मालवणी चर्च येथे विवस्त्र अवस्थेत मिळून आलेल्या वारांगनेच्या हत्येप्रकरणी रिक्षाचालकाला मेरठ शहरातुन अटक करण्यात आली आहे. पैशांच्या वादातून रिक्षातच वारांगनेची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर मृतदेह झाडीत फेकल्याची कबुली आरोपी रिक्षा चालकाने दिली आहे.
चंद्रपाल रामखिलाडी उर्फ नेता (३४)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.चंद्रपाल हा मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील किरोली आग्रा येथे राहणारा आहे. काही वर्षांपूर्वी तो मुंबईत नोकरीच्या शोधात आला होता. मुंबईतील मालाड येथे तो काही गाववाल्यासोबत राहत होता आणि मालाड मालवणी परिसरात भाड्याची रिक्षा चालवत होता.
२५ सप्टेंबर रोजी मालाड मालवणी चर्च, मार्वे रोडवरील सावंत कंपाउंड परिसरातील झाडीत एका महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असता मृत महिला ही मालवणी परिसरात राहण्यास असून ती पूर्वी बियरबार मध्ये नोकरी करीत होती, त्यानंतर तिने वेश्याव्यवसाय पत्करला होता.महिलेला एक १३ वर्षाची मुलगी असून मुलगी बळीत महिलेच्या भावासोबत राहण्यास आहे.
हे ही वाचा:
लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधी दक्षिण अमेरिकेत दाखल
बरेलीमध्ये मौलाना मोहसीन रझा यांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई!
पुरुषांमध्ये मधुमेह ओळखण्यास उशीर लागतो
तेल टँकर मधून गोतस्करी, २० गायींची सुटका, चालक फरार!
तपासासाठी १२ जणांचे पथक….
परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त यांनी हत्येच्या तपासासाठी मालवणी पोलिसांसह १२ पथके तयार केली होती.तपास पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एका सीसीटीव्ही पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. तपास पथकाने एका संशयित रिक्षाचा शोध घेतला असता सदर रिक्षा हा चंद्रपाल उर्फ नेता हा भाडेतत्त्वावर चालवत होता व मागील काही दिवसांपूर्वी त्याने रिक्षा मूळ मालकाकडे जमा करून बेपत्ता झाला होता. पोलीस पथकाने चंद्रपालचे उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी शोध घेतला,परंतु तो गावी आलाच नसल्याची माहिती समोर आली.
यूपीआय अँप वर मागवले पैसे…..
चंद्रपाल याने एका अनोळखी क्रमांकवरून आईला कॉल केला होता आणि त्याच मोबाईल क्रमांकाच्या यूपीआय आयडी वर खर्चासाठी १ हजार रुपये मागवले होते, आईने गावातील एका व्यक्तीच्या मोबाईलवरून एक हजार रुपये पाठवले. तपास पथकाने यूपीआय आयडीचा शोध घेतला असता तो यूपीआय आयडी मेरठ मध्ये गॅस एजन्सीत काम करणाऱ्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले.पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चंद्रपाल राहत असलेल्या ठिकाणी घेऊन आले, त्या ठिकाणी चंद्रपाल सापडला. पोलिसांनी चंद्रपाल याला ताब्यात घेऊन मुंबईत आणले आणि त्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती मालवणी पोलिसांनी दिली.
पैशांवरून झाला होता वाद…..
अटक करण्यात आलेल्या आरोपी चंद्रपाल याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता,२४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास तो मालवणी येथील बसथांब्याजवळ वेश्याव्यवसाया साठी उभी असलेल्या बळीत महिलेला त्याने विचारले असता तिने त्याला ६०० रुपये सांगितले.त्याने तिला रिक्षात बसण्यास सांगून कच्चा रोड येथे एका निर्जन ठिकाणी घेऊन आला, त्या ठिकाणी चंद्रपाल रिक्षातच भरपूर मद्यप्राशन केले, त्यानंतर त्याने बळीत महिलेसोबत रिक्षातच संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र जास्त प्रमाणात मद्यप्राशन केल्यामुळे वैतागून बळीत महिलेने त्याच्याकडे ठरलेल्या पैशांची मागणी केली असता त्यांच्यात वाद झाला.या वादातून चंद्रपालने बळीत महिलेच्या गळ्यात असलेल्या ओढणीने तीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह झाडीत टाकून तेथून पोबारा केला.







