मुंबई: लहानपणापासून असलेला दुचाकीचा मोह आणि त्याच मोहापायी ओढवलेले गुन्हेगारीचे वळण… चोरीच्या मोटारसायकलवरून खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला घाटकोपर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शंतनू राणे (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
घाटकोपर परिसरातून एक ‘युनिकॉर्न’ मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन चोरी प्रतिबंधक पथकाचे उपनिरीक्षक पांडुरंग साळुंखे आणि त्यांचे पथक गस्त घालत होते. यावेळी एका गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, एक तरुण विनाक्रमांक (नंबर प्लेट नसलेली) दुचाकी चालवत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कातोडीपाडा येथील पार्सेकर चौकात सापळा रचला. संशयास्पदरीत्या दुचाकीवरून जाणाऱ्या शंतनूला अडवून कागदपत्रांची विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी गाडीचा चेसिस नंबर तपासला असता ती गाडी घाटकोपरमधून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.
हे ही वाचा:
रिल्स स्टार ते चोर! बुलेट चोरी प्रकरणी मराठी टीव्ही मालिकेतील कलाकार अटकेत
कर्मचाऱ्यांची प्रतिभा टिकवण्यासाठी कंपनींचे स्वागतार्ह उपक्रम
चिनाब नदीवरील महत्त्वाकांक्षी धरण प्रकल्पाला वेग
विक्रमाचा चुराडा! न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा अभेद्य फॉर्म्युला फोडला
आरोपी शंतनूचे आयुष्य संघर्षाने भरलेले राहिले आहे. ठाण्यातील बाळकुम येथे राहणारा शंतनू अनाथ आश्रमात वाढला होता. त्यानंतर एका दाम्पत्याने त्याला दत्तक घेतले. मात्र, त्याला लहानपणापासूनच महागड्या गाड्यांचे प्रचंड वेड होते. केवळ फिरण्याच्या हौसेपोटी तो गाड्या चोरू लागला. हळूहळू या मोहाने त्याला सराईत गुन्हेगार बनवले. ठाणे शहरातही त्याच्यावर मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
गाड्या चोरून केवळ फिरल्याने पोट भरत नाही, हे लक्षात आल्यावर शंतनूने चोरीच्याच गाडीचा वापर रोजगारासाठी करण्याचे ठरवले. घाटकोपरमधून चोरलेल्या युनिकॉर्न गाडीची नंबर प्लेट त्याने काढून टाकली. त्यानंतर साकिनाका येथील एका हॉटेलमध्ये तो ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करू लागला. विनापरवाना आणि विनाक्रमांक गाडीवरून तो घाटकोपर, साकिनाका आणि मरोळ परिसरात बिनदिक्कतपणे खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवत होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अखेर तो जाळ्यात अडकला.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिष जाधव, पोलीस निरीक्षक शेख,यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पांडुरंग साळुंखे, अंमलदार दीपक भारती, निलेश पवार, अमोल सूर्यवंशी, अजय अहिरे आणि बाळासाहेब गव्हाणे यांचा सहभाग होता. पोलीस अंमलदार दीपक भारती या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







