प.बंगाल नाही, भाजपाने २०२९ ची लोकसभा निवडणूक जिंकली…

प.बंगाल नाही, भाजपाने २०२९ ची लोकसभा निवडणूक जिंकली…

पश्चिम बंगालची निवडणूक हा भाजपासाठी नव्हे हिंदूंसाठी मिशीचा प्रश्न होता. इथे प्रश्न जय पराजय असा नव्हता. हिंदू इथे शिल्लक राहणार की नाही, असा सवाल असल्याने भाजपाने ही निवडणूक करू वा मरू या मानसिकेतून लढवली आणि जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचंड मेहनत घेतली. मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला. पश्चिम बंगालच्या हिंदूंनी हिंदू म्हणून मतदान केले. भाजपाला दणदणीत विजय मिळवून दिला. केवळ मुस्लीम पॉकेट्समध्ये तृणमूलच्या वाट्याला जागा आलेल्या आहेत.  भाजपाने केवळ प.बंगालचा किल्ला सर केलेला नाही. २०२९ ची लोकसभा निवडणुकीच्या विजयावर आतापासून शिक्कामोर्तब केलेला आहे. प.बंगालमध्ये झालमुरीने भाजपासाठी वातावरण निर्मिती केली होती. विजयानंतर भाजपा कार्यालयात रसगुल्ले वाटले जात आहेत.

निवडणुकीत भाजपा आणि तृणमूल काँग्रेस अशीच लढत झाली. ट्रेण्ड पाहाता भाजपा २०० तृणमूल ९० बाकी ४ जागा इतरांना असे आकडे राहण्याची शक्यता दिसते आहे. प.बंगालमध्ये भाजपासाठी विजय किंवा कपाळमोक्ष एवढे दोन पर्याय शिल्लक होते. देशभरातील भाजपा समर्थकांचे लक्ष या निवडणुकीकडे होते. इथे पराभव होतो तर भाजपाच्या संघटनेचा विश्वास रसातळाला गेला असता. केंद्राच्या सत्तेपर्यंत त्याचे हादरे बसले असते. भाजपासोबत असलेल्या मित्र पक्षांची चलबिचल सुरू झाली असती. विरोधकांना बळ मिळाले असते.

निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर विखारी टीका करीत असले तरी निवडणुकीनंतर मात्र ते मोदींच्या विरोधात पुन्हा एकत्र येणार याबाबत कोणालाही संशय नव्हता.प.बंगालमधील पराभव ही भाजपाच्या उतरणीची सुरूवात असा प्रचारही सुरू झाला होता. आता नेमके याच्या उलट होणार आहे.

ममता बॅनर्जी या भाजपा विरोधी नेत्यांमधील सर्वात शक्तिशाली आणि लोकप्रिय नेत्या होत्या. प.बंगालमध्ये विजयी झाल्या असत्या तर त्यांची नजर दिल्लीच्या तख्तावर रोखली गेली असती. देशभरातील भाजपा विरोधक त्यांच्या पाठी एकवटले असते. त्यामुळे ममता यांचा पराभव केंद्रातील सत्तेच्या मजबूतीसाठी आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा कायम ठेवण्यासाठी गरजेचा होता.

दक्षिण बंगाल हा तृणमूलचा बालेकिल्ला होता, कोलकाता आणि अवतीभवतीचा शहरी भाग देखील गेल्यावेळी तृणमूलच्या बाजूने झुकला होता. उत्तर बंगालमध्ये २०२१ मध्ये केलेल्या कामगिरीपेक्षा सरस कामगिरी यंदा भाजपाने केलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये ३५ टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लीम मतदार असलेल्या मतदार संघातच तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तरले आहेत.

प.बंगालच्या निवडणुकीत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. हिंदू मतदारांना अपमानित करून, मुस्लीम मतांच्या बळावर सत्ता टीकवता येत नाही, ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. ममता नमाज पढत होत्या, कोणी त्यांच्यासमोर जय श्रीराम म्हटल्यावर त्यांचा पारा चढायचा. जय श्रीराम विरुद्ध दुर्गा असे नरेटीव्ह चालवण्याचा प्रयत्न तृणमूलचे नेते करीत होते. हिंदू विरोध इतका तीव्र झाला होता की सयोनी घोष या तृणमुलच्या महीलेने शिवलिंगावर कॉण्डोम चढवून फोटो पोस्ट केला. २०१५ ची ही घटना. २०२१ मध्ये पुन्हा व्हायरल झाला. काबा आणि मदीनावर याच बाईने सुरेल गाणे म्हटले. म्हणजे इथे नास्तिकता नव्हती. हिंदू आस्थांचा अपमान करायचा आणि मुस्लीम आस्था डोक्यावर घ्यायच्या असा हा प्रकार होता. ममतांचा याला पाठिंबा होता.

स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन या उपक्रमावर ममता बॅनर्जी यांनी घेतलेला तीव्र आक्षेप फक्त बांगलादेशींचा मताधिकार वाचवण्यासाठी होता. सीमेवर होणाऱ्या फेन्सिंगच्या कामात ममता हा अडथळा होता. बांगलादेशींची घुसखोरी कोणत्याही परीस्थितीत सुरू राहीली पाहीजे या अट्टहासापोटी हे सगळे सुरू होते. कोलकाता उच्च न्यायालयाने फेन्सिंगसाठी बीएसएफला १२७ किमी जमीनीचे अधिग्रहण करून देण्याचे आदेश दिले. ३१ मार्च २०२६ ची डेडलाईन दिली. तरीही ममता यांच्या सरकारने फक्त ८ किमी जमीन दिली. न्यायालयाने याबाबत संताप व्यक्त केला.

ममता यांची सत्ता कायम राहीली असती तर बांगलादेशींची घुसखोरी कायम राहीली असती. हिंदूंचा टक्का घसरत राहीला असता. पुढच्या पाच वर्षात प.बंगालचा बांगलादेश झालाच असता शिवाय मुक्तद्वार मिळाल्यामुळे देशातील विविध राज्यात बांगलादेशींची संख्या अतोनात वाढली असती.

प्रचाराच्या दरम्यान घुसखोर, महिला सुरक्षा, रोजगार, विकास याबाबत चर्चा झाली. परंतु चर्चा न झालेला एक विषय असा होता, ज्याचा प.बंगालच्या निवडणुकांवर मोठा परीणाम झाला. तो विषय म्हणजे मोहमद युनुस यांच्या कार्यकाळात बांगलादेशात हिंदूंवर झालेले अनन्वित अत्याचार. प.बंगालचा हिंदू हे अत्याचार पाहात होता. जे काही तिथे घडले त्याची निवडणुकीच्या काळात फार चर्चा झाली नाही, परंतु त्याचा परीणाम निश्चितपणे प.बंगालच्या निवडणुकांवर झालेला आहे.

शहरी भागात राहणारा प.बंगालचा उच्चवर्णीय समाज ज्याला भद्रलोक म्हणून ओळखले जाते, त्याच्या मनाचा थांग लागत नव्हता. कारण गेल्या निवडणुकीत हा समाज ममता यांच्या पाठीशी ठामपणे उभ राहीला. बांग्ला अस्मितेच्या नावाखाली हा समाज पुन्हा ममता यांच्या पाठीशी उभा राहणार असा दावा अनेकांनी केला होता.

हे ही वाचा:

गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळच कमळ!

श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण झाले!

विजय यांच्या समर्थकाने अफवा ऐकून गळा चिरून केला आत्महत्येचा प्रयत्न

सुनेत्रा पवार रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी; अजित पवारांचाही मोडला विक्रम

हिंदुत्वाला कमजोर कऱण्यासाठी प्रादेशिक अस्मितेचे तुणतुणे वाजवण्याचा प्रय़त्न अनेक राज्यात करण्यात आला. महाराष्ट्रात मराठी अस्मिता विरुध्द हिंदुत्व असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ही मंडळी विसरतात प्रादेशिक अस्मिता आणि राष्ट्रीय अस्मितेत संघर्ष नाही. दोन्ही एकाच दिशेने जातात. अन्यथा मराठी मातीत जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहीले नसते. त्यांनी मराठी स्वराज्यात स्वप्न पाहीले असते. जिथे हिंदू आहेत तिथेच मराठी अस्मिता रुजू शकते. ती मुंब्र्यात किंवा भेंडीबाजारात दिसू शकत नाही. सहर शेखने ते सिद्ध केलेही आहे. तसेच बांग्ला अस्मिता आणि हिंदुत्वात बखेडा असण्याचे काहीच कारण नव्हते. यंदाचे वर्ष ज्या वंदेमातरमचे १५० वे वर्षे आहे, हे वंदन बंगालच्या भूमीला नसून भारतभूमीला होते. तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा ही घोषणा बंगालच्या स्वातंत्र्यासाठी झाली नव्हती. यो दोन्ही अस्मिता परस्पर विरोधी नाहीत. यावर पश्चिम बंगालच्या मतदारांनीही शिक्कामोर्तब केले. कोलकाता परीसरातील हा मतदार भरपावसात मतदानासाठी बाहेर पडला, तेव्हाच हे स्पष्ट झाले होते की परीवर्तन निश्चित आहे.

हिंदू भाजपाच्या पाठिशी उभा राहीला. दुसऱ्या बाजूला मुस्लीम बहुल मतदार संघात मुस्लीम मते विभागली गेल्याचे चित्र आहे. मुर्शीदाबाद, मालदा, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, दिनाजपूर येथे हे चित्र दिसत असल्याचे भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी मतमोजणीच्या पहील्या टप्प्यातच जाहीर केले. ही मते आम आदमी उन्नयन पार्टीने, डावे किंवा काँग्रेसपेक्षा फुरफरा शरीफच्या अब्बास सिद्दीकीचा पक्ष इंडीयन सेक्युलर फ्रण्टच्या वाट्याला आलेली दिसतात. प.बंगालमधील अविकास आणि अराजकामुळे मुस्लीम खूष होते असे मानायचे काहीच कारण नाही. त्यांनी भाजपाला मतदान केले असा दावा कऱणे धार्ष्ट्याचे ठरेल. त्यांच्यासाठी आयएसएफ, काँग्रेस आणि डाव्यांचा पर्याय उपलब्ध होतात.

भाजपाच्या विजयाचे आकडे बाहेर आल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांच्या घरासमोर जय श्रीराम अशी घोषणाबाजी केली. सोशल मीडियावर अनेकांनी यावरही आक्षेप घेतला. २०२१ च्या निवडणूक हिंसाचारात ५४ बळी पडले होते. महिलांवर बलात्कार झाले होते. विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली होती. याचा बहुधा बऱ्याच जणांना विसर पडलेला आहे. हे यश भाजपाच्या त्या कार्यकर्त्यांचे आहे. ज्यांनी विजयासाठी आपला घाम, अश्रू आणि रक्त दिले आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version