खार परिसरात रुग्णालयातून घरी परतल्यानंतर अचानक कोसळलेल्या २४ वर्षीय नेहा गुप्ता या विवाहितेचा मृत्यू गूढ परिस्थितीत झाला आहे. अवघ्या अकरा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नेहाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करत पतीसह सासरच्या सहा जणांना अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेहा गुप्ता (२४) हिचा विवाह १६ नोव्हेंबर २०२४ रोजी खार पश्चिम येथील रहिवासी अरविंद गुप्ता (२७) याच्याशी झाला होता. अरविंद हा बँकेत नोकरीला असून, विवाहानंतर केवळ दोन महिन्यांतच नेहावर हुंड्याच्या कारणावरून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेहाचे वडील राधेश्याम गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विवाहावेळी नवरदेवाकडील मंडळींना ९ लाख रुपये रोख, १८ तोळे सोने, दोन किलो चांदी आणि घरगुती वस्तू देण्यात आल्या होत्या. तरीही त्यांनी आणखी पैशांची आणि बुलेट मोटरसायकलची मागणी केली. ती मागणी नाकारल्यानंतर नेहावर अत्याचार आणि छळ सुरू झाला.
तक्रारीत असा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे की, नेहाला हळूहळू विष देऊन ठार मारण्याचा कट सासरच्या मंडळींनी रचला होता. तिला औषध मिसळलेले अन्न देण्यात येत असल्याने ती वारंवार बेशुद्ध पडत होती. या छळामुळे तिचा गर्भपातही झाला होता, असे वडिलांनी सांगितले.
हे ही वाचा :
हाफिज सईदचा निकटवर्ती झहीर बांगलादेश दौऱ्यावर; सीमावर्ती जिल्ह्यांना दिल्या भेटी
“महागठबंधन सुधारणा करू शकते पण वक्फ कायदा रद्द करू शकत नाही”
“ट्रम्प यांची स्तुती करण्याच्या ऑलिंपिक खेळात शरीफ सुवर्णपदकासाठी आघाडीवर”
“मतदार यादी वेळेवर तयार झाली नाही तर निवडणुका होणार नाहीत, राष्ट्रपती राजवट लागू होईल”
१६ ऑक्टोबर रोजी रात्री नेहाला प्रकृती बिघडल्याने भाभा रुग्णालयात आणि नंतर कूपर रुग्णालयात नेण्यात आले. पहाटे उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला; परंतु घरी आल्यानंतर ती पुन्हा कोसळली. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. खार पोलिसांनी या प्रकरणी नेहाचा पती अरविंद गुप्ता आणि सासरच्या सहा नातेवाईकांना अटक केली असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेतील कलम ८० (हुंडा मृत्यू), कलम १२३ (विषबाधा), तसेच शारीरिक व मानसिक छळासंबंधीच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहाच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, नेहाला दीर्घकाळ मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.







