२०२३ हे वर्ष आता संपत असताना २०२४ हे वर्ष आता विविध संधींची नवी पहाट घेऊन येत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. संपूर्ण जग आज भारताकडे मोठ्या आशेच्या भावनेने बघत आहे. एका दृष्टीने भारताला जगाचे नेतृत्व करताना जगाला पाहायचे आहे, हाच जगाने भारताकडे बघण्यामागचा दृष्टीकोन आहे अस म्हटलं तर काही वावगं होणार नाही. या देशांत काही झालं नाही, देशातील लोकांच्या जीवनमानात कसलाही बदल झाला नाही, देशात बेरोजगारी वाढली आहे, अशी विधान करून न चा पाढा वाचणाऱ्या आणि नकारात्मकता पसरवणाऱ्या काँग्रेस आणि अन्य विचाराच्या पक्षांना या देशाची वाढलेली आर्थिक प्रगती लक्षात येत आहे. पण, कस असतं की झोपलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करता येत नाही. त्यामुळे या देशात होत असणारी प्रगती देशातील डावे, तथाकथित पुरोगामी आणि या विचारसरणीच्या लोकांना दिसत असून ते न दिसल्यासारखे करत आहेत. त्यांच्या या भ्रमाचा भोपळा येणाऱ्या निवडणुकीत देशातील जनता फोडल्याशिवाय राहणार नाही आणि आता देशातील सामान्य जनता मोदी वॉरियर्स म्हणून कामाला लागली आहे. नव्या वर्षाचा हाच त्यांचा संकल्प आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर काय काय बदल केले याची यादी सांगायची झाली तर वेळ अपुरा पडेल. पण, अगदी गाव खेड्यापासून ते शहरापर्यंत आपल्याला झालेले बदल हे दृश्य स्वरूपात दिसत आहेत आणि हेच सकरात्मक पद्धतीचे बदल विरोधी असणाऱ्या काँग्रेस आणि विविध पक्षांना बोचत आहेत म्हणूनच त्यांनी एकत्र येत इंडी आघाडीची स्थापना केली आहे. याला लोकशाही वाचवायची आहे, देश वाचवायचा आहे असली पालुपद लावून लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
देशात नरेंद्र मोदी नको हाच जर अजेंडा असेल तर मग मोदी नाही तर पर्याय काय? कोणता असा ठोस कार्यक्रम या इंडी आघाडीकडे आहे? इतका सामान्य प्रश्न या देशातील लोकांना काळत नसेल काय? तर नक्कीच या विषयावर आता लोक विचार करत आहेत आणि इंडी आघाडीबद्दल असलेली आपली मतही व्यक्त करत आहेत. लोकांना गृहीत धरून राजकारण करणे आणि निवडणुका जिंकणे हा काळ आता गेला आहे. काँग्रेसने आतापर्यंत हेच केले नेहमी लोकांना गृहीत धरले. अल्पसंख्यांक समाजाला नेहमी भीतीच्या वातावरणात ठेवण्याचे काम केले. हे आता त्यांच्याही लक्षात आले आहे. लोकांना काम करणारे कोण आणि भ्रष्टाचार करून आपली घर भरणारे कोण यातला आता फरक जाणवू लागला आहे. गेल्या ९ वर्षांच्या नरेंद्र मोदी यांच्या राजवटीवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. म्हणजे किती पारदर्शीपणे मोदी यांच्या ग्यारंटीसह या देशाचा कारभार चालू आहे हेच यातून स्पष्ट होत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने प्रचंड प्रगती केली आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर मोबाईल फोनचा जगात दुसरा सर्वाधिक आयातदार असलेला आपला भारत देश आज जगातला दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. यापूर्वी लस आयात करणारा आपला देश आता लस मैत्री उपक्रमाअंतर्गत संपूर्ण जगाला लस वितरित करत आहे. भारत आज उत्पादन निर्मिती क्षेत्रातला प्रमुख देश आहे. ज्या क्षेत्रांमध्ये भारताचे अस्तित्व नव्हते अशा ठिकाणीही स्वतःला प्रस्थापित करण्याची ताकद आज भारतामध्ये तयार झाली आहे. भारत आज तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे, हे इथ लक्षात घेण्यासारखी बाब आहे.
काय केले म्हणून गळे काढणारे या विषयावर तोंड उघडायला तयार नाहीत. काय बोलणार या विषयांवर? उत्पादन क्षेत्रात होत असणारी प्रगती या देशातील मोकळ्या हाताना रोजगार देणारी ठरत आहे. जर आपण केवळ मोबाईल हा घटक बघितला तर मोबाईल आयात करणाऱ्या देशात आपण पुढे होतो आता आपण मोबाईल निर्यात करू लागलो आहे. ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात हीच भरारी आपल्याला दिसते आहे. मोठ्या प्रमाणावर लोक वाहने खरेदी करत आहेत याचा अर्थ वाहनाचे उत्पादन किती मोठ्या प्रमाणात वाढले आहे. उत्पादन वाढले म्हणजे हाताला काम मिळाले असेच असते आणि दुसर्या बाजूनी विचार केला तर वाहने खरेदी करण्याची आर्थिक क्षमता तयार होते म्हणजे लोकांचा आर्थिक स्तर हा उंचावलेलाच आहे.
पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हेच नरेंद्र मोदी सरकारचे ध्येय असल्यामुळे आणि याच नीतीमत्तेनेच भारताला एकेकाळी नाजूक स्थितीमध्ये असलेल्या अर्थव्यवस्थामधून जगातील पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचवले आहे. येणाऱ्या काळात भारताला पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर नेण्याचा नरेंद्र मोदी यांचा मानस आहे आणि ते या भारताला तिथे पर्यंत नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत याची खात्री या देशातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला आहे आणि हाच मोदी ग्यारंटीचा करिष्मा आहे. या बद्दल जशी देशवासियांना खात्री वाटते तशीच या जगातील अन्य देशांच्या प्रमुखांनाही नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खात्री आहे. त्यामुळेच भारताला जगात सध्या इतका मानसन्मान मिळतो आहे.
आज जग माहिती आणि तंत्रज्ञान यामुळे जोडले गेले आहे. एका क्लिकवर जगात काय चालू आहे याची माहिती आता शहरच नाही तर गावात एखाद्या वाडी वस्तीवर बसून लोकांना समजते. त्यामुळे लोकही भूलथापांना बळी पडत नाहीत. या देशात आपल्याला आधार आहे अस वाटाव अस नेतृत्व नरेंद्र मोदी यांच असल्यामुळे लोकांना दुसरा आधार शोधण्याची काहीही गरज नाही हेच तीन राज्यात झालेल्या निकालातून स्पष्ट झाल आहे.
हे ही वाचा:
सरत्या वर्षाच्या शेवटच्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी घेतला देशाच्या यशाच्या आलेखाचा आढावा
जयंत पाटील भाजपाबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता
इम्रान खान निवडणूक लढण्यास अपात्र
‘सर्व निर्णय घेताना प्रथम असते फक्त राष्ट्रहित’!
काँग्रेस किंवा तयार झालेल्या इंडी आघाडीला नरेंद्र मोदी का नको आहेत तर आपली पोळी भाजायची बंद झाली आहे. काहीही करून नरेंद्र मोदी हटवणे हा अजेंडा घेऊन यात्रा सुरु होणार आहेत. इतक्या बैठका झाल्या केवळ हाच कार्यक्रम आणि यावरच चर्चा झाली आहे. तिथून गाडी अजून काही पुढ सरकलेली नाही आणि गाडी पुढ जशी सरकायला लागेल तस महाराष्ट्रात जसा सध्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात वाद सुरु आहे तशीच परिस्थिती अन्य राज्यात सुद्धा होणार आहे. त्यामुळ इंडी आघाडीच्या रथाच चाक जागेवर रुतल्याशिवाय राहणार नाही.