30 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरसंपादकीयकेंद्रीय बँकांमध्ये पुन्हा गोल्ड रश

केंद्रीय बँकांमध्ये पुन्हा गोल्ड रश

Google News Follow

सोन्याचे दर घसरल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार घायकुतीला आले आहेत. जगभरातील केंद्रीय बँकांना मात्र ही संधी वाटते आहे. सोन्याचे भाव घटले की वाढले, यामुळे त्यांना काडीचाही फरक पडत नाही. केंद्रीय बँका रणनीती आखून सातत्याने सोन्याची खरेदी करीत आहेत. सोन्याचा साठा वाढवत आहेत. २०२५ च्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत झालेली सोन्याची खरेदी ४२ टक्के जास्त आहे. ज्या गुंतवणूकदारांना सोन्याच्या घसरलेल्या भावाची चिंता आहे, त्यांच्यासाठी केंद्रीय बँकांच्या खरेदीचे हे आकडे अत्यंत दिलासादायक आहेत.

सोन्याची दणक्यात खरेदी होते आहे, याचा अर्थ सोन्याला आज बरे दिवस नसले तरी २०२५ ची चमक पुन्हा एकदा येणार, याचे हे संकेत आहेत. जगाच्या अर्थकारणात बरीच उलथापालथ सुरू आहे. डॉलर आज मजबूत दिसतो आहे. अमेरिकेचे बॉण्ड मार्केटदेखील तेजीत आहे. त्या तुलनेत सोने कमकुवत झाले आहे. सोन्याचे दर घसरत आहेत. परंतु हे फार काळ टिकणार नाही. येत्या काळात सोन्याला बरे दिवस येतील, अशी शक्यता जागतिक दर्जाच्या विविध वित्तसंस्थांकडून व्यक्त केली जाते आहे. भविष्यात डॉलरचा किल्ला कोसळला तर सोने हाच जगासाठी एकमेव पर्याय शिल्लक राहतो. त्यामुळे जगातील देश त्यांच्याकडे असलेले अमेरिकी बॉण्ड विकून त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवत आहेत. देशाच्या तिजोरीत डॉलरची जागा आता सोने घेत आहे. जे देश अमेरिकी बॉण्डची विक्री करीत आहेत, ते देश सोन्याच्या खरेदीसाठी हा पैसा वळवताना दिसत आहेत. चीन यात आघाडीवर आहे, कारण चीनला अमेरिकेची जागा घ्यायची आहे. जागतिक महासत्ता व्हायचे आहे. अशा परिस्थितीत त्यांची पहिली स्वाभाविक रणनीती डॉलरची सद्दी मोडून काढण्याची आहे. सध्या डॉलरची जागा घेऊ शकेल असे दुसरे चलन जगात अस्तित्वात नाही. चिनी युआनने ही जागा घ्यावी, यासाठी भारतासह अनेक देशांची तयारी नाही. किंबहुना विरोधच आहे. त्यामुळे ज्यांना डॉलरच्या जाळ्यातून सुटका करून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी सोने हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो.

हे ही वाचा:
आयआरसीटीसी घोटाळ्यात आरोप निश्चितीचा आदेश कायम

गुरनूरला संधीचे संकेत; अंशुलच्या पाठीशी मॉर्केल ठाम!

मुंबईने उत्तराखंडला ८६ धावांनी लोळवले!

माहीममधील ज्वेलर्सवर गोळीबारामागे १० कोटींच्या खंडणीचा डाव!

ही निव्वळ थिअरी राहिलेली नाही. चीनने गेली २४ महिने सातत्याने सोने खरेदी करून याचे प्रात्यक्षिक जगाला दाखवले आहे. भारतानेही हीच भूमिका स्वीकारली आहे. परंतु चीनच्या तुलनेत आपली सोन्याची खरेदी मंद गतीने सुरू आहे. सध्या भारताच्या तुलनेत चीनकडे असलेला सोन्याचा अधिकृत साठा तिप्पट आहे. चीन आपल्या सर्व गोष्टी जगासमोर उघड करतो असे नाही. चीनने त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचा आकडा २४३५ टन असल्याचे सांगितले असले तरी चीनकडे असलेला सोन्याचा छुपा साठा याच्या तुलनेत कितीतरी अधिक असल्याचे सांगितले जाते. काही तज्ज्ञांच्या मते, हा साठा सुमारे ३० हजार टन इतका असू शकतो.

आर्थिक अनिश्चिततेच्या काळात जग सोन्याकडे वळते. भारतात परिस्थिती थोडी विचित्र आहे. शेअर बाजारात प्रचंड उतार-चढाव असताना सोने-चांदीच्या किमतीत प्रचंड घसरण सुरू आहे. किमती आणखी घसरतील म्हणून लोक नव्या खरेदीच्या भानगडीत पडत नाहीत. त्याचा परिणाम दागिन्यांच्या खरेदीवर झालेला आहे. लोक गुंतवणूक म्हणून मात्र सोन्यात आजही पैसा गुंतवत आहेत. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या ताज्या अहवालानुसार, २०२६ च्या मध्यापासून विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याची दणक्यात खरेदी केली आहे. त्यात चीनने आघाडी घेतली आहे. २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या खरेदीत ४२% वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत जागतिक केंद्रीय बँकांनी निव्वळ २८८.९ टन सोने खरेदी केले, जो दुसऱ्या तिमाहीतील आतापर्यंतचा उच्चांक आहे. पोलंड आणि चीन सोन्याचा साठा वाढवण्यात आघाडीवर राहिले आहेत. याशिवाय कझाकस्तान, उझबेकिस्तान, जॉर्डन, झेक रिपब्लिक, घाना आणि जॉर्जिया या देशांनीही खरेदी केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन खरेदी किंवा विक्री न करता आपला सोन्याचा साठा सुमारे ८८०.५२ टनांवर स्थिर ठेवला आहे. रशिया आणि तुर्की यांसारख्या काही देशांनी मात्र सोने दणक्यात विकले आहे. चीनची मध्यवर्ती बँक असलेल्या पीपल्स बँक ऑफ चायनाने गेली २४ महिने सातत्याने सोने खरेदी केले आहे. ऑक्टोबर २०२६ अखेर चीनचा सोन्याचा साठा २,४३५ टनांवर गेला आहे. पीपल्स बँक ऑफ चायनाने ऑक्टोबरमध्ये सुमारे २५.८ ते २६ टन सोने खरेदी केले, जी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक मासिक खरेदी आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत एकूण ६३ टन सोन्याची खरेदी करण्यात आली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या दहा महिन्यांत चीनने आपल्या राखीव साठ्यात घातलेली भर सुमारे १२९ टनांची आहे. ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्यामुळे चीनच्या सोन्याच्या साठ्याचे डॉलरमधील मूल्य सप्टेंबरमधील ३२३.५२ अब्ज डॉलरवरून ऑक्टोबरमध्ये ३०६.४१ अब्ज डॉलरवर खाली आले. परकीय चलन साठ्यात विविधता आणणे आणि अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करणे, हे चीनचे मुख्य धोरण आहे. चीनमधील शेअर बाजार आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील अस्थिरतेमुळे तेथील सामान्य गुंतवणूकदारही गोल्ड ईटीएफ आणि भौतिक सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या दरात झालेली घसरण लक्षात घेऊन पीपल्स बँक ऑफ चायनाने खरेदीचा वेग आणखी वाढवला. २०२६ मध्ये भारत आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या सोने बाजारपेठांमध्ये परस्परविरोधी कल पाहायला मिळाला आहे. भारतात सोन्याच्या उच्च किमतींमुळे वजनाच्या प्रमाणात देशांतर्गत मागणी १२% नी घटली, तर चीनमध्ये दागिन्यांपेक्षा गुंतवणुकीसाठीच्या बार, नाणी आणि ईटीएफ तसेच केंद्रीय बँकेच्या खरेदीमुळे मागणी मजबूत राहिली.

२०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत (जानेवारी–सप्टेंबर) भारताची एकूण सोन्याची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत १२% नी घटून ४४४ टनांवर आली आहे. मात्र, किमती चढ्या राहिल्याने खर्चाचे मूल्य ३८% नी वाढून ₹६,६८,८०० कोटींवर पोहोचले. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारताची एकूण मागणी वार्षिक आधारावर २९% नी घसरून १६२.५ टन राहिली. यामध्ये दागिन्यांची मागणी ९९.९ टन आणि बार व नाण्यांची मागणी ५५ टन राहिली. वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी २०२६ मध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ₹१.७० लाखांपर्यंत गेले होते. तसेच, मे २०२६ मध्ये सरकारने आयात शुल्कात वाढ केल्यामुळे आणि रुपया घसरल्यामुळे देशांतर्गत किमती चढ्या राहिल्या. महागड्या सोन्यामुळे ग्राहकांनी कमी वजनाचे आणि कमी कॅरेटचे दागिने खरेदी करण्यास प्राधान्य दिले. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या काळातही एकूण विक्रीत ४०% ते ६०% वाटा जुने सोने देऊन नवीन दागिने घेण्याचा होता, ज्यामुळे जानेवारी–ऑक्टोबरदरम्यान सोन्याची नवीन आयात १४% नी कमी (४७० टन) राहिली. भौतिक सोन्याची खरेदी घटली. गोल्ड ईटीएफमध्ये सलग पाच महिने गुंतवणूक वाढली असून डिजिटल गोल्डच्या खरेदीतही तिसऱ्या तिमाहीत ४.९ टन वाढ झाली आहे.

चीनमध्ये २०२६ मध्ये सलग दुसऱ्या वर्षी सोन्याच्या बार आणि नाण्यांमधील गुंतवणुकीची मागणी ही दागिन्यांच्या वापरापेक्षा अधिक राहिली आहे. चीनमधील शेअर बाजारातील अस्थिरता आणि सरकारी रोख्यांवरील कमी परतावा यामुळे स्थानिक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गोल्ड ईटीएफ खरेदी केले. २०२६ मध्ये ऑक्टोबरअखेर चिनी गोल्ड ईटीएफमध्ये ६२ टनांची भर पडून एकूण साठा ३१० टनांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला. २०२५ च्या अखेरीस चीनमध्ये झालेल्या व्हॅट सुधारणांमुळे सोन्याचे बार आणि नाण्यांच्या खरेदीला चालना मिळाली. सप्टेंबर २०२६ मध्ये चीनची सोन्याची आयात वार्षिक आधारावर ४१% नी वाढून १२९ टनांवर पोहोचली. पीपल्स बँक ऑफ चायनाने सलग २४ महिने सोन्याची खरेदी सुरू ठेवत ऑक्टोबर २०२६ मध्ये २६ टन सोने खरेदी केले, ज्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांचाही सोन्यावरील विश्वास अधिक दृढ झाला.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा