29.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरसंपादकीयएक दिवसाआड झालेल्या पत्रकार परिषदांचा अजब योगायोग!

एक दिवसाआड झालेल्या पत्रकार परिषदांचा अजब योगायोग!

Google News Follow

Related

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर, मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल केला. ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ या उपक्रमाच्या विरोधात आदळआपट केली. एकगठ्ठा मतपेढीला आश्वस्त केले की, आम्ही गप्प बसलो नाही, तुमच्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात लढायला सज्ज आहोत. २४ सप्टेंबर रोजी ही पत्रकार परिषद झाली. योगायोग म्हणजे एक दिवस आधी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेची पत्रकार परिषद झाली. देशातील न्यायपालिका पूर्णपणे अपयशी झालेली आहे, असा दावा मौलाना मेहमुद मदनी यांनी या पत्रकार परिषदेत केला. दोन घटनात्मक संस्थांना दिवसाआड झालेल्या पत्रकार परिषदांमधून लक्ष्य करण्यात आले. हा जर योगायोग असेल तर तो अजब योगायोग आहे.

देशात काँग्रेसची एक इकोसिस्टम कार्यरत आहे. ती मजबूत आहे. सगळे घटक परस्पर समन्वयाने काम करत असतात. त्यांच्या रणनीतीत कमालीचे सामंजस्य, समन्वय दिसतो. संसद, प्रशासन, न्यायपालिका, निवडणूक आयोग या खांबांवर देशाची लोकशाही तरलेली आहे. काँग्रेसने बदनामीचे शेणगोळे फेकून या घटनात्मक संस्थांना सातत्याने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. हा मारा फक्त एका बाजूने होत नाही. सगळेच या दिशेने कामाला लागले आहेत.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेबाबत बरीच चर्चा झाली. तुलनेने मौलाना मदनी काय बोलले, याकडे फार लोकांचे लक्ष गेले नाही. जमियत उलेमा-ए-हिंद ही मुस्लिमांची अत्यंत जहाल अशी देशव्यापी संघटना आहे. संघटनेचे लोक देशभरात फिरून मुस्लिमांना कट्टरतेचे धडे देत असतात. या संघटनेची तातडीची कार्यकारिणी नवी दिल्लीतील त्यांच्या बहादूरशाह जफर मार्गावरील केंद्रीय कार्यालयात पार पडली.

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मौलाना मदनी जे काही म्हणाले, त्यातून त्यांची मानसिकता उघड होते. त्यांची शब्दांची निवड, त्यातील चतुराई आणि छुपा अर्थ लक्षात घ्या. “देशात आधी मॉब लिंचिंग झाले, त्यानंतर घरांवर बुलडोझर कारवाई सुरू झाली. आता तीच कारवाई मदरसे, दर्गे आणि मशिदींवर सुरू आहे, हे रोखण्यात देशाची न्यायपालिका पूर्णपणे अपयशी झाली आहे. देशातील दुसरी मोठी लोकसंख्या असलेल्या धर्माबाबत आणि सर्वात मोठ्या अल्पसंख्याकांबाबत हे घडते आहे. शरियात हस्तक्षेप केला जातो आहे. ही घुसमट देशाला अराजकाकडे घेऊन जाणारी आहे. आम्ही हतबल असलो तरी आमच्याकडे लढण्याचा पर्याय शिल्लक आहे.”

काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि त्यांचा एकगठ्ठा मतदार यांच्या मानसिकतेत एक विलक्षण साम्य आहे. आपण कधीच चुकत नाही, चूक कायम दुसऱ्याची असते, यावर दोघेही ठाम असतात. कोणत्या मॉब लिंचिंगबाबत मदनी बोलतायत? एक अखलाखचे तुणतुणे ते बराच काळ वाजवत राहिले, त्यानंतर ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देत उदयपूरचा कन्हैयालाल, अमरावतीचे उमेश कोल्हे, गुजरातमधील किशन भरवाड, लखनऊचा कमलेश तिवारी… किती जणांच्या हत्या झाल्या? देशात हिंदू बहुसंख्य असताना हे घडते आहे, उद्या तो अल्पसंख्याक झाला तर काय होईल, याची कल्पनाच करवत नाही.

बुलडोझर लावून घरे कोणाची उद्ध्वस्त करण्यात आली? दहशतवादी, बलात्कारी, माफियांची. बुलडोझर लावून जे मदरसे, मशिदी, दर्गे उद्ध्वस्त करण्यात आले, त्यातले किती अधिकृत होते? मदरसे आणि दर्गे तर सरकारी जमिनी हडपण्याचे हत्यार बनले आहेत. मदनींची समस्या अशी आहे की, काँग्रेसच्या कार्यकाळात त्यांना दंगली करण्यापासून सरकारी, बिनसरकारी जमिनी मशिदी आणि मदरशांच्या नावाखाली लाटण्याची मुभा होती. आता या जमिनी मोकळ्या करण्यात येत आहेत. हे अतिक्रमण इतके व्यापक आहे की, त्याचा आपल्याला अंदाज येऊ शकत नाही. मालाड पश्चिमेतील मालवणीमध्ये किमान ८० अनधिकृत मशिदी आहेत. आरेच्या जंगलात दर्ग्याच्या नावाखाली कित्येक एकर जमीन लाटण्यात आली होती. अलीकडेच राज्य सरकारने त्यावर बुलडोझर फिरवला. प्रत्येक मुस्लिम पॉकेटमध्ये हेच चित्र आहे. जिथे मुस्लिम फार संख्येने नाहीत, तिथेही मोठमोठ्या मशिदी, मदरसे ठोकण्यात येतात. ती बांगलादेशी, रोहिंग्यांसाठी निवाऱ्याची तात्पुरती जागा बनते. अनधिकृत झोपड्यांमध्ये मुक्काम हलवेपर्यंत इथे निवारा मिळतो.

हे ही वाचा:

सचिननंतर विराटची १५ हजारी झेप!

नेपाळमध्ये हिमलुंग हिमालवर भीषण हिमस्खलन

थकलेले वाहतूक चलान वीज बिलात टाका!

भारतात ७ हजार वनडे धावा; विराट कोहलीने रचला विश्वविक्रम!

सरकार आता कायद्याच्या चौकटीत या जमिनी मोकळ्या करते आहे, तर मदनी यांना अस्वस्थ होण्याचे काय कारण? पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंची अवस्था पाहता, भारतात मुस्लिम किती सुखी आहेत, असा विचार मदनी यांच्यासारख्यांच्या मनात येणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व भाजपशासित राज्यांत समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली. त्याचाही मदनी यांना त्रास होतो आहे. एका बाजूला ते म्हणतायत, “आम्ही कायद्याच्या चौकटीत लढणार”, दुसऱ्या बाजूला म्हणतायत की, “आंतरराष्ट्रीय मंचावर आम्ही हा विषय उपस्थित करू.” याचा अर्थ देशाच्या कायद्यावर तुमचा विश्वास नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून देशात मुस्लिमांचा टक्का हिंदूंच्या लोकसंख्येपेक्षाही वेगाने वाढतो आहे, ते काय अन्याय-अत्याचार होतायत म्हणून?

कायद्याच्या चौकटीत जगावे लागले तर लगेच यांची घुसमट होते. ही मंडळी लढण्याची भाषा करू लागतात. जिथे यांना धार्जिणी सत्ता असते, तिथे लव्ह जिहाद, लँड जिहाद, हिंदूंच्या मंदिरांवर कब्जा असे सगळे प्रकार जोरात असतात. आम्हीही या देशाचे बरोबरीचे नागरिक आहोत, असे म्हणायचे आणि जेव्हा कायदे पाळण्याची वेळ येते, तेव्हा घुसमट होत असल्याची भाषा करायची, देशाला अराजकाच्या धमक्या द्यायच्या.

हाच या दोन पत्रकार परिषदांमधील समान धागा आहे. राहुल गांधी सुद्धा अराजकाची भाषा बोलतायत, मदनी सुद्धा. बांगलादेशात तथाकथित ‘जेन झी’ क्रांती झाल्यापासून राहुल गांधींना अराजकाची स्वप्ने पडतायत; कारण निवडणूक न लढता सत्तेवर येण्याचा हाच एक मार्ग त्यांच्याकडे शिल्लक आहे. देशातील मुस्लिम वगळता आता काँग्रेसला मतदान करण्याची इच्छा कोणालाही नाही. मदनी सुद्धा सांगतायत, देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे. राहुल गांधी सांगतायत, निवडणूक आयोग भ्रष्ट आहे, मोदी-शाहांच्या तालावर नाचतो आहे. मदनी सांगतायत, न्यायपालिका अपयशी झालेली आहे.

या दोन पत्रकार परिषदांतील साम्य फक्त इथे संपत नाही. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर टीका केली. मदनी यांनी न्यायपालिका आणि मोदी सरकारवर टीका केली. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनबाबत प्रश्न विचारल्यानंतर मदनी यांनी त्या विषयावर फार मत व्यक्त केले नाही. ते म्हणाले, “हाही विषय आहे, परंतु मला सध्या निवडणुकांच्या विषयावर बोलायचे नाही.” कारण तसेच ठरले असावे – राहुल गांधी निवडणुकांबाबत बोलतील आणि यांनी न्यायपालिकेच्या विरोधात एल्गार करायचा! म्हणजे या दोघांचे सेटिंग आहे, हे कोणाच्या फार लक्षात येणार नाही.

स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम सुरू झाल्यापासून काँग्रेस पक्ष याच्या विरोधात आहे. ताज्या पत्रकार परिषदेतही राहुल गांधी या उपक्रमाच्या विरोधात बोलले. एसआयआरची सुपारी राहुल गांधी यांनी घेतलेली आहे, यावरून पुरेसे स्पष्ट व्हावे.

अराजक आणि रक्तपाताची धमकी देऊन एकदा मुस्लिमांनी देशाची फाळणी केली. आता पुन्हा एकदा अराजकाची भाषा ही मंडळी बोलू लागली आहेत. यावेळी फक्त त्याला घटना, कायद्याची चौकट या शब्दांचा तडका दिला जातो आहे. यांना देशाचा कायदा मान्य असता तर आंतरराष्ट्रीय समुदायाकडे दाद मागण्याची यांनी भाषाच केली नसती. ही भाषा करतानाही चतुराई करतात – “आम्ही भारताच्या मित्रदेशांकडे जाऊन हा विषय मांडू, भारताला रुळावरून घसरू देणार नाही.” म्हणजे कोणाकडे? यूएई, सौदी, कतार, ओमानसारखे तेलसंपन्न देश भारताच्या अधिक जवळ आले आहेत, त्यांच्याकडे! ते मदनींचे ऐकून भारताशी पंगा घेतील काय? लोकांना या भाषेतली गोम समजू लागली आहे.

आता फक्त राहुल गांधी यांची भाषा आणि मदनी यांच्या भाषेत जो परस्परसंबंध आहे, तो समजून घेण्याची गरज आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा