फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये भरदिवसा घडलेल्या धक्कादायक चाकूहल्ल्याने खळबळ उडाली आहे. पॅरिसमधील पोर्त द क्लिशी परिसरात, पॅरिस न्यायालयाजवळ एका व्यक्तीने दोन मोठ्या स्वयंपाकघरातील चाकू घेऊन तीन महिलांवर हल्ला केला. हल्ल्यानंतर संशयिताने “अल्लाहने मला हा हल्ला करण्याचा आदेश दिला,” असा दावा केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, फ्रेंच प्रशासनाने अद्याप या हल्ल्याला दहशतवादी कृत्य म्हणून घोषित केलेले नाही.
हल्ला सोमवारी सकाळी घडला. संशयिताने रस्त्यावर चालणाऱ्या महिलांना लक्ष्य करत अचानक चाकूने वार करण्यास सुरुवात केली. जखमी झालेल्या महिलांचे वय अनुक्रमे १९, २४ आणि ३६ वर्षे असून त्यापैकी एक महिला गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून तिघींनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत संशयिताला रोखण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने त्याच्यावर सूटकेस फेकून त्याच्या हातातील चाकू खाली पाडला, तर इतरांनी खुर्चीच्या मदतीने त्याला जमिनीवर दाबून ठेवले. त्यानंतर तेथून जात असलेल्या ड्युटीबाहेरील एका पोलिस अधिकाऱ्याने संशयिताला ताब्यात घेतले. या धाडसी कृतीचे फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट न्युनेझ यांनी कौतुक केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संशयिताच्या हातात दोन मोठे चाकू दिसत असून, त्यानंतर नागरिकांनी त्याला पकडल्याचे दृश्यही कैद झाले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, संशयिताने “अल्लाहने मला आदेश दिला” असे सांगितले. मात्र, अटकेवेळी तो विस्कळीत आणि असंबद्ध बोलत असल्याने त्याचा नेमका हेतू काय होता, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
हे ही वाचा:
कीर्तनकार, हिंदुत्ववादी कार्यकर्त्या क्रांतिगीता ताई महाबळ यांचे निधन
‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटवा! रेड बुलपासून पेप्सीपर्यंत सर्वांनाच नवे नियम
ब्रांझपदकविजेत्या पॅरा पॉवरलिफ्टर झंडूकुमारला १० लाखांचे इनाम
बँक ऑफ बडोदामध्ये सायबर घुसखोरी; कर्मचाऱ्याचे ई-मेल हॅक
फ्रेंच पोलिसांनी संशयिताला अटक केली असून त्याने सुरुवातीला खोटी ओळख सांगितल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय दहशतवादविरोधी अभियोक्ता कार्यालय (National Anti-Terrorism Prosecutor’s Office) या प्रकरणावर लक्ष ठेवून असून, या हल्ल्यामागे दहशतवादी हेतू होता का किंवा मानसिक अस्थिरतेचा संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. सध्या पॅरिस सरकारी अभियोक्ता कार्यालय या प्रकरणाचा तपास करत आहे.







