पश्चिम बंगालमधील हावडा येथे झालेल्या खळबळजनक गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तीन मुख्य आरोपींना मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या कक्ष-६ च्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. हे आरोपी मुंबईत आपली ओळख लपवून राहत होते.
७ मे रोजी पश्चिम बंगालमधील हावडा येथील शिबपूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर या घटनेतील मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपी फरार झाले होते. हे आरोपी मुंबईतील देवनार भागातील एकता एसआरए बिल्डिंगमधील एका खोलीत नाव व अस्तित्व लपवून राहत असल्याची खात्रीलायक माहिती २१ मे २०२६ रोजी गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे कक्ष-६ च्या पथकाने तांत्रिक आणि मानवी कौशल्याचा वापर करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी या गुन्ह्यातील आपला सहभाग कबूल केला आहे.
हे ही वाचा:
इराण पुन्हा लष्करी ताकद उभी करतंय; ड्रोन उत्पादनाला वेग
बंगळुरूत एअर इंडियाच्या विमानाला ‘टेल स्ट्राइक’
मेलोनीने मेलोडी खाल्ली, राहुल गांधी का पिसाळले?
लिपस्टिक बनवणाऱ्या ‘नायका’ची दमदार कमाई
अटक करण्यात आलेले आरोपी शमीम अहमद अब्दुल रशीद (वय ४० वर्ष, रा. जी.टी. रोड, शिबपूर, हावडा, पश्चिम बंगाल)
जमील अख्तर अली (वय ४३ वर्ष, रा. काबीज घाट रोड, शिबपूर, हावडा, पश्चिम बंगाल), अफताब अनवर खुर्शीद अनवर (वय ४४ वर्ष, रा. घाट रोड, शिबपूर, हावडा, पश्चिम बंगाल) हे
पाचहून अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार होते.
त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता भारतीय हत्यार कायदा आणि स्फोटक पदार्थ अधिनियमाच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंद आहेत. शिबपूर पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले असून, आरोपींचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही धडक कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी पूर्व) निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कक्ष-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पो.नि. सुशांत सावंत, पो.उ.नि. संदीप रहाणे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
