भारतीय वंशाचे काश पटेल यांच्या अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन म्हणजेचं एफबीआय या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावरील नियुक्तीला अमेरिकन सिनेटने मंजूरी दिली. यानंतर काश पटेल यांनी एफबीआयच्या संचालक पदाची शपथ घेतली. मात्र, त्यांनी ज्या पद्धतीने शपथ घेतली त्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे. काश पटेल एफबीआयचे नवीन संचालक म्हणून शपथ घेण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या हातात भगवद्गीता होती. शपथ घेताना त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवला आणि नंतर शपथ घेतली. यावरून चर्चा रंगली आहे.
आयझेनहॉवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंगमध्ये अमेरिकेचे ऍटर्नी जनरल पाम बोंडी यांनी काश पटेल यांना शपथ दिली. यावेळी काश पटेल यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. काश यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. यापूर्वी अमेरिकन सिनेट कन्फर्मेशन सुनावणीत काश पटेल यांनी ‘जय श्री कृष्ण’ म्हणत अभिवादनही केले होते. काश पटेल हे या पदावर पोहोचणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत. शपथ घेतल्यानंतर काश पटेल म्हणाले की, मी अमेरिकन स्वप्न जगत आहे आणि ज्याला असे वाटते की अमेरिकन स्वप्न संपले आहे, त्याने येथेच पहावे. तुम्ही पहिल्या पिढीतील भारतीय व्यक्तीशी बोलत आहात जो पृथ्वीवरील सर्वात महान राष्ट्राच्या कायदा अंमलबजावणी संस्थेचे नेतृत्व करणार आहे. हे इतर कुठेही घडू शकत नाही.
Kash Patel is sworn into office as the ninth Director of the FBI by Attorney General Pam Bondi at The White House. pic.twitter.com/5A3p7O05jo
— FBI (@FBI) February 22, 2025
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पटेल यांच्या नियुक्तीचे कौतुक केले आणि एफबीआय एजंट्समधील त्यांच्या समर्थनाचा उल्लेख केला. ट्रम्प म्हणाले, “मला काश पटेल आवडतात आणि त्यांना नियुक्त करायचे होते याचे एक कारण म्हणजे एजंट्सना त्यांच्याबद्दल असलेला आदर. त्या पदावर काश हे आतापर्यंतचे सर्वोत्तम म्हणून ओळखले जातील. त्यांच्या नावाल मान्यता मिळणे खूप सोपे होते असे दिसून आले. तो एक कणखर आणि मजबूत माणूस आहे. त्याला स्वतःची मते आहेत.”
हे ही वाचा :
यूएसएआयडीच्या माध्यमातून देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये परकीय हस्तक्षेपाचे अहवाल चिंताजनक
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर वादग्रस्त लिखाण; लेखकांवर दाखल होणार गुन्हा
सिनेटने मंजुरी दिलेले FBI चे भारतीय वंशाचे संचालक काश पटेल कोण आहेत?
माजी मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या सेवा बंद करण्याची घोषणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पदाची निवडणुकी जिंकल्यानंतर काश पटेल यांच्याकडे एफबीआयची जबाबदारी सोपवली जाईल अशी घोषणा केली होती, यावर सिनेटने देखील शिक्कामोर्तब केले. सिनेटमध्ये झालेल्या मतदानादरम्यान काश पटेल यांना एफबीआयचे पुढील संचालक नियुक्त करण्याच्या बाजूने ५१ मते तर विरोधात ४९ मते पडली. व्हाईट हाऊसने एफबीआयचे नवे संचालक म्हणून काश पटेल यांची नियुक्ती झाल्याचे म्हणत निर्णयाचे स्वागत केले. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कायद्याचे राज्य राखण्याच्या अजेंड्याच्या अंमलबजावणीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले. एफबीआयच्या संचालकपदी सिनेटने त्यांची पुष्टी केल्यानंतर, काश पटेल यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि एजन्सीची पुनर्बांधणी पारदर्शक, जबाबदार आणि न्यायासाठी वचनबद्ध अशी करण्याचे वचन दिले.