गुप्तचर संस्था त्यांच्या गोपनीय ऑपरेशनमध्ये गँगस्टरचा वापर करतात अशी वदंता असली तरी आजवर हे उघड झालेले नाही. भविष्यात ते कधी उघड होण्याची शक्यताही नाही. एकेकाळी पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या गँगस्टरची किंवा दहशतवाद्याची हत्या झाली की, ‘त्याला आम्हीच ठोकले’ अशा दावा छोटा राजन गँगकडून केला जायचा. अलिकडे असा दावा लॉरेन्स बिश्नोई तिहार जेलमध्ये बसून करतोय.
एनआयएने काल कॅनडात वास्तव्यास असलेल्या आणि भारतविरोधी कारवाया करणाऱ्या ४२ खतरनाक गँगस्टरची यादी जाहीर केली होती. त्यातील एक गँगस्टर सुखदुल सिंह उर्फ सुखा याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. कॅनडाचा रहिवासी असलेल्या खलिस्तानी टायगर फोर्सशी संबंधित हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून आधीच भारत आणि कॅनडाचे संबंध ताणलेले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी ‘या हत्येशी भारतीय गुप्तचर संस्थांचा संबंध असून हा आमच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे’, असा जाहीर आरोप भारतावर केला आहे. कॅनेडीयन सरकारने भारतीय दुतावासातील अधिकारी पवनकुमार राय यांची हकालपट्टी केली. हे भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च एण्ड एनॅलिसिस विंग या भारतीय गुप्तचर संस्थेचे काम आहे, असा दाट संशय कॅनेडाला आहे.
भारताने हा आरोप फेटाळला असून कॅनडाला जशास तसे उत्तर देत भारतातील कॅनेडीय उच्चायुक्त कॅमरून मॅक्के यांची खरडपट्टी काढली. कॅनेडीयन राजनैतिक अधिकारी ऑलिव्हर सिल्वेस्टर यांना पाच दिवसात भारत सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. कॅनडा सरकारने आणखी एक कुरापत काढली. भारतात जाणाऱ्या कॅनेडीयन नागरीकांसाठी भारतात जाणे धोकादायक आहे, अशी इशारत जारी केली आहे. भारताने यालाही जशेच्या तसे उत्तर दिले. ट्रुडो फक्त एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी निज्जरच्या हत्येप्रकरणी अमेरिका, ब्रिटन, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांकडे दाद मागितली. परंतु त्यांना कोणीही प्रतिसाद दिलेला नाही. अशा तापलेल्या वातावरणात कॅनडात आता आणखी सुखदुल सिंह उर्फ सुखाची हत्या झाली आहे. बिश्नोईने ही हत्या आपणच केली असे जाहीर केल्यानंतर अनेकांना छोटा राजनच्या कारवायांची आठवण झालेली आहे.
हे ही वाचा:
भारताचा कॅनडाला दणका; व्हिसा सेवा स्थगित
हे आहेत कॅनडाशी संबंधित दहशतवादी !
दहशतवादी घोषित करताच निज्जरला मिळाले होते नागरिकत्व
डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरच्या अकाऊंटवरून वडिलांचे निधन झाल्याचे ट्वीट
१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत पाकिस्तान पुरस्कृत बॉम्बस्फोट झाल्यानंतर दाऊद टोळीत फाटाफूट झाली. छोटा राजन त्याच्यापासून वेगळा झाला. ब़ॉम्बस्फोट झाला तेव्हा दाऊद आणि छोटा राजन दोघेही दुबईत होते. मुंबईत जे काही घडले त्याबद्दल राजनने दाऊदकडे विचारणा केली होती. त्यामुळे दाऊद आपलाही काटा काढणार हे त्याला ठाऊक होते. संधी मिळताच राजन दुबईत निजाम कोकणी या साथीदारासह निसटला. दुबईतून पसार झाला. त्याने मलेशिया गाठले तिथून तो बॅंकॉकमध्ये गेला. इथेच त्याच्यावर दाऊदचा हस्तक विनोद मिश्रा याने हल्ला झाला. परंतु दाऊदच्या दुर्दैवाने राजन बचावला आणि तिथून निसटला.
२०१५ मध्ये त्याला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी बाली येथून अटक केली. सध्या तो भारतात आहे. छोटा राजनने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गर्जना केली होती की तुरुंगात असेन वा तुरुंगाबाहेर, भारतात असेन वा भारताबाहेर आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मी दाऊदशी लढेन. अर्थात त्या आधीही त्याने दाऊद टोळीतील अनेकांना ठोकले होते. मुंबई बॉम्बस्फोट कटाशी संबंधित अनेक जण या यादीत आहेत.
