‘बिनपाण्या’चा रोमांस वान्स-मुनीर यांचे पती, पत्नी और वो…

‘बिनपाण्या’चा रोमांस वान्स-मुनीर यांचे पती, पत्नी और वो…

‘जगात मला माझी पत्नी आणि पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसीम मुनीर या दोन व्यक्तिच प्रिय आहेत’, असे विधान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.वान्स यांनी केले आहे. इराण-अमेरिका युद्धात मध्यस्थाची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले वजन वाढल्याचा भ्रम पाकिस्तानच्या नेतृत्वाला होताच, तो विधानामुळे बळावला आहे. पाकिस्तानचे संरक्षणी मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. अर्थात यात हतबलतेचा भाग जास्त आहे. पहलेगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार थंड्या बस्त्यात टाकण्याचा निर्णय घेतला. याचे चटके पाकिस्तानला बसू लागले आहेत. कराचीसारख्या शहरात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

भविष्यातील युद्ध पाण्यावरून होतील, असे भाकीत जगातील अनेक तज्ज्ञांनी केले आहे. त्याची सुरूवात भारतापासून होणार अशी शक्यता दिसते आहे. ‘जून २०२८ पर्यंत पाकिस्तानकडे जाणारे सिंधू नदीचे पाणी पूर्णपणे रोखले जाऊ शकते.’ असे विधान जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी केले होते. भारताची भूमिका स्पष्ट आहे. भारतातील नद्यांच्या पाण्याचा भारतीयांसाठी वापर. चीन जर ब्रह्मपुत्रेचा प्रवाह रोखू शकतो, तर भारतालाही तो अधिकार आहे. भविष्यात पावसाच्या पाण्यावरील अवलंबित्व संपवायचे असेल तर जलस्त्रोतांची स्वच्छता करणे, पाणी अडवणे आणि पाणी जिरवणे हे अत्यंत आवश्यक आहे. भारताने सीमा भागात सिंधू जल समृद्धी अभियान’ अंतर्गत अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.

लडाखमध्ये सिंधू नदीवर मोठ्या शिळांचा वापर करून रॉक चेक डॅमची निर्मिती केली आहे. १५ दिवसात फक्त १० लाख रुपये खर्चून हा इको फ्रेंडली डॅम बांधता येतो. लडाखचे राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची ही संकल्पना. लडाखमध्ये असे आणखी शंभर डॅम बांधण्याची योजना आहे. लडाखची पाणी टंचाई यामुळे संपुष्टात येणार आहे.

भारताने १९६० च्या सिंधू जल संधीला स्थगिती दिल्यानंतर सिंधू, चिनाब आणि झेलम या तिन्ही पश्चिम नद्यांवर आपल्या जलप्रकल्पांचा वेग प्रचंड वाढवला आहे. सिंधू करारानुसार रावी,बियास, सतलज या नद्यांच्या पाण्याचा मोठा वाटा भारतासाठी आणि सिंधू, चेनाब आणि झेलमच्या पाण्याचा मोठा वाटा पाकिस्तानसाठी अशी विभागणी झाली होती. आता भारताने पाणी अडवायला सुरूवात केली आहे. या नद्यांचे पाणी अडवण्यासाठी आणि वीजनिर्मितीसाठी भारताने अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. हे खरे तर आधीच व्हायला हवे होते, कारण आता पर्यंत भारतातून वाहणाऱे नद्यांचे पाणी साठवण्यासाठी पाकिस्तानने कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे अखेर हे पाणी सुमद्रात वाहून जायचे. म्हणजेच वाया जायचे. ते आता भारत अडवतो आहे, असे दिसल्यावर पाकिस्तानला पोटशूळ उठला आहे.

हे ही वाचा:

लखनऊमध्ये आग दुर्घटनेत कोचिंग सेंटरमधील १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

कतारमधील रास लाफान गॅस प्रकल्पातील स्फोटाबाबत भारताकडून दुःख व्यक्त

झेल सुटले, सामना हातातून गेला!

भारताने सध्या सर्वाधिक काम चिनाब नदीच्या खोऱ्यात सुरू केले आहे. पाकिस्तानने यावर आक्षेप घेतला आहे: मे-जून २०२६ मध्ये भारताने चिनाब-बियास बोगद्याच्या कामाच्या निविदा काढल्या आहेत. हिमाचल प्रदेशात बांधल्या जाणाऱ्या या ८.७ किमी लांब बोगद्याद्वारे चिनाब नदीचे अतिरिक्त पाणी पूर्व नदी प्रणालीतील ‘बियास’ नदीकडे वळवले जाईल, ज्यामुळे पाकिस्तानकडे जाणारे पाणी थेट भारतात थांबवता येईल.

जम्मू-काश्मीरमधील सलाळ धरणावर ६२४ मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहेत. यातील गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी २६८ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. पाकिस्तान आक्षेप घेईल म्हणून या धरणांतील गाळ काढण्याचे काम सुद्धा केले जात नव्हते. आता हे चित्र बदललेले आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये पर्यावरण मंत्रालयाने किश्तवाड जिल्ह्यातील २६० मेगावॅट क्षमतेच्या या जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, हजार मेगावॅटचा पाकल दुल, ६२४ मेगावॅटचा किरू आणि ५४० मेगावॅटचा क्वार हे तिन्ही प्रकल्प चिनाबच्या उपनद्यांवर वेगाने पूर्ण केले जात आहेत, ज्यामुळे भारताची पाणी साठवण्याची क्षमता मजबूत होईल.

झेलम आणि तिच्या उपनद्यांवर भारताने असे प्रकल्प उभारले आहेत जिथे पाण्याचा प्रवाह न रोखता वीजनिर्मिती केली जाईल. झेलमची प्रमुख उपनदी असलेल्या किशनगंगा (नीलम) नदीवर हा ३३० मेगावॅटच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. भारताने किशनगंगा नदीचे पाणी बोगद्याद्वारे वळवून झेलम नदीत आणले आहे, ज्यावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.

तुलबुल नेव्हिगेशन हा वुलर सरोवराच्या मुखाशी असलेला हा प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होता. करार स्थगित झाल्यानंतर भारताने झेलम नदीतील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आणि नौकानयनासाठी येथे काम पुन्हा वेगाने सुरू केले आहे.

लडाख आणि कारगिल क्षेत्रात मुख्य सिंधू नदीवर भारताने छोटे पण धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. भारताने लडाखमधील सीमावर्ती भागात सिंधू नदीवर छोटे रॉक चेक डॅम बांधण्याचा उपक्रम सुरू केला आहे. जेणेकरून तिथल्या स्थानिक शेतीसाठी आणि सैन्यासाठी पाण्याचा वापर करता येईल. सिंधू आणि तिच्या सुरू नद्यांवर हे प्रकल्प आधीच कार्यरत आहेत, मात्र आता त्यांची कार्यक्षमता वाढवून हिवाळ्यातही पूर्ण क्षमतेने पाणी वापरण्याचे नियोजन सुरू आहे.

या प्रकल्पांमुळे पाकिस्तानचे रक्त खवळलेले आहे. ‘भारताने आमचे पाणी रोखले तर आम्ही त्यांचा श्वास रोखू’ अशा डायलॉगबाजी पलिकडे फारसे काही करण्याच्या स्थितीत पाकिस्तान नाही. परंतु पाकिस्तानला मात्र असे वाटत नाही. इराण-अमेरिकेत शांतता करार करण्यात मोठी भूमिका बजावली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानचे वजन वाढल्याच्या भ्रमात आसीम मुनीर आणि शाहबाज शरीफ आहेत. त्यात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका-इराण शांतता चर्चेदरम्यान ‘माझ्या आयुष्यात दोन अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती आहेत—पहिली माझी पत्नी आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर.’ हे विधान केले त्यामुळे पाकिस्तानी नेते हवेत तरंगायला लागले आहेत.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ‘एआरवाय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत थेट युद्धाची धमकी दिली आहे.

‘ज्या क्षणी आम्हाला वाटेल की, भारत पाण्याचा पुरवठा रोखून आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण करीत आहे, त्या क्षणी आम्ही भारतासोबत युद्ध करू. निश्चितपणे करू.’

जून २०२६ च्या सिंध प्रांताच्या सिंचन विभागाच्या आकडेवारीनुसार, त्यांचे ‘नॉर्थ वेस्ट कॅनॉल’ ६४%, ‘राईस कॅनॉल’ ३८% आणि ‘दादू कॅनॉल’ तब्बल ८२% पाण्याच्या तुटीचा सामना करत आहेत. सिंधचे नेते आरोप करत आहेत की पंजाब प्रांत बेकायदेशीरपणे त्यांच्या हक्काचे पाणी पळवत आहे, ज्यामुळे तिथे देशांतर्गत हाणामारी होण्याची चिन्हे आहेत.

भारताने आपल्या सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती देण्यासाठी २१ जून २०२६ रोजी कोलकाता येथे एका भव्य समारंभात संशोधन, अग्रय आणि दुनागिरी या ३ अत्याधुनिक स्वदेशी युद्धनौका नौदलात सामील केल्या या नौकांमध्ये ७५% पेक्षा जास्त स्वदेशी साहित्य वापरले गेले असून २०० हून अधिक भारतीय सुक्ष्म व लघु उद्योगांनी यात योगदान दिले आहे. हिंदी महासागरात चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या नौदलाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी हा भारताचा अत्यंत मोठा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.

भारत आणि पाकिस्तानचे चित्र पाहील्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, ऑपरेशन सिंदुरनंतर भारत आपली शक्ती वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे. वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र, लेझर अस्त्र, विनाशिका, फ्रिगेट्स, पाणबुड्यांची निर्मिती करतो आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान चीनकडून जे मिळेल ते ताब्यात घेतो आहे. शांतता करार झाल्यानंतर कटोऱ्यात अधिक भीक कशी पडेल याची रणनीती बनवतो आहे. अमेरिकी टेकूवर भारताशी मुकाबला करण्याचा विचार करतो आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध अटळ आहे. हे युद्ध आजवरच्या युद्धाच्या तुलनेत अधिक भीषण असेल. युद्धाच्या काळात अमेरिका पाकिस्तानच्या बाजूला झुकलेला, चीन पाकिस्तानच्या मांडीवर बसलेला, तुर्कीये पाकिस्तानसोबत भिडतोय असे चित्र दिसू शकेल. भारत त्याच दृष्टीने तयारी करतो आहे.

 

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version