भारताने १९९८ मध्ये पोखरणमध्ये अणुस्फोट केला त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नो फर्स्ट यूजचे धोरण जाहीर केले. भारताच्या अणुसज्जतेमुळे हबकलेल्या जगाला शांत कऱण्यासाठी वाजपेयींनी हा मास्टर स्ट्रोक हाणला होता. भारत एक जबाबदार देश आहे, पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, अशी जगाला हमी देणारे हे धोरण होते. या धोरणाबाबत भारत फेरविचार करतो आहे का? गेल्या काही वर्षात तसे संकेत मिळाले आहेत. दोन दिवसांपूर्वी भारताने केलेल्या अग्नि-५ या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे या चर्चेला पुन्हा एकदा जोर आलेला आहे.
ओडीशातील चांदीपूरमधून अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कऱण्यात आली. सगळ्या जगाचे यावर लक्ष होते. मल्टीपल इंडीपेंडण्ट टार्गेटबल रिएण्ट्री व्हेहीकल या श्रेणीत मोडणारे हे क्षेपणास्त्र आहे. पाच हजार किलोमीटरचा पल्ला असलेले एकाच वळी अनेक ठिकाणी मारा करण्याच्या क्षमता असलेले. म्हणजे या क्षेपणास्त्रात अनेक पेलोड अर्थात स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणांना लक्ष्य करणे शक्य आहे. सगळा चीन, युरोपचा काही भाग या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतो. ही चाचणी म्हणजे भारताच्या वाढत्या सामरीक सज्जतेचे दर्शन जगाला झाले. अमेरिकेशी वाढलेला तंटा, चीनसोबत निर्माण झालेली जवळीक, बदलेली भूराजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर ही चाचणी करण्यात आली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे भारतातून अफगाणिस्तानला रवाना झाल्यानंतर ही चाचणी झाली हेही विशेष.
एमआयव्हीआर तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या अग्नी-५ ची चाचणी म्हणजे केवळ तांत्रिक यश नव्हे, तर जागतिक सामरिक समीकरणात नवा अध्याय आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या वाढत्या सामर्थ्याबाबत दिलखुलासपणे बोलणारे अमेरिकी विश्लेषक डेरेक ग्रॉसमन यांना प्रश्न पडलाय की भारत खरंच आपल्या “नो फर्स्ट यूज” धोरणावर कायम आहे का?
१९९८ च्या पोखरण अणुचाचणीनंतर भारताने अधिकृतपणे जाहीर केले की, भारत कधीही प्रथम अणुहल्ला करणार नाही. फक्त शत्रूने भारतावर अणुहल्ला केला तरच प्रत्युत्तर दिले जाईल. या धोरणामागे दोन गोष्टी होत्या. भारताची शांतताप्रिय व जबाबदार अणुशक्ती अशी प्रतिमा जगासमोर उभी करणे. चीन-पाकिस्तानसारख्या शेजाऱ्यांविरुद्ध विश्वसनीय परंतु बचावात्मक अणु प्रतिकार (Credible Minimum Deterrence) उभारणे.
अग्नी-५ मधील एमआयआऱव्ही तंत्रज्ञानामुळे हा सवाल अनेकांच्या मनात डोकावलाय. एकाच क्षेपणास्त्रातून वेगवेगळ्या ठिकाणी अनेक अण्वस्त्रांचा मारा करण्याची क्षमता जगातील अमेरिका, रशिया, चीन या देशांकडे होती. ती आता भारताकडेही आहे. शत्रूचे क्षेपणास्त्र तळ, कमांड सेंटर, रडार किंवा हवाई संरक्षण प्रणालींवर एकाच वेळी हल्ला करणे यामुळे शक्य आहे. एकाच वेळी दोन शहरांना दणका देणे शक्य आहे. हे तंत्रज्ञान फक्त बचावात्मक नाही, तर आक्रमक आहे, हे ग्रॉसमन यांच्यासारख्या अनेकांना वाटते.
जर भारत खरोखरच नो फर्स्ट यूज या धोरणाव कायम असेल तर एमआयआऱव्ही सारखी आक्रमक क्षमता विकसित करण्याची गरज का? ही क्षमता शत्रूच्या अण्वस्त्रांचा पहिल्या टप्प्यात नाश करण्याची हमी देणारी आहे. त्यामुळेच पश्चिमी विश्लेषकांचा भारताच्या धोरणाबाबत गोंधळ उडाला आहे. भारतीय विश्लेषक मात्र या दाव्यात दम नसल्याचे सांगतात. जर शत्रूने प्रथम अणुहल्ला केला, तरी भारताकडे पुरेसा प्रत्युत्तरात्मक पर्याय राहावा म्हणून ही तयारी आहे. भारताचा शेजार अत्यंत तापदायक आहे.
चीनकडे आधीच एमआयआरव्ही तंत्रज्ञान आहे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत. चीनच्या सगळ्या तंत्रज्ञानाची चाचणी पाकिस्तान मार्फतच केली जाते. त्यामुळे भारताला सर्वबाबतीत सज्ज राहणे अनिवार्य आहे. तेच भारत करतो आहे. नो फर्स्ट यूजचे धोरण भारताने अजून बदललेले नाही, पण तयार राहण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रमाणात लवचिकता ठेवली आहे. हा दृष्टीकोन काही नवा नाही.
माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी त्यांच्या चॉईसेस या पुस्तकात सूचक विधान केले होते की, “जर भारताला शत्रू देशाकडून अण्वस्त्रांचा धोका असल्याची खात्री असेल तर नो फर्स्ट यूज धोरणाचे काटेकोर पालन आवश्यक नाही.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या ताज्या लडाख भेटीत म्हटले होते, की “आजपर्यंत भारताने नो फर्स्ट यूजचे धोरण पाळले, परंतु भविष्यात काय होईल, हे परिस्थितीवर अवलंबून असेल.” त्यामुळे डेरेक ग्रॉसमन यांना जे वाटते ते अगदीच बिनबुडाचे नाही. बरं ग्रॉसमन हे भारत विरोधी नाहीत. भारताच्या सामर्थ्याबाबत आदर बाळगणारा आणि त्याचे कौतुक असलेला हा विश्लेषक आहे.
हे ही वाचा:
“डी.के. शिवकुमार कर्नाटकाचे मोठे कलाकार, त्यांना गांभीर्याने घेऊ नका”
मुख्यमंत्री रेखा गुप्ता प्रकरण: आरोपीला ₹२००० पाठवणाऱ्याला घेतले ताब्यात!
“छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांची अमानुष क्रूरता: तिरंगा फडकवल्याबद्दल तरुणाची हत्या!”
“पंतप्रधान मोदी बिहारला आले की महाआघाडीचे नेते थरथर कापतात”
पाकिस्तानचे पडेल फिल्ड मार्शल आसीम मुनीर पुन्हा त्यांच्या ताज्या अमेरिका भेटीत भारताबाबत बरळले आहेत. त्यांना भारत ही चकचकीत मर्सिडीज आणि पाकिस्तान हा डंपर वाटतो आहे. दोघेही एकमेकांवर आदळले तर मर्सिडीजचे काय होईल, असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. ते भारताला सांगण्याचा प्रय़त्न करतायत, हम तो डुबेंगे सनम आधी दुनिया को लेकर डुबेंगे. ज्यांच्या नशीबी असे शेजारी आहेत, ते काय पाकिस्तान किंवा चीनकडून अण्वस्त्रांचा हल्ला होण्याची वाट पाहणार?
सुदैवाने आपल्या अण्वस्त्रांची बारीक नजर पाकिस्तान आणि चीनवर आहे. त्यांनी आपल्या अण्वस्त्रांच्या गोदामाचे दार सुद्धा किलकिले केले तर भारताच्या लक्षात येईल की यांचे इरादे ठीक नाहीत. तेव्हाच त्यांना चेपण्यासाठी, त्यांचे अण्वस्त्रांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी जी क्षमता लागते ती भारत विकसित करतो आहे. तुम्ही पिस्तुलाला हात घालण्यापूर्वी तुमच्या मस्तकात आमची गोळी शिरली असेल, अशा प्रकारची ही सज्जता आहे. तुमच्याकडे जितके अण्वस्त्रांचे तळ आहेत, तेवढ्या ठिकाणी एकाच वेळी मारा करून पाकिस्तानचे राम नाम सत्य करण्याची ताकद भारताकडे आहे. त्यातली आवश्यक तेवढी ताकद जगाला दाखवली जाते. जेणे करून कोणी उगाच भारताच्या नादाला लागू नये.
या तयारीमुळे जगाला जर असे वाटत असेल की भारत हळूहळू नो फर्स्ट यूज बाजूला ठेवण्याच्या तयारीत आहे, तर वाटू दे. भारताला त्याची चिंता करण्याचे काही कारण नाही. भारताने नो फर्स्ट यूजचे धोरण बाजूला ठेवले तर दक्षिण आशियातील अणु शस्त्र संतुलन बिघडू शकते, असे जर अमेरिका व पाश्चिमात्य विश्लेषकांना वाटत असेल तर तेही वाटू दे.
चीनला भारताच्या एमआयआरव्ही क्षमतेचा सर्वाधिक धोका आहे, कारण हे तंत्रज्ञान बीजिंगसह शाघायचा एकाच वेळ काटा ढीला करू शकते. तरीही या चाचणीच्या विरोधात चीनने संयमी प्रतिक्रीया दिली आहे. भारतावर टीका करणे टाळले आहे. सगळ्यात जास्त तंतरली आहे, ती पाकिस्तानची. बंकरमध्ये घुसलेल्या पाकिस्तानींचा काटा काढण्याची क्षमता या अग्नि-५ मध्ये आहे. त्यामुळे पुढल्या वेळी मुनीर बंकरमध्ये सुरक्षित राहतील याची कोणतीही हमी नाही.
भारताने अद्याप नो फर्स्ट यूज धोरण अधिकृतपणे रद्द केलेले नाही, परंतु अग्नी-५ च्या चाचणीतून स्पष्ट संदेश दिला आहे की वेळ पडल्यास आम्ही आक्रमकही होऊ शकतो. तर आवश्यक असल्यास पहिला प्रहार करू शकतो. भारत शांतताप्रिय असला, जबाबदार असला तरी तो एका वळणावर उभा आहे. देशाच्या सुरक्षेसाठी वाट्टेल ते करू शकतो.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







