पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फाल्टा पोलीस ठाण्यावर हल्ला करून तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांची सुटका करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी सात जणांना अटक केली आहे. या हल्ल्याचे नेतृत्व जहांगीर खान यांच्या पत्नी रेजिना बीबी यांनी केले होते. मात्र त्या सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. डायमंड हार्बर जिल्हा पोलिसांनी केलेल्या या नव्या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटकांची संख्या १५ वर पोहोचली आहे. यापूर्वी गेल्या दोन दिवसांत आठ जणांना अटक करण्यात आली होती.
माहितीनुसार, फरार रेजिना बीबी यांच्याविरोधात आता शस्त्रास्त्र कायदा १९५९ (Arms Act) आणि स्फोटक पदार्थ कायदा १८८४ (Explosives Act) अंतर्गत अतिरिक्त कलमे लावण्यात आली आहेत. फाल्टा पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याच्या आणि जहांगीर खान यांची सुटका करण्याच्या संपूर्ण कटामागे त्यांची प्रमुख भूमिका असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
माहितीनुसार, १६ जून रोजी रेजिना बीबी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल समर्थकांच्या जमावाने फाल्टा पोलीस ठाण्यात घुसून जहांगीर खान यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र घटनास्थळी तैनात असलेल्या राज्य पोलिसांनी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) जवानांनी लाठीमार करून जमावाला पांगवले आणि त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकरणातील आरोपींची चौकशी आणि तपासादरम्यान हल्ल्याचा कट एक दिवस आधीच रचण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या मते, सोमवारी एका गुप्त ठिकाणी झालेल्या बैठकीत या हल्ल्याचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान रेजिना बीबी यांनी भूषवले होते.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या बैठकीत समर्थकांनी फाल्टा पोलीस ठाण्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर एकत्र जमायचे आणि त्यानंतर संघटितपणे अचानक ठाण्यावर धाड टाकून जहांगीर खान यांची सुटका करायची, असा निर्णय घेण्यात आला होता. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत फाल्टा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार असलेले जहांगीर खान हे या परिसरातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात.
हे ही वाचा:
पाकिस्तानातील गुरुद्वारात वृद्ध शीख दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या
पोस्ट केली, नंतर एडिट केली! अमेरिका-इराण कराराबाबत घोषणेची पाकिस्तानची घाई
ठाकरे गटात भूकंप होणारच! बैठकीला ६ खासदार गैरहजर
तृणमूलचे बंडखोर आमदार ऋतब्रता बॅनर्जींचे विरोधी पक्षनेतेपद कायम!
दरम्यान, बुधवारी पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी फाल्टा येथे भेट देऊन एका जाहीर कार्यक्रमात या घटनेतील आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची मालमत्ता जप्त करून पुढे तिचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिल्याचे सांगितले जात आहे. फाल्टा पोलीस ठाण्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, फरार रेजिना बीबी यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे.
