भारतीय वायुसेनेतील एका अधिकाऱ्याच्या २४ वर्षीय पत्नीच्या कथित जबरदस्ती धर्मांतर प्रकरणात नागपूर पोलिसांनी एका मौलवीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख हजरत मौलाना अशी असून त्याला मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील चौकशीसाठी त्याला नागपुरात आणण्यात आले आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत तिच्या माजी महाविद्यालयीन सहाध्यायावर आणि त्याच्या काही साथीदारांवर बलात्कार, ब्लॅकमेल, जबरदस्ती धर्मांतर तसेच कथित काळी जादू आणि धार्मिक विधी करण्याचे गंभीर आरोप केले आहेत.
या आठवड्यात हे प्रकरण अधिक चर्चेत आले, जेव्हा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिलेचा हात पकडून धार्मिक आयती वाचताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. वृत्तांनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयाज मदारे (वय २६) आणि त्याचा सहकारी अमीन शेख यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणांच्या मते, अटक करण्यात आलेल्या मौलवीने कथित धर्मांतर प्रक्रिया आणि निकाह पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
एफआयआरनुसार, ८ फेब्रुवारी २०२५ रोजी अयाजने महिलेला एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तिच्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळण्यात आले. बेशुद्ध झाल्यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ पतीला पाठवण्याची तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच तिच्याकडून सुमारे चार लाख रुपये उकळल्याचाही दावा तिने केला आहे.
महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती रडत स्वतःला सोडण्याची विनंती करत होती, तर आरोपी धार्मिक आयती वाचत होता. त्यानंतर तिचे धर्मांतर झाल्याचे सांगण्यात आले आणि पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, अयाज तिला नियमितपणे प्लास्टिकच्या बाटलीतील एक द्रवपदार्थ पिण्यास भाग पाडत होता. तो पदार्थ पिल्यानंतर आरोपी उर्दूमध्ये काही मंत्र म्हणत तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारायचा आणि त्याला संमोहन किंवा काळी जादू असल्याचे सांगायचा, असा दावाही महिलेने केला आहे.
हे ही वाचा:
वसई-विरारमध्ये खड्डे बुजवण्यासाठी ४४.९२ कोटींचा अतिरिक्त खर्च
“जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष, तोपर्यंत व्हाईट हाऊसमध्ये भारताचा एक चांगला मित्र”
अमेरिका–इराण युद्धविरामावर अधिकृत शिक्कामोर्तब; सामंजस्य करारावर झाली स्वाक्षरी
एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, ३१ मे रोजी आरोपी तिला आपल्या एका सहकाऱ्यासह कळमेश्वर येथे घेऊन गेला. तेथे हजरत मौलाना याने धार्मिक विधीदरम्यान तिच्या इच्छेविरुद्ध “कबूल है” असे म्हणण्यास भाग पाडले. त्यानंतर तिचे धर्मांतर झाल्याची घोषणा करून अयाजसोबत निकाह लावून दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. पोलिसांच्या मते, मौलवीकडून सुरू असलेल्या चौकशीत या प्रकरणासंदर्भात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
