राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार शौकत मुल्ला यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुरुवार, ४ जून रोजी एनआयएने त्यांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यांचा मुलगा इम्रान मोल्ला याची चौकशी केली. विधानसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासाशी संबंधित ही कारवाई करण्यात आली.
एनआयएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी जीवनतला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौखाली गावात असलेल्या शौकत मोल्ला यांच्या घरावर छापा टाकला. अनेक वाहनांमधून आलेल्या अधिकाऱ्यांनी सकाळीच घराची झडती घेण्यास सुरुवात केली. केंद्रीय सुरक्षा दलाच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. एनआयएच्या छाप्यानंतर शौकत मोल्ला यांच्या पत्नी सायेर बानू मोल्ला यांनी सांगितले, “माझ्या मुलाने मला फोन केला होता. त्यावेळी मी घरी नव्हते.” दरम्यान, छाप्यामध्ये नेमके काय जप्त करण्यात आले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगर परिसरात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.
इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या पक्षाचे नेते नौशाद सिद्दिकी यांनी या प्रकरणाची एनआयएकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. तपासाचा भाग म्हणून एनआयएने शौकत मोल्ला यांचे निवासस्थान तसेच पक्ष कार्यालयावरही छापे टाकले. माहितीनुसार, एनआयएचे अधिकारी पोहोचण्यापूर्वीच शौकत मोल्ला घरातून निघून गेले होते. यापूर्वी एनआयएने या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासादरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते वाहिदुल इस्लाम यांच्यासह अनेकांना अटक केली होती.
हे ही वाचा:
केरळमध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ जिम; नेमकं प्रकरण काय?
भारत-बांगलादेश सीमेवर दक्षिण त्रिपुरात ३४ किलो गांजा जप्त
बिहारच्या रुग्णालयात आग; चार जण दगावले
आग पाहून घटनास्थळावरून पळ आणि अग्निसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याचे कबूल
शौकत मोल्ला हे कॅनिंग पूर्व विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे आमदार होते. २०१६ आणि २०२१ या दोन सलग निवडणुकांमध्ये ते या मतदारसंघातून विजयी झाले होते. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना आयएसएफचे उमेदवार नौशाद सिद्दीकी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. शौकत मोल्ला यांना तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाते. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात अभिषेक बॅनर्जी यांचे संघटनात्मक आणि राजकीय वर्चस्व मजबूत करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते.







