26 C
Mumbai
Monday, December 22, 2025
घरसंपादकीयनाना, मग सोनियांना पाठवा ना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला

नाना, मग सोनियांना पाठवा ना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला

Google News Follow

Related

देशभरात दसरा दिवाळीचा माहोल आहे, चौका चौकात राम मंदिराची प्रतिमा असलेले ध्वज लावण्यात आले आहेत. रिक्षावाले, टपरीवाले, गृहनिर्माण संस्थांमध्ये वातावरण भगव झालेले आहे, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भंडारा, पूजा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांचे डोळे या उत्सवी वातावरणामुळे दिपणे स्वाभाविक आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदीर निर्मितीचे श्रेय दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पदरात टाकले आहे.

राम मंदीराची निर्मिती होते आहे. त्याचा फायदा भाजपाला होतोय, या विचाराने काँग्रेस आणि अन्य पक्षांचे नेते प्रचंड अस्वस्थ आहेत. राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होतो आहे. एप्रिलमध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका होतायत. भाजपाने ४०० पार… चे लक्ष आधीच जाहीर केलेले आहे. एकूण वातावरण पाहाता ४०० पार… फार कठीण नाही हे विरोधकांच्याही लक्षात आलेले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले की राम मंदीर बांधण्याचा निर्णय राजीव गांधी यांच्या काळात झाला. शिलान्यासही त्यांच्याच कार्यकाळात झाला. परंतु, आता संघ आणि भाजपा मतांच्या राजकारणासाठी या मुद्द्याचा दुरूपयोग करीत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी पवारांची री ओढली आहे. राजीव गांधी यांच्या काळात मंदिराचे दरवाजे उघडण्यात आल्याचे पटोले म्हणाले आहेत.

अर्धसत्य सांगणे हा शरद पवारांचा आवडता उद्योग आहे. राम मंदीराचा शिलान्यास राजीव गांधी यांच्या कार्यकाळात ९ नोव्हेंबर १९८९ रोजी झाला असला तरी तो काँग्रेसने केला नव्हता. राम मंदिराचे आंदोलन सुरूवातीपासून विश्व हिंदू परिषदेने पुढे नेले. शिलान्यासही विश्व हिंदू परिषदेने केला होता. पवारांच्या माहितीसाठी, राजीव गांधींनी शिलान्यासाला परवानगी दिली त्याचे कारणही राजकीय होते. शिलान्यास ९ नोव्हेंबर रोजी झाला. तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी होते. २२ नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. इंटेलिजन्स ब्युरोने राजीव गांधींना अहवाल दिला होता की, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा पराभव होतो आहे. शिलान्यासाला परवानगी दिली तर हिंदूंची मतं आपल्या पारड्यात पडतील, असा हिशोब करून राजीव गांधी यांनी शिलान्यासाची परवानगी दिली. तरीही काँग्रेसला त्याचा फायदा झाला नाही. कारण काँग्रेसची मानसिकता हिंदूविरोधी आहे, हे जनतेला कळून चूकले होते. १९८९ नंतर आजतागायत उत्तर प्रदेशात काँग्रेसचे राज्य आलेले नाही. त्यामुळे राम मंदीराचे राजकारण करत असल्याचा ठपका पवारांनी भाजपावर ठेवण्याचे कारण नाही.

शरद पवारांनी २६ एप्रिल १९९० रोजी मुख्यमंत्रीपदी असताना समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. परंतु, याच पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची चूल मांडल्यानंतर मराठा विरुद्ध ब्राह्मण अशी तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते असा प्रचार सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही, कारण त्यांचा जाणता राजा असा उल्लेख समर्थ रामदासांनीच केला होता, ही चिथावणीही शरद पवारांची. याचा अर्थ काय की शरद पवारांनी समर्थांच्या पुतळ्याचे अनावरण केले म्हणजे ते समर्थांचे दास किंवा भक्त ठरत नाहीत. हा निकष राजीव गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला लागू होतो. यूपीएच्या काळातील काँग्रेस पक्ष तर हिंदूद्रोही होता. रामायण काल्पनिक आहे, असे प्रतिज्ञा पत्र न्यायालयात करणारी काँग्रेस होती, राम सेतू उद्ध्वस्त करायला निघालेली काँग्रेस होती. नाना पटोले आता राम मंदीराचे श्रेय काँग्रेसच्या झोळीत टाकण्याचा प्रयत्न करतायत. परंतु, त्यांच्या नेत्या सोनिया गांधी आणि त्यांचे रबर स्टँप अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हे श्रेय कधीच भाजपाच्या झोळीत टाकले आहे.

राजीव गांधी यांना जर राम मंदिराबाबत इतकी आस्था होती, तर त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर सोनिया गांधी यांनी पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी यूपीएच्या कार्यकाळातच राम मंदीराचा मार्ग प्रशस्थ केला असता. परंतु राम मंदीराची फास्ट ट्रॅक सुनावणी सुरू व्हायला नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे लागले. मोदींच्या सरकारने न्यायालयात फास्ट ट्रॅक सुनावणीचा मार्ग खुला केला. राम हा सनातन धर्माचा आत्मा आहे. हा सनातन धर्म संपवण्याचा विडा उचलणाऱ्या उदयाविधी स्टॅलिनच्या सुरात सुर मिसळणारा प्रियांक खरगे हा काँग्रेस नेता होता. सनातन धर्मात उच्चनीचतेला स्थान नाही. हे १९८९ मध्ये सिद्ध झाले आहे. कारण विहींपने मंदीराचा शिलान्यास एका दलित व्यक्तीच्या हस्ते केला. आज राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देशातील ज्या भाग्यवंताना मिळते आहे, त्यातही अशी अनेक नावे आहेत. नवी मुंबईत राहणारे रा. स्व. संघाचे कोकण प्रांताचे कार्यवाह असलेल्या विठ्ठल कांबळे यांना आणि त्यांच्या सुविद्य पत्नी उज्वला हे दांपत्य त्या भाग्यवंतापैकी एक. हे सगळे सनानत धर्माचे अंग आहेत. सनातन धर्मात उच्चनीचतेला स्थान हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संघ परिवाराने पुन्हा एकदा उच्चारवाने सांगितले आहे.

हे ही वाचा:

‘मै अटल हू’ हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा

मराठी भाषा, संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी ग्रंथ प्रदर्शन

गाझामधील समस्येवर कायमस्वरूपी तोडगा हवा!

जावाहरलाल नेहरु यांच्या काळापासून आजतागायत काँग्रेसने केलेल्या हिंदूविरोधी राजकारणाचे पापक्षालन करण्याची संधी या सोहळ्यानिमित्त काँग्रेसला मिळाली होती. परंतु, ही सोन्याची संधीही काँग्रेसच्या नेतृत्वाने दवडली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले. पुन्हा हिंदू समाजाच्या आनंदात सामील होण्यास नकार दिला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सामील झालो तर मुस्लिमांची मतं मिळणार नाहीत. राहुल गांधी यांना कदाचित वायनाडमध्येही पराभूत व्हावे लागेल, ही भीती बहुदा यामागे असावी. त्यामुळे श्रेय घेताना नाना पटोले यांनी त्यांच्या मालकांना आधी विचारून घ्यावे आणि नंतर बोलावे. गेली तीन दशकं राम मंदिरासाठी बलिदान कोणी दिले, कोणी कुचेष्ठा केली. कोणाची चार चार सरकारं बरखास्त झाली, ती कोणी केली. राम मंदीर उभारण्यासाठी घाम कोणी गाळला, रक्त कोणी सांडले, त्याग कोणी केला हे जनतेने पाहिले आहे.

नाना पटोले यांच्या किंवा शरद पवारांच्या वक्तव्याने लोकांचा बुद्धीभ्रम होण्याची काडीचीही शक्यता नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रामद्रोह्यांचा कडेलोट मात्र निश्चित होणार आहे. ज्यांनी आयुष्यभर हिंदूंचा विरोध केला, त्यांच्या राजकारणाचा अंत २०२४ ची निवडणूक करणार आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा