम्हाला सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत कर्नाटकमधील वाहतूक थांबवण्यात यावी, अशी भूमिका एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव उत्तम पाटील यांनी माध्यमांसमोर मांडली आहे.