26 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरसंपादकीयभाजपाला सद्बुद्धी कोण देणार?

भाजपाला सद्बुद्धी कोण देणार?

महाराष्ट्रात सेटींगच्या राजकारणाचे नवे पर्व

Google News Follow

Related

२०१४ नंतर देशात जशी एक मोठी राजकीय क्रांती झाली तशी ती महाराष्ट्रातही झाली. पंधरा वर्षे महाराष्ट्रात सुरू असलेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा तमाशा संपुष्टात आला. सेटींगवाले सरकार इतिहास जमा झाले. तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो, हे प्रकार बंद झाले. महाराष्ट्राच्या मतदाराने गाडलेले ते भूत पुन्हा एकदा जागे झाल्याचे चित्र आहे. हिंदी बोलतो म्हणून लोकलमध्ये मारहाण झालेल्या अर्णव खैरे या कोवळ्या तरुणाने आत्महत्या केली. या प्रकाराला जे नालायक जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करायची सोडून भाजपावाले त्यांना सद्बुद्धी दे म्हणून गणेश मंदिरासमोर आंदोलनाचा तमाशा करतायत. हाती सत्ता असताना आणि पोलिस खाते असताना हा आंदोलनाचा तमाशा करतायत. लोकांना मूर्खात काढण्याचा हा प्रकार आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राज्यात सरकारमान्य झुंडशाही सुरू झाली. घोळक्याने जायचे आणि एखाद्याला मारहाण करायची. जाहीरपणे त्याला अपमानित करायचे. सरकारमध्ये मंत्री असलेले नेतेही यात माग नव्हेत. जितेंद्र आव्हाडांचे प्रताप आठवा. आव्हाडांच्या गुंडांनी अनंत करमुसेला घरातून उचलून बंगल्यावर आणले. अंगावर वळ उठेपर्यंत हाणले. राज्यात जेव्हा भाजपाचा मुख्यमंत्री झाला, तेव्हा आव्हाड गजाआड होतील, अभी भाजपा समर्थकांची अपेक्षा होती. ज्यांना तुरुंगात पाहण्याची इच्छा होती, त्यांच्या गळ्यात गळे घालण्याचे काम भाजपाचे नेते करत आहेत. क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांच्या निमित्ताने हा निलाजरेपणा सुरू आहे. भाजपात आलेले उपरे करणार नाही, असे प्रकार भाजपाचे नेते करतायत. करमुसे सारख्या हिंदुत्ववादी तरुणाच्या मनाला किती इंगळ्या डसत असतील याचा विचार करा.

हे ही वाचा:

आयटीबीपीचा ६४ वा स्थापना दिवस उत्साहात

“राष्ट्राच्या हितासाठी एकमेकांना सहकार्य करा!” शशी थरूर यांनी कोणाला दिला सल्ला?

दक्षिण आफ्रिकेत पीएम मोदींची भारतीय वंशाच्या टेक उद्योजकांशी भेट

हिंदू नसतील तर जगच नष्ट होईल!

मराठीची दुकाने चालवणारे दोन्ही ठाकरे राज्यात भाषेच्या नावाखाली विखार निर्माण करण्याचा प्रय़त्न करतायत. कित्येक लोकांना मारहाण झाली. राज्यात बेबंदशाही निर्माण करणाऱ्या या झुंडींवर कोणाचे नियंत्रण नाही. मराठी बोलता येत नसेल तर हाणा असे सल्ले जाहीरपणे देणाऱ्यांवरही कारवाई नाही. सल्ले देणारे राज ठाकरे आपल्या उच्चभ्रू मित्रांशी हिंदीत संवाद साधतात. मराठीच्या प्रेमापोटी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जावेद अख्तर यांची हिंदी भाषणे कौतुकाने ऐकतात. स्वत:  त्यांचे चिरंजीव पत्रकारांशी हिंदीत बोलतात. यांना कोण हाणणार?  महाराष्ट्राची जनता हा दुटप्पीपणा उघड्या डोळ्यांनी पाहते आहे. मराठी माणूस अशा छछोर आंदोलनांमुळे प्रभावित होईल अशा गैरसमजात ही मंडळी आहेत. महाराष्ट्रातील सत्तारुढ असलेले नेते तरीही त्यांच्या झुंडशाहीच्या विरोधात कठोर कारवाई करताना दिसत नाही. उलट एकमेकांना प्रेमाचे पुष्पगुच्छ देण्याघेण्याचे जाहीर सोहळे महाराष्ट्राच्या जनतेला अधेमधे दाखवत असतात.

महाराष्ट्रात मराठीवर प्रेम करणारा माणूसही हिंदी सिनेमे पाहातो, हिंदीवर प्रेम करतो आणि पत्रकार आणि मित्रांशी बोलताना राज ठाकरे हिंदीचा जसा वापर करता तसा वापरही करतो. तुम्ही हिंदीत बोलू शकता, पण दुसऱ्यांनी हिंदीत बोलायचे नाही, अशीही दंडेली सुरू आहे. महाराष्ट्रातील सरकार मख्खपणे हे प्रकार पाहते आहे. अर्णव खैरे लोकलमध्ये हिंदीत बोलला, त्याला मारहाण झाली. अपमानित अवस्थेत त्याने आत्महत्या केली. आईबापांनी वयात आलेला एक कोवळा मुलगा गमावला. आय़ुष्यभराची कमाई त्यांनी गमावली. त्यांचे उरलेले आयुष्य मुलाच्या नावाने अश्रू ढाळण्यात जाणार आहे. हे पाप राज्यात भाषेच्या नावावर विखार निर्माण करणाऱ्या फक्त दोन ठाकरेंचे नाही, हे भाजपाच्या बुळचट आणि सेटींगवाल्या कारभाराचेही पाप आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यात ब्राह्मण विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटवण्याचा प्रय़त्न करत होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांना अंगावर घेतले होते. त्यांना तोंडावर सुनावले होते की, ते राज्यात जातीय विखार निर्माण करतायत. आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन केले होते. त्यांनी मशिदीवरचे भोंगे हटवण्यासाठी आंदोलन केले, तेव्हाही आम्ही त्यांचे भरभरून कौतुक केले. त्या वेळी काही काळ राज ठाकरेंना हिंदू जननायक असे बिरुद त्यांच्या समर्थकांनी बहाल केले होते. त्याच राज ठाकरे यांनी भाषेच्या नावाने हिंदूंना मारझोड करण्याची बुद्धी कुठून झाली. मनसेचे कार्यकर्ते भेंडी बाजार आणि मुंब्र्यात जाऊन मराठीचा आग्रह का धरत नाहीत. हिंदूंना बडवले तर सरकार काही करणार नाही, याची त्यांनाही खात्री आहे.

भाजपाचे नेते बहुधा जनतेला मूर्ख समजतात. अर्णवने केलेल्या आत्महत्येचा निषेध करण्यासाठी शिवतीर्थावरील उद्यान गणेश मंदिरासमोर आज भाजपाच्या नेत्यांनी आंदोलन केले. भाषेच्या नावावर विखार निर्माण करणाऱ्यांना सद्बुद्धी द्या, अशी प्रार्थना केली. लाज वाटली पाहिजे या लोकांना. हाती सत्ता असताना अशी बेशरम आंदोलन करायला. जरा तरी लाज असती तर ज्या लोकांनी अर्णवला आत्महत्या करायला भाग पाडले त्यांचा छडा लावून त्यांना तुरुंगात डांबले असते. आणि ज्यांनी ही मारहाण करण्यासाठी मराठी तरुणांची माथी भडकावली त्या राज ठाकरेंवर गुन्हा दाखल केला असता. हे करण्याची हिंमत बहुधा भाजपाच्या सरकारमध्ये नाही, त्यामुळे शिवतीर्थावर आंदोलन करून लोकांना मूर्ख बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. काही काळाने विषय थंड झाला की पुन्हा एकदा पुष्पगुच्छाचे आदान प्रदान सुरू होईल.

जितेंद्र आव्हाडांच्या गळ्यात गळे घालून भाजपाच्या नेत्यांनी सिद्ध केलेले आहे, की त्यांची कातडीही गेंड्याची आहे. सेटींगचे राजकारण आपल्यालाही जमते हेही त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी सिद्ध केले आहे, की त्यांच्यासाठी आवाज उठवणारे अनंत करमुसे यांच्यासारखे लोक मूर्ख आहेत. भाजपा हा बुद्धीमान लोकांचा पक्ष आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात पळवाट काढण्याचे कौशल्य त्यांना इतर कोणापेक्षा जास्त साधते. शिवतीर्थावर केलेली निदर्शने ही तशीच पळवाट आहे.

भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने कऱण्यात आली. अमित साटम हे आक्रमक आहेत. ठाकरेंच्या कारकीर्दीत तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप त्यांनी केला होता. तो गंभीरपणे घेऊन सरकारने एसआय़टीची स्थापना केली. परंतु अशा अनेक प्रकरणात सरकारने स्थापन केलेल्या एसआय़टीचे जसे लोणचे घालण्यात आले, तसे या एसआय़टीचेही घालण्यात आले असावे. किंवा भाजपाचे नेते मुहूर्ताच्या प्रतीक्षेत असावे. सांगण्याचा मुद्दा एवढाच कि आरोप करायचे आणि पुढे काहीच करायचे नाही, असा प्रकार भाजपाने अनेक बाबतीत करून दाखवलेला आहे. दिशा सालियनच्या प्रकरणातही तेच केले. आता आंदोलने करायची आणि लोकांच्या तोंडाला पाने पुसायची असा नवा प्रकार सुरू झालेला आहे. हे शिवतीर्थावरील सद्बुद्धी आंदोलनातून स्पष्ट झाले. महाराष्ट्रात सेटींगच्या राजकारणाचे नवे पर्व सुरू झालेले आहे. एकमेकांना पाठीशी घालायचे, तू माझी पाठ खाजव मी तुझी पाठ खाजवतो असा हा प्रकार. शरद पवारांनी हा ट्रेण्ड सुरू केला होता. शरद पवारांचे राजकारण संपले, परंतु सेटींगचे राजकारण मात्र महाराष्ट्रात तरी अजरामर आहे, असे दिसते. सेटींगच्या राजकारणाला नव संजीवनी देणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनाही श्रीगणेशाने सद्बुद्धी द्यावी या प्रार्थनेच्या पलिकडे आम्ही काय करू शकतो.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा