32 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरस्पोर्ट्समुंबईने उत्तराखंडला ८६ धावांनी लोळवले!

मुंबईने उत्तराखंडला ८६ धावांनी लोळवले!

Google News Follow

सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी २०२६ मध्ये मुंबईच्या संघाने आपला दबदबा कायम राखताना उत्तराखंडचा ८६ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २०९ धावांची भक्कम मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तराखंडचा संपूर्ण संघ १६.५ षटकांत अवघ्या १२३ धावांवर गारद झाला. मुशीर खान आणि अंगकृष रघुवंशी यांच्या आक्रमक अर्धशतकांनंतर मुंबईच्या गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी केली.

मुंबईकडून सलामीला आलेल्या अंगकृष रघुवंशी आणि हार्दिक तामोरे यांनी सुरुवातीपासूनच उत्तराखंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. या जोडीने अवघ्या ४.४ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. हार्दिकने केवळ १४ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३९ धावांची तडाखेबंद खेळी केली. तर अंगकृषने ३४ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावा फटकावत अर्धशतक पूर्ण केले.

त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुशीर खानने उत्तराखंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने ४० चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६५ धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याला सरफराज खानची उत्तम साथ मिळाली. सरफराजने अवघ्या १५ चेंडूंत ३१ धावा ठोकल्या. त्यामुळे मुंबईला दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. उत्तराखंडकडून रवींद्र नेगी आणि जगदीश सुचित यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.

२१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या उत्तराखंडची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. राहुल नमाला अवघ्या एका धावेवर, तर संस्कार रावत पाच धावांवर बाद झाला. आरवन महाजनने १५ धावांचे योगदान दिले. युवराज चौधरीला ११ धावाच करता आल्या. कर्णधार कुणाल चंदेलाने १२ चेंडूंत चार चौकारांसह १९ धावा केल्या; मात्र त्याची खेळीही संघाला सावरू शकली नाही.

शाश्वत डंगवालने २० चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावांची झुंजार खेळी केली. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. परिणामी उत्तराखंडचा डाव १२३ धावांवर आटोपला.

मुंबईकडून अथर्व अंकोलेकरने भेदक गोलंदाजी करत ३.५ षटकांत अवघ्या १७ धावा देत तीन बळी टिपले. मॅक्सवेल स्वामीनाथनने दोन बळी मिळवले, तर शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी करत मुंबईने या सामन्यात एकतर्फी विजय नोंदवला. मुशीर आणि अंगकृषच्या फटकेबाजीसह अथर्वच्या प्रभावी गोलंदाजीने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा