अजमेर दर्गा परिसरात रविवारी एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने दर्ग्यातील प्रसिद्ध मोठ्या कढईत, म्हणजेच ‘बडी देग’मध्ये उडी मारल्याचा आरोप आहे. हा तरुण त्या कढईत पडल्यानंतर तेथील उपस्थित लोकांनी त्याला बेदम मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल होतो आहे. या घटनेनंतर दर्गा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला असून प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
प्रत्यक्षदर्शींनुसार, तरुण अचानक मोठ्या देगकडे धावत गेला. तेथील कर्मचारी आणि सेवेकरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तो देगमध्ये उडी मारण्यात यशस्वी झाला. ही संपूर्ण घटना दर्गा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. सदर तरुण हा हिंदू असल्याचा दावाही सोशल मीडियात करण्यात येत होता.
वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, त्या वेळी देगमध्ये रोख रक्कम आणि दागिने अर्पण म्हणून ठेवलेले होते. घटनेनंतर दर्गा समितीच्या कर्मचाऱ्यांनी देग परिसरात जाऊन मोठ्या प्रयत्नांनंतर त्या तरुणाला बाहेर काढले. बचावकार्यादरम्यान काही कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केल्याचाही आरोप आहे.
हे ही वाचा:
रशिया- युक्रेन यांच्यात १,००० कैद्यांची होणार अदलाबदल
NEET 2026 पेपर लीक? ‘अपेक्षित प्रश्नसंच’मधील १४० प्रश्न मूळ परीक्षेशी जुळले
“वर्क फ्रॉम होम स्वीकारा, पेट्रोल वाचवा, एक वर्ष सोने खरेदी करू नका”
असिम मुनीर म्हणतात, २०२५ चा संघर्ष ‘दोन विचारप्रणालींची लढाई’
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण मानसिकदृष्ट्या अस्थिर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याची ओळख आणि त्याने असे का केले याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कोणतीही मोठी हानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अहवाल लिहेपर्यंत कोणत्याही पक्षाकडून औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. अजमेर दर्गा समिती, स्थानिक पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.







