29 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरसंपादकीयट्रम्प यांच्या भीतीमुळेच कॅनडाची चीनसोबत लोळण फुगडी....

ट्रम्प यांच्या भीतीमुळेच कॅनडाची चीनसोबत लोळण फुगडी….

Google News Follow

Related

ग्रीनलॅंडच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपमध्ये खणाखणी सुरू असताना कॅनडानेही आता वेगळे पर्याय शोधायला सुरूवात केली आहे. युरोपला आज सगळ्यात जास्त धोका डोनाल्ड ट्रम्प यांचा वाटतो आहे, त्यामुळे कॅनडा सावध झाला. कॅनडाच्या उत्तर सीमेच्या सुरक्षेबाबत ट्रम्प यांनी तशीच चिंता व्यक्त केली आहे जशी ग्रीनलँडबाबत केली होती. त्यामुळे कॅनडाचे धाबे दणाणले. ग्रीनलॅंडकडे मोर्चा वळवताना ग्रीनलॅंडला चीन आणि रशियापासून धोका आहे, अशी टकळी ट्रम्प यांनी लावली होती. ग्रीनलॅंड आणि कॅनडाच्या उत्तर सीमेचा संबंध आर्क्टीक क्षेत्राशी आहे. तिथे बर्फाखाली खोलवर दडलेली ट्रिलियन डॉलरची संपत्ती ट्रम्प यांना खुणावते आहे. मेक अमेरिका ग्रेट अगेन, प्रत्यक्षात आणण्यासाठी ट्रम्प यांना सगळ्या जगाचा माल हवा आहे.

जगात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. जुनी घडी पार विस्कटून गेलेली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचा १४ ते १७ जानेवारी दरम्यान चीन दौरा झाला. आठ वर्षांनंतर एखादा कॅनेडीयन पंतप्रधान चीनमध्ये दाखल झाला होता. २०१८ मध्ये दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात तलवारी उपसल्या होत्या. हुवाईचे सीएफओ रेन झेंगफेई यांची कन्या मेड वानझोऊ यांना कॅनडामध्ये अटक करण्यात आली होती. दोन्ही देशांच्या संबंधामध्ये यामुळे प्रचंड कटूता आली होती. कॅनडाच्या या कारवाईचा संबंध अमेरिकेशी होता, इराणशी होता. हुवाईने स्काय कॉम या कंपनीचे नाव वापरून चीनशी व्यापार केला. स्कायकॉम आणि हुवाईचा संबंध नाही, अशी खोटी माहीती मेंग यांनी एचएसबीसी बँकेला दिली, असा ठपका अमेरिकेने ठेवला होता. फसवणूक आणि दिशाभूल केल्याचा आरोप मेंग यांच्यावर केला. अमेरिकेच्या आदेशामुळे मेंग यांच्यावर कारवाई केली. चीनने जशास तसे धोरण ठेवत दोन कॅनेडीयन नागरीकांना अटक केली. त्यानंतर नमते घेत कॅनडाला मेंग यांची सुटका करावी लागली.

कॅनडा हा देश अमेरिकेला किती धार्जिणा आहे, हे स्पष्ट करणारी ही घटना. तोच कॅनडा आज चीनच्या पायावर लोटांगण घालतो आहे. पंतप्रधान कार्नी चीन भेटीवर गेले. तिथे जाऊन ते जे काही बोलले ते ट्रम्प यांचे कान उभे करणारे आहे. ‘चीन आणि कॅनडाचे संबंध सुमारे एक दशकभराचा काळ अत्यंत अनिश्चित होते. दोन्ही देशांच्या जनतेच्या फायद्यासाठी एक भक्कम रणनैतिक भागीदारी रचून हे चित्र आम्ही बदलत आहोत.’ कार्नी इथे थांबले नाहीत, ते म्हणाले की, ‘चीनची निर्णय प्रक्रीयेतील स्पष्टता अमेरिकेपेक्षा जास्त आहे.’

हे ही वाचा:

कब्रस्तानच्या जमिनीवर बांधली मशीद; ‘वक्फ’ दर्जासाठी दिले खोटे पुरावे

युरोपियन युनियन अमेरिकवर लावणार आता भरभक्कम टॅरिफ

भारतीय तरुणांचा ‘हेल्दी लाईफस्टाईल’कडे वाढता कल

सुरक्षित गुंतवणुकीत चांदी चमकली! दर तीन लाखांच्या पार

त्यांचे एक वाक्य मार्मिक होते. ‘जग आमच्या मनासारखे नाही, ते जसे आहे तसे आम्ही त्याला स्वीकारतो.’ कार्नी यांनी चीनसोबतच्या भागीदारीचे वर्णन व्यापारी भागीदारी असे केलेले नाही, ‘स्ट्रेटेजिक पार्टनरशिप’ असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. अवघ्या आठ वर्षात जग कसे उलटे पालटे झाले आहे, त्याचे हे उदाहरण.

ग्रीनलॅंडमध्ये जे घडते आहे, त्याचा कॅनडाशी अप्रत्यक्ष संबंध आहे. कारण ट्रम्प यांनी जी चिंता ग्रीनलँडच्या सुरक्षेबाबत व्यक्त केली, तिच चिंता त्यांनी कॅनडाच्या उत्तरी सीमेबाबत व्यक्त केली आहे. ‘सध्या कॅनडा आपल्या क्षेत्राच्या सुरक्षेबाबत फार गंभीर नाही. त्यांनी आपला संरक्षण खर्च वाढवायला हवा’, असे ट्रम्प कॅनडाच्या नेत्यांशी होणाऱ्या खासगी चर्चेत नेहमीच म्हणत असतात.

कॅनडा हा नाटोचा (नॉर्थ अटलांटीक ट्रीटी ऑर्गनायझेशन) संस्थापक सदस्य आहे. नाटोचे सदस्य असलेले युरोपातील देश आता स्पष्ट सांगतायत की,  ‘आता थेट रशियाशी बोलले पाहिजे’. नव्याने झालेल्या या साक्षात्काराचे कारण ट्रम्प आहेत, त्याच प्रमाणे कार्नी यांच्या चीन भेटीचे कारणही ट्रम्प आहेत. ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पहिले वाह्यात विधान कॅनडाबाबतच केले होते. ‘कॅनडाने अमेरिकेचे ५१ राज्य बनावे’, अशी सुचना त्यांनी केली होती. कॅनडाचे तत्कालिन पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा उल्लेख ते ‘गव्हर्नर’ असा करत होते.

ज्या कारणासाठी ट्रम्प ग्रीनलॅंडकडे डोळा ठेवून आहेत, तिच कारणे कॅनडालाही लागू आहेत. हिमशिखरे वितळल्यामुळे येत्या काही वर्षात खुला होणारा आर्क्टीक्ट सागरी मार्ग, पाणी आणि रेअर अर्थ मिनरल्स, तेल, गॅस आणि अन्य महत्वपूर्ण खनिजे. हे सगळे आर्क्टिक्टला भिडलेल्या कॅनडाच्या उत्तर सीमेच्या क्षेत्रात आहे.

काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी एक विधान केले होते. ‘ग्रीनलॅंड आमच्या गोल्डन डोम प्रकल्पासाठी आवश्यक आहे’. ‘गोल्डन डोम’ प्रकल्प म्हणजे आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्र रोखण्यासाठी अमेरिकेने हाती घेतलेला एक प्रकल्प. जो साधारण इस्त्रायलच्या ‘आर्यन डोम’सारखा आहे. ग्रीनलॅंड ताब्यात असेल तर तिथे ‘अर्ली व़ॉर्निंग सिस्टीम’ लावता येतील. रशियातून क्षेपणास्त्र डागली गेली की तात्काळ अमेरिकेला सूचना मिळतील. तेच कारण कॅनडाच्या उत्तर सीमेलाही लागू आहे. ‘नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डीफेन्स कमांड’ हा कॅनडा आणि अमेरिकेचा संयुक्त प्रकल्प आहे. परंतु ट्रम्प नेहमी म्हणत असतात की,  ‘या सीमेवर शीतयुद्धाच्या काळातील रडार आहेत, उपग्रहांची संख्यी कमी आहे. कॅनडा आर्क्टिक क्षेत्राच्या संरक्षणासाठी आवश्यक खर्च करत नाही’, वगैरे वगैरे.

त्यामुळे ज्या फूटपट्ट्या ट्रम्प यांनी ग्रीनलॅंडला लावल्या, त्या सगळ्या फूटपट्ट्या कॅनडाच्या उत्तर सीमेला लागू होतात. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी कॅनडाचा हा भाग ताब्यात घेणे आवश्यक आहे, असे विधान ट्रम्प यांनी केलेले नाही. त्यांनी हे क्षेत्र विकत घेण्याचा प्रस्तावही दिलेला नाही. परंतु त्यांनी यापेक्षा जास्त धोकादायक विधान केलेले आहे की, कॅनडाने अमेरिकेचे ५१ वे राज्य बनावे. सुरूवातीला हे विधान कोणी फार गंभीरपणे घेतलेले नव्हते. परंतु आता ट्रम्प ज्या आक्रमकतेने ग्रीनलॅंडचा घास घेण्याचा प्रयत्न करतायत ते पाहाता ते कॅनडाबाबत तसे करणारच नाहीत, या भ्रमात कार्नी तरी नाहीत. त्यांच्या ताज्या चीन भेटीनंतर हे बऱ्यापैकी स्पष्ट झालेले आहे.

ट्रम्प कृपेने जगात एक नवी रचना निर्माण होते आहे. युरोप पारंपरीक शत्रू असलेल्या रशियाकडे आशेने पाहातो आहे, कॅनडाचे पंतप्रधान चीनसोबत स्ट्रेटेजिक पार्टनरशिपची घोषणा करतायत. चीन अमेरिकेपेक्षा जास्त प्रेडीक्टेबल आहे, असे जाहीर विधान करतायत. ट्रम्प हे अनप्रेडीक्टेबल आहेत, असा या विधानाचा खरा अर्थ आहे. तो न कळण्या इतके ट्रम्प दूधखुळे नाहीत.

अमेरिकेने एकेकाळी युरोप आणि कॅनडासारख्या देशांना सुरक्षा कवच बहाल केले. या देशांना त्याचा प्रचंड फायदा झाला. संरक्षणावर जो पैसा खर्च झाला असता तो या देशांनी विकासासाठी खर्च केला. देशात सुंदर रस्ते, इमारती, पायाभूत सुविधा उभ्या केल्या. हे देश जगात एखाद्या टवटवीत बगिच्यासारखे भासत होते. भारतासारखा अर्वाचिन देश एखाद्या जंगलासारखा भासत होता. परंतु जंगल आणि बगिच्यात एक मूलभूत फरक असतो. बगिच्यात रोज पाणी घालावे लागते, मशागत करावी लागते. चार दिवस दुर्लक्ष झाले की बगिचा साफ सुकून जातो. अमेरिकेने पाण्याचे पाट बंद केल्यानंतर आता युरोप आणि कॅनडाचेही हेच होताना दिसते आहे.

ट्रम्प यांच्यामुळे आपल्यालाही सुरक्षेची गरज आहे, आपल्यासोबत अमेरिकेशिवायही जगातील महत्वाचे देश हवेत, ही जाणीव या देशांमध्ये निर्माण होते आहे. ट्रम्प यांनी खरोखरच ग्रीनलॅंडवर आक्रमण केले तर जगाचे चित्रच बदलू शकेल. युरोप रशियाच्या आश्रयाला काही देश चीन आणि भारताच्या आश्रयाला येतील. आर्क्टिक्ट ही एकेकाळी जगातील सर्व देशांसाठी सहकार्याची भूमी होती. इथे युद्धाची पुसटशी सुद्धा शक्यता नव्हती. परंतु व्हेनेझुएलाप्रमाणे आर्क्टिक्टची श्रीमंती या क्षेत्राच्या गळ्याचा फास बनणार आहे. इथे तेल, गॅस, खनिजे, रेअर अर्थ असे सगळेच आहे. त्याच्याही पलिकडे इथे स्वच्छ पाण्याचे साठे आहेत, भविष्यातील आर्क्टिक सागरी मार्ग अर्थात नॉर्थ सी रुट इथूनच जाणार आहे. चीन याला पोलर सिल्क रुट म्हणतो. या सागरी मार्गामुळे चीन आणि युरोप दरम्यानचे अंतर ४० टक्क्यांनी कमी होणार आहे. भारतासाठीही हा मार्ग फायदेशीर आहे. ब्लादमीर पुतीन यांच्या भारतभेटीच्या दरम्यान या सागरी मार्गाबाबत सविस्तर चर्चा झालेली आहे. नॉर्वे, रशियाचा आर्क्टीक किनारा, बेरींगचा सामुद्रधनी येथून आशियापर्यंत जहाजे ये-जा करतील. आज या क्षेत्राचे नियंत्रण पूर्णपणे रशियाकडे आहे. हेच नेमके अमेरिकेला खुपते आहे. ग्रीनलॅंड आणि कॅनडाकडे म्हणूनच अमेरिकेची वखवखलेली नजर वळली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा