सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ ते २९ जून २०२६ दरम्यान सेशेल्सच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. हिंदी महासागराच्या पश्चिमेला वसलेला भौगोलिकदृष्ट्या हा अत्यंत महत्त्वाचा देश आहे. कधीकाळी चीनने या देशाला आपल्या गोटात घेण्याचा प्रयत्न केला होता. आजही या देशासोबत चीनचे घट्ट संबंध आहेत; परंतु ते भारतापेक्षा सरस नाहीत. एक गोष्ट अशी आहे, ज्यामुळे भारत इथे नेहमीच वरचढ ठरतो. हेच ते कारण आहे, ज्यामुळे सेशेल्सच्या सुवर्णमहोत्सवी राष्ट्रीय दिनाचे ‘मुख्य अतिथी’ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले गेले आहे.
हिंदी महासागर हे निर्विवादपणे भारताचे प्रभावक्षेत्र आहे. गेली अनेक वर्षे चीन इथे शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ या योजनेअंतर्गत हिंदी महासागरातील छोट्या देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवणे आणि तिथे नौदलाचे तळ निर्माण करणे ही चीनची रणनीती आहे. सेशेल्सबाबतही चीनचे धोरण वेगळे नाही; परंतु सेशेल्स आणि भारताचे संबंध अधिक भक्कम आहेत. ५० व्या राष्ट्रीय दिनाचे ‘मुख्य अतिथी’ म्हणून पंतप्रधान मोदींना मिळालेले निमंत्रण हेच स्पष्ट करते की, हा देश भारताला आपला हक्काचा आणि विश्वासू सुरक्षा भागीदार मानतो. मोदी हे सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला (संसदेला) संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. तसेच, राष्ट्रीय दिनाच्या परेडमध्ये भारतीय सैन्याची तुकडी आणि नौदलाची दोन जहाजे सहभागी होत आहेत.
भारतासाठी सेशेल्स अत्यंत महत्त्वाचा आहे. ११५ बेटांचा समूह असलेला हा देश आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून १५०० किमी अंतरावर, तर हिंदी महासागराच्या नैऋत्येला वसलेला आहे. भारतापासून सेशेल्सचे अंतर ३८०० किमी आहे. मुंबईतून थेट विमानाने जायचे असेल, तर साडेचार तास लागतात. विशेष म्हणजे, भारतीयांना इथे जाण्यासाठी पूर्व-व्हिसाची गरज नाही.
भारत हा हिंदी महासागरात ‘नेट सेक्युरिटी प्रोव्हायडर’ अर्थात ‘मुख्य सुरक्षा रक्षक’ च्या भूमिकेत आहे. सागरी चाचेगिरी, अंमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी भारत सेशेल्सच्या नौदलाला मोठी मदत करतो. सेशेल्सचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गावर आहे. हा जागतिक व्यापाराचा लाइफलाइन मार्ग आहे. त्यामुळे इथे भारताशी स्पर्धा करणाऱ्या चीनचा एकतर्फी प्रभाव आपल्याला परवडणारा नाही.
चीनने हा प्रभाव निर्माण करण्यासाठी गेल्या काही वर्षांत तिथे प्रचंड पैसा ओतला आहे. दोन्ही देशांमध्ये १९७६ पासून राजनैतिक संबंध आहेत. चीनने सेशेल्सला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनुदाने आणि कर्ज दिले आहे. चीनने सेशेल्समध्ये संसद इमारत, सर्वोच्च न्यायालयाची इमारत, रुग्णालये आणि शाळांचे बांधकाम करून दिले आहे. सेशेल्स हा चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (BRI) प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. याद्वारे चीनला आफ्रिका आणि आशियाला जोडणाऱ्या सागरी व्यापारी मार्गांवर आपले नियंत्रण मजबूत करायचे आहे.
हे ही वाचा:
विमानापेक्षा इमान महत्त्वाचं असते
टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिघे ताब्यात
यूएस ओपनमध्ये रौनक चौहानची ऐतिहासिक झेप
चीनने सेशेल्सच्या लष्कराला आणि तटरक्षक दलासाठी गस्ती जहाजे आणि लष्करी उपकरणे दिली आहेत. तसेच, एडनच्या आखातात सागरी चाच्यांविरुद्ध लढणाऱ्या आपल्या नौदलाच्या जहाजांना रसद पुरवण्यासाठी चीन सेशेल्सच्या बंदरांचा वापर करतो. सेशेल्स आणि चीन यांच्यात सागरी अर्थव्यवस्थेसाठी ‘ब्लू पार्टनरशिप’ करारही झाला आहे. याद्वारे सागरी पर्यावरण संरक्षण, हवामान बदल आणि सेशेल्सच्या सागरी उत्पादनांची चीनमध्ये होणारी निर्यात वाढवण्यावर दोन्ही देश एकत्र काम करत आहेत. २०२६ मध्ये झालेल्या ताज्या करारानुसार, चीनकडून सेशेल्सला १०० दशलक्ष युआन (सुमारे $१४.६ दशलक्ष डॉलर) चे अनुदान मिळणार आहे. हा निधी सेशेल्समधील गृहनिर्माण, अन्न सुरक्षा आणि हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे.
सेशेल्स हा भारत आणि चीन यांच्यातील प्रादेशिक स्पर्धेचा फायदा घेऊन दोन्ही देशांकडून स्वतःच्या विकासासाठी जास्तीत जास्त मदत मिळवण्याचे एक ‘संतुलित धोरण’ राबवताना दिसतो.
भारतानेही सेशेल्सच्या विकासात आणि सुरक्षेत मोठे योगदान दिले आहे. भारताने सेशेल्सला $१७५ दशलक्ष डॉलरचे (सुमारे १४५० कोटी रुपये) विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. याद्वारे सेशेल्समध्ये सरकारी घरे, पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यास भारत मदत करत आहे. सागरी चाचेगिरी आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी भारताने या देशाला गस्ती जहाजे आणि टेहळणी विमाने भेट दिली आहेत. सेशेल्सच्या तटरक्षक दलाला प्रशिक्षण देणे असो वा त्यांच्या जहाजांची मोफत दुरुस्ती करणे असो, भारत प्रत्येक बाबतीत सेशेल्सच्या पाठीशी उभा आहे. भारताने आपल्या ‘यूपीआय’ आणि डिजिटल गव्हर्नन्सच्या धर्तीवर सेशेल्समध्येही ‘डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर’ (DPI) उभारण्याचे मान्य केले आहे, ज्यामुळे तिथे डिजिटल पेमेंट आणि प्रशासनाचे सुलभीकरण होईल.
भारताच्या ITEC (इंडियन टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन) प्रोग्राम अंतर्गत सेशेल्सच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि लष्कराला उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधांसोबतच भारताकडून सेशेल्सला अन्नधान्य आणि डाळींचा पुरवठा केला जातो.
सेशेल्स हिंदी महासागरात अत्यंत मोक्याच्या सागरी मार्गावर वसलेला आहे. भारताने सेशेल्समध्ये उभारलेल्या ‘कोस्टल सर्व्हिलन्स रडार सिस्टम’ मुळे भारताला या संपूर्ण सागरी क्षेत्रातील प्रत्येक जहाजाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येते. हा भारताचा ‘तिसरा डोळा’ आहे. सेशेल्सकडे सुमारे १३.३ लाख चौरस किलोमीटरचे अफाट सागरी क्षेत्र आहे. या क्षेत्रात भारताला सागरी संशोधन, हवामान अंदाज आणि हायड्रोग्राफी यासाठी वैज्ञानिक सहकार्य मिळते.
चीन आणि भारतासोबत असलेली देवाणघेवाण पाहिली, तर आपल्या लक्षात येईल की आर्थिक संबंधांचा विचार केला तर सेशेल्ससाठी दोन्ही देश एका पातळीवर आहेत; परंतु भारताकडे एक असे ‘ट्रम्प कार्ड’ आहे, ज्याची चीन कधीही तुलना करू शकत नाही.
सेशेल्सचे नागरिक असलेले भारतीय वंशाचे लोक तिथे अत्यंत प्रभावशाली आहेत. सेशेल्सची एकूण लोकसंख्या सुमारे १,२०,००० आहे. यापैकी जवजवळ सहा हजार लोक थेट भारतीय नागरिक आहेत. तर बांधकाम आणि किरकोळ व्यापार क्षेत्रात ९,००० पेक्षा जास्त अनिवासी भारतीय कार्यरत आहेत. सेशेल्सच्या एकूण लोकसंख्येमध्ये थेट भारतीय समुदायाचा वाटा सुमारे ८% ते १०% असला, तरी सेशेल्सची ८२% पेक्षा जास्त लोकसंख्या अशी आहे, ज्यांच्या पूर्वजांमध्ये कोणी ना कोणी भारतीय होते. सेशेल्सचे विद्यमान राष्ट्रपती वावेल रामकलवान हे स्वतः भारतीय वंशाचे आहेत; त्यांचे आजोबा बिहारमधून सेशेल्सला गेले होते. पॅट्रिक पिल्ले हे सेशेल्सचे माजी परराष्ट्र मंत्री आणि नॅशनल असेंब्लीचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. सेशेल्सचे माजी उपराष्ट्रपती अहमद अफीफ यांचे कुटुंबही गुजरातमधून आले होते. सुनील शाह हे सेशेल्समधील तिसऱ्या पिढीचे प्रसिद्ध भारतीय वंशाचे उद्योगपती आहेत, जे तिथल्या प्रमुख बिझनेस कौन्सिलचे नेतृत्व करतात. सत्या नायडू हे तिथे तरुण आणि प्रभावी राजकीय नेते आहेत. १७७० मध्ये जेव्हा सेशेल्समध्ये मानवी वस्ती सुरू झाली, तेव्हा तिथे पोहोचलेल्या पहिल्या २७ लोकांमध्ये ५ भारतीय (तमिळ) होते. आज सेशेल्समधील व्यापार आणि बांधकाम क्षेत्रावर भारतीय समुदायाचे मोठे वर्चस्व आहे. तिथे एक भव्य तमिळ हिंदू मंदिरही आहे, जे तिथल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहे.
सेशेल्सची संपूर्ण ओळखच ‘क्रिओल संस्कृती’वर आधारलेली आहे. तिथला ९०% पेक्षा जास्त समाज हा क्रिओल वंशाचा आहे आणि जवळपास ९०% लोक क्रिओल भाषा बोलतात. हाच तो समाज आहे, ज्यांच्या ८२% पेक्षा जास्त पूर्वजांमध्ये भारतीय रक्ताचे अंश आहेत.
भारताच्या समुद्रात सापडणारे सुरमई, बांगडा, करली, तांबोसा, टुना असे अनेक मासे तिथेही सापडतात. किनारपट्टी असल्यामुळे तिथे मासे आणि भात हेच लोकांचे मुख्य अन्न आहे. ‘सेशेलोई क्रिओल फिश करी’ ही सेशेल्सची राष्ट्रीय डिश आहे. ही करी चवीला अतिशय अप्रतिम असते. नारळाचे दूध, कढीपत्ता आणि विशिष्ट मसाले वापरून ही फिश करी तयार केली जाते. याची चव बऱ्याच अंशी दक्षिण भारतीय किंवा गोवन फिश करीसारखीच असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुद्ध शाकाहारी आहेत. गुजराती पद्धतीची खिचडी, कढी, पापड, दही हे त्यांचे आवडते भोजन आहे; परंतु त्यांना हे उत्तम ठाऊक आहे की, सेशेल्सला भारताशी जोडणारे जे घट्ट दुवे आहेत, त्यात या ‘फिश करी’चा आणि सांस्कृतिक ओढीचा वाटा खूप मोठा आहे. याच भावनिक आणि सांस्कृतिक जोडणीपाशी चीन हात टेकतो!
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
