राजस्थानमध्ये मोठा वाद उसळला आहे, कारण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये हिंदू विद्यार्थ्यांना सकाळच्या प्रार्थनेदरम्यान कलमा पढायला लावले जात असल्याचे दिसते. कोट्यातील बक्षी स्प्रिंगडेल्स स्कूलमध्ये ही घटना घडली असून, यामुळे हिंदू संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. संघटनांनी शालेय व्यवस्थापनावर कारवाई न झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना इस्लामिक श्रद्धावाक्य कलमा म्हणताना दाखवले आहे. मात्र, शाळेच्या प्रशासनाने सांगितले की हा व्हिडिओ अनेक वर्षांपूर्वीचा असून तो वार्षिक समारंभादरम्यान रेकॉर्ड करण्यात आला होता.
शाळेच्या संचालकांनी सांगितले की, गेल्या ३० वर्षांपासून या शाळेत “सर्व धर्म प्रार्थना” पद्धत चालू आहे, जिथे सर्व धर्मांच्या प्रार्थना म्हणविल्या जातात. संचालकांनी असेही सांगितले की, ते स्वतः नेव्हीमधून निवृत्त झाले आहेत आणि त्यांचे वडीलही आर्मीमध्ये होते व तीन युद्धे लढले आहेत. “शिक्षणाला कोणताही धर्म नसतो. आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करत सर्व धर्म प्रार्थना करतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी जिल्हा शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली आहे. कोट्याचे मुख्य ब्लॉक शिक्षण अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
हे ही वाचा:
अल्पवयीन मित्राच्या खुन प्रकरणात मित्राला अटक
गोपाल खेमका हत्या प्रकरण : सत्य लवकरच येणार समोर
कॅप्टन विक्रम बत्रा : कारगिलचा सिंह
हिंदू संघटनांचा विरोध
मात्र, या स्पष्टीकरणामुळे वाद निवळलेला नाही. अनेक हिंदू संघटनांनी आरोप केला की विद्यार्थ्यांवर धार्मिक विचार लादले जात आहेत आणि त्यांनी त्वरित कारवाईची मागणी केली. संघटनांनी मोठ्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी कृष्णकुमार शर्मा यांनी सांगितले की, सखोल तपास चालू आहे आणि विभागीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
“काल आम्हाला एक व्हिडिओ प्राप्त झाला, ज्यामध्ये एका विशिष्ट धर्माची प्रार्थना शाळेत म्हणवली जात असल्याचे दिसते. हा व्हिडिओ मिळताच आम्ही तात्काळ चौकशी समिती नेमली आहे. अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई केली जाईल. ही सीबीएसई संलग्न शाळा असल्याने, अहवाल मंडळाकडेही पाठवला जाईल,” असे शर्मा यांनी सांगितले.