दुबईत १९९५ मध्ये दाऊदचा शार्प शूटर सुनील सावंत उर्फ सावत्या याचा काटा काढला. नेपाळमध्ये दाऊद टोळीचे जाळे निर्माण करणारा खासदार मिर्जा दिलशाद बेगची हत्या केली. त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामागे असलेल्या शरद शेट्टी आणि विनोद मिश्रालाही ठोकले. मुंबई बॉम्बस्फोट कटाशी संबंधित ड्रग माफीया फिलू खान, दाऊदाचा साथीदार याकूब खान उर्फ येडा याकूबचा भाऊ माजीद खान, सलीम कुर्ला, शकील अहमद, मोहमद जिंद्रा, हनीफ कडावाला यांच्या सह दहा जणांचा राजन टोळीने खात्मा केला.
छोटा राजनची यादी मोठी आहे, त्या तुलनेत बिश्नोईने आता कुठे सुरूवात केली आहे. वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे छोटा राजन आता शांत झालेला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत लॉरेन्स बिश्नोईचे नाव जोरात आहे. बिश्नोई सुद्धा तिहारमध्ये आहे. पंजाब फिरोजपूरमध्ये जन्माला आलेला लॉरेन्स उच्च शिक्षित आहे. त्याने एलएलबी केलेले आहे. त्याचे वडील हरयाणा पोलिस दलात कॉन्स्टेबल होते. कॉलेजच्या काळात गँगस्टर गोल्डी ब्रार उर्फ सतिंदर सिंह याच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या गुन्हेगारी कारावायांना जोर आला.
सुखदुल सिंह उर्फ सुखा याला काल गोळ्या घालून ठार करण्यात आले. हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप दल्लाचा खास साथीदार होता. लॉरेन्सने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. लॉरेन्सने यापूर्वी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. अभिनेता सलमान खान यालाही जीवे मारण्याची धमकी त्याने दिली आहे. सुखा ड्रग एडीक्ट होता, त्याला त्याच्या पापाची सजा मिळाली, असे लॉरेन्स गँगने त्याच्या हत्येनंतर सोशल मीडियावर जाहीर केले. ‘देशाचे शत्रू जगाच्या पाठीवर कुठेही असो त्यांना त्यांच्या पापाची सजा देणारच’, अशी गर्जना त्याने केली आहे. देशभरात लॉरेन्स टोळीचे ७०० शूटर्स आहेत असे म्हणतात.
गेल्या दोन तीन वर्षात भारत, पाकिस्तान, ब्रिटन, कॅनडात अशा अनेक जणांच्या हत्या झाल्या जे कधी काळी भारतविरोधी कारवाईत सामील होते किंवा मोस्ट वॉण्टेड होते. खलिस्तानी टायगर फोर्सचा हरदीप सिंह निज्जर, याची सुरे, ब्रिटीश कोलंबिया, येथे १८ जून २०२३ रोजी हत्या झाली होती. त्याचे आय़एसआयशी संबंध होते. गुरुद्वारातून बाहेर येताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली.
आयएसआयशी हातमिळवणी करून ब्रिटनमध्ये खलिस्तान चळवळ चालवणारा अवतार सिंह खांडा, याचा बर्मिंगहॅम येथील एका हॉस्पिटलमध्ये १५ जून रोजी संशयास्पदरित्या मृत्यू झाला. अन्नातील विषबाधेच्या कारणावरून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्याच्या मृत्यूचे कारण ब्लड कँसर असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट म्हटले असले तरी त्याच्या साथीदारांनी मात्र खांडाची हत्या झाली असून त्या मागे रॉ असल्याचा दावा केला आहे. खांडा ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा म्होरक्या अमृत पालचा हँडलर होता. अमृतपालला नवा भिंद्रावाले म्हणून उभा करण्याचे आयएसआयचे षडयंत्र होते. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी ते उलथून टाकले. अमृतपाल सध्या आसामच्या जेलमध्ये आहे.
गेल्या तीन वर्षात काही खतरनाक, भारतविरोधी दहशतवाद्यांच्या हत्या झाल्या आहेत. या हत्यांमागे कोणाचा हात आहे, हे मात्र उघड झालेले नाही. ६ मे २०२३ मध्ये खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमजीत पंजवार याची लाहोरमधील सन फ्लावर हाऊसिंह सोसायटीबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. तो मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता. हा आय़एसआयचा प्रमुख मोहरा होता. जनरल अरुण वैद्य यांच्या हत्येत तो सहभागी होता. २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून झालेल्या इंडियन एअर लाईन्सच्या आयसी ८१४ विमान हायजॅक प्रकरणातील आरोपी जहूर इब्राहीम मिस्त्री याची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली. या विमानातील रुपेन कट्याल या प्रवाशाची हत्या यानेच केली होती.
या सर्व हत्या एकाच प्रकारे झालेल्या आहेत. दोन हल्लेखोर मोटार सायकलवरून आले, ऑटोमॅटीक रायफलने गोळ्या घालून पसार झाले. यातील एकही हल्लेखोर असून संबंधित देशातील तपास यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत. प्रत्येक वेळा या हत्यांमागे भारतीय गुप्तचर यंत्रणा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. परंतु कोणताही पुरावा मिळाला नाही. भारताच्या शत्रूंना रॉची धास्ती वाटू लागली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)