अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये तब्बल ३८ दशलक्ष डॉलर (सुमारे ३२५ कोटी रुपये) किमतीच्या मेडिकेड फसवणूक प्रकरणाचा मोठा पर्दाफाश झाला असून, पाकिस्तानी-अमेरिकन औषध व्यवसायिक परवेझ सिद्दीकी यांना अटक करण्यात आली आहे. ७८ वर्षीय सिद्दीकी यांच्यावर वृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या नावाचा गैरवापर करून सरकारी आरोग्य योजनेत कोट्यवधी डॉलरची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
न्यूयॉर्क पोलिसांनी १५ जून रोजी ही कारवाई केली. सिद्दीकी यांच्यासह इतर काही आरोपींवर ब्रुकलिनमधील ‘आपना अडल्ट डेकेअर’ आणि ‘आशियाना सोशल अडल्ट डेकेअर’ या केंद्रांमार्फत फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ही योजना २०१९ मध्ये सुरू झाली होती. आरोपींनी वृद्ध आणि गरजू नागरिकांना आर्थिक प्रलोभने देऊन या डेकेअर केंद्रांमध्ये नोंदणी करण्यास प्रवृत्त केले. नोंदणी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दरमहा सुमारे ५०० डॉलर देण्यात येत होते. मात्र, या व्यक्ती प्रत्यक्षात कधीही डेकेअर केंद्रांमध्ये उपस्थित राहत नसतानाही संबंधित केंद्रांकडून मेडिकेड योजनेअंतर्गत नियमितपणे बिलांचे दावे दाखल करण्यात येत होते.
तपासात असेही समोर आले आहे की, या कथित घोटाळ्यासाठी बनावट हजेरी पत्रके तयार करण्यात आली होती. तसेच पाकिस्तानस्थित बिलिंग कर्मचाऱ्यांच्या मदतीने खोटे दावे सादर करण्यात येत होते. अधिकाऱ्यांच्या मते, मिळालेला निधी विविध बनावट कंपन्यांमार्फत वैध असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. लाभार्थींना देण्यात आलेल्या रकमा ‘भेटवस्तू’, ‘लादिन’ किंवा ‘लाडू’ अशा नावांनी नोंदवण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणात परवेझ सिद्दीकी यांच्यासह शाझिया बीबी, झेबुन अहमद, जोसना बेगम, सायरा खातून आणि अतिया शहनाज यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत. सर्व आरोपी मूळचे पाकिस्तानशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणानंतर परवेझ सिद्दीकी यांच्या राजकीय संबंधांचीही चर्चा सुरू झाली आहे. सिद्दीकी यांनी अनेकदा अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांना आर्थिक देणग्या दिल्याचे वृत्त आहे. तसेच त्यांचा संबंध अमेरिकन पाकिस्तानी पब्लिक अफेअर्स कमिटी (APPAC) या संघटनेशी असल्याचेही सांगितले जाते. या संघटनेवर अमेरिकेत पाकिस्तानसमर्थक भूमिका मांडणे आणि भारतविरोधी प्रचार केल्याचे आरोप यापूर्वीही झाले आहेत.
हे ही वाचा:
कोळसा तस्करी प्रकरणात पोलीस अधिकारी मनोरंजन मंडल अटकेत
लेबनॉनमधील हल्ल्यांमध्ये १८ जण ठार; इराण-अमेरिका शांतता चर्चा रद्द?
भारत-पाक सीमा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर
टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी कायम!
अमेरिकन तपास यंत्रणा या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, फसवणुकीचे जाळे किती मोठे होते आणि त्यात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा शोध घेत आहेत. दोष सिद्ध झाल्यास आरोपींना गंभीर आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित कठोर शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.







