पाकिस्तानात पुन्हा एकदा एका अज्ञाताने केलेल्या हल्ल्यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यातील एक सूत्रधार, ज्यामध्ये ४० हून अधिक सीआरपीएफ जवान शहीद झाले होते, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ठार केले. ‘डॉक्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलवामा येथील रहिवासी हमजा बुरहानला केंद्रीय गृह मंत्रालयाने २०२२ मध्ये दहशतवादी म्हणून घोषित केले होते.
बुरहान, ज्याचे मूळ नाव अर्जुमंद गुलजार दार आहे, त्याच्यावर मुझफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला, ज्यात तो अनेक गोळ्या लागून जखमी झाला. गेल्या महिन्यांत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अनेक घोषित दहशतवाद्यांना अशाप्रकारे ठार करण्यात आले आहे.
हमजा बुरहान कोण आहे?
पुलवामाच्या रत्नीपोरा भागातील खरबतपोरा येथे जन्मलेला बुरहान, उच्च शिक्षणाच्या बहाण्याने २०१७ मध्ये पाकिस्तानला गेला. मात्र, तो अल-बद्र या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि लवकरच त्या संघटनेत कमांडर पदापर्यंत पोहोचला. तो नंतर काश्मीरला परतला आणि तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात गुंतला. दक्षिण काश्मीरमध्ये, बुरहानने आपले जाळे पुलवामापासून शोपियानपर्यंत विस्तारले.
बुरहानचा संबंध जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांशी जोडला गेला आहे, ज्यामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याचाही समावेश आहे. पुलवामा घटना ही जैश-ए-मुहम्मद (JeM) या संघटनेने भारतात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर केलेला सर्वात प्राणघातक हल्ला होता. जैश-ए-मुहम्मदच्या एका दहशतवाद्याने लेथपोरा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली कार घातली, ज्यात ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यामुळे काही दिवसांनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला.
हे ही वाचा
सेलबोट मॉडेल ते ऑर्किड पेपरवेट; नॉर्वेच्या सर्वोच्च नेतृत्वाला दिल्या खास भेटवस्तू
टागोरांचे पुस्तक ते लोकटक टी; स्वीडनच्या पंतप्रधानांना मोदींनी काय दिल्या भेटवस्तू?
पंतप्रधान मोदींकडून मेलोनींना ‘शिरुई लिली सिल्क स्टोल’ची भेट
महेश्वरी सिल्क ते मेघालयातील अननस; पंतप्रधान मोदींकडून युएई नेतृत्वाला खास भेट
सुरक्षा यंत्रणांनी सांगितले की, बुरहानने पुलवामा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना स्फोटके आणि ग्रेनेड पुरवले होते. १८ नोव्हेंबर २०२० रोजी सीआरपीएफ जवानांवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातही त्याचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. बुरहानचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू करण्यात आली, पण तो निसटून पुन्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये परतला. अखेरीस अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा खात्मा केला आहे.
