33 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरसंपादकीयमाछरने मारली पाचर!

माछरने मारली पाचर!

Google News Follow

Related

फ्लाय दुबई विमानातील वैमानिक कॅप्टन स्मित माछर यांनी दाखवलेले शौर्य, आपल्या कर्तव्याबद्दलची आस्था, प्रसंगावधान याची चर्चा आता केवळ भारतातच नाही तर जगात सुरू आहे. त्याचे कारणच मुळात या विमानात असलेले दीडशेपेक्षा अधिक प्रवासी मुख्य म्हणजे इस्रायलचे नागरीक बचावले यात दडलेले आहे. या नागिरकांच्या हत्येचा किंवा त्यांच्या अपहरणाचा संशय या सगळ्या घटनेमागे व्यक्त होतो आहे. अशा परिस्थितीत त्या प्रवाशांच्या शरीरावर कोणताही ओरखडा न पडू देता स्मित माछरने त्यांना सहीसलामत आणले यामुळेच त्याचा गौरव होतो आहे. स्वतःच्या शरीरावर घाव सहन करून त्याने या प्रवाशांचे प्राण वाचवले.

त्याचा सहवैमानिक ज्याने स्मितवर हा हल्ला केला तो ओमानी नागरिक असल्याचे कळले आहे आणि त्याचा जिहादी गटांशी संबंध आहे किंवा त्याच्या सोशल मीडियातील पोस्ट पाहून तो जिहादी विचारधारेला मानणारा आहे, असेही स्पष्ट होते आहे. अशा परिस्थितीत एका भारतीय वैमानिकाने निधड्या छातीने या घटनेला सामोरे जात, गंभीर जखमी झालेला असतानाही प्रवाशांचे जीव वाचवायचे, याला नक्कीच एक वेगळा अर्थ आहे. स्मितने केवळ वैमानिकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचीच मान उंचावलेली नाही तर देशाची शानही राखली आहे. त्यामुळेच इस्रायलनेही या शूर वैमानिकाचे कौतुक केले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यानिमित्ताने स्मितशी संवाद साधला. तो सध्या रुग्णालयात उपचार घेतो आहे. ते विमान सौदी अरेबियात उतरवल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण तो बोलण्यास सक्षम आहे. तेव्हाच मोदींनी त्याच्याशी बोलणे केले आणि अवघ्या भारतीयांना त्याच्या भावना जाणून घेता आल्या. ज्यांनी ज्यांनी मोदी आणि स्मित यांच्यातील संवाद ऐकला त्यांच्या डोळ्यातून पाणी आल्यावाचून राहिले नाही. एका संभाव्य दहशतवादी हल्ल्यापासून एवढ्या प्रवाशांचे प्राण ज्याने वाचवले त्याच्या भावना लोकांना ऐकायच्या होत्या. आपण या अचानक ओढवलेल्या प्रसंगातून कसे सावरलो आणि कसे प्रसंगावधान राखू शकलो, त्यामागे हनुमानचालिसेची कशी प्रेरणा आहे, हे स्मितने सांगितले ते प्रत्येकालाच आपल्या कानात साठवून ठेवायचे होते.

भारताचे पंतप्रधान या नात्याने मोदींनी त्याच्याशी तातडीने संवाद साधला. त्याच्या आईवडिलांशीही ते बोललेले आहेत. आपल्या भाषणातही त्यांनी स्मितच्या या शौर्याची दखल घेतली. एक भारतीय वैमानिक हे शौर्य गाजवत असेल तर भारतातील प्रत्येकालाच त्याचा अभिमान वाटेल, त्याबद्दल किती बोलू किती नको, किती लिहू किती नको असे होऊन जाईल पण दुर्दैवाने भारतातील विरोधकांकडे, पुरोगाम्यांकडे, तथाकथित विचारवंत, पत्रकार यांच्याकडे मात्र स्मित माछरबद्दल बोलण्यासाठी एक शब्दही नाही. अर्थात, त्यांच्या शाबासकीच्या प्रतीक्षेत स्मित नाही. पण आपणही भारताचे नागरीक आहोत आणि एका भारतीयाने हा पराक्रम केला आहे तर त्याचे मनापासून कौतुक करावे, त्याच्या पाठीशी आपण आहोत, असे म्हणावे तर तशी दखल कोणत्याही विरोधी पक्षातल्या नेत्यांना घ्यावीशी वाटली नाही. काय कारण असेल? स्मित माछर याच्याशी वैयक्तिक वैर, शत्रुत्व, भांडण असण्याचा प्रश्नच नाही. तो कुठल्या राजकीय पक्षाचाही नाही. तो निव्वळ एक भारतीय आहे आणि त्याने हा पराक्रम करून देशाच्या सन्मानात भरच घातली आहे. मग त्याचे कौतुक करण्यात विरोधकांना हात आखडते घ्यावेसे का वाटले, का त्यांना स्मितला शाबासकी द्यावीशी वाटली नाही.

हे ही वाचा:

४ ऑक्टोबरला मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

मतदार यादीत नाव आहे म्हणून आंदोलन!

जगाला शांततेचा मार्ग भारतच दाखवू शकतो

एचडीएफसी बँकेच्या नव्या सीईओची घोषणा

मग लक्षात येते की, जो हल्ला करणारा आरोपी आहे, त्याचा संबंध कुठल्यातरी जिहादी विचारधारेच्या लोकांशी आहे, तो इस्रायलच्या लोकांना मारू इच्छितो असे त्याच्या काही पोस्टमध्ये सापडल्याचे सांगितले जाते. त्याने अपहरण करण्यासाठी किंवा विमान पाडण्यासाठीच हा हल्ला आपल्या सहवैमानिक असलेल्या सहकाऱ्यावर केला याविषयी जेव्हा बोलले जाते, तसा संशय व्यक्त केला जातो, तेव्हा यातच विरोधकांच्या या गप्प बसण्याचे कारण लपलेले आहे, हे स्पष्ट होते.

तो ओमानी नागरीक एक इस्लामी कट्टरतावादी असेल तर त्याविषयी कसे काय बोलायचे, ते बोलणे म्हणजे आपल्या मुस्लिम लांगुलचालनाच्या विचारधारेशी फारकत घेण्यासारखे आहे, हेच बहुधा विरोधकांच्या गप्प बसण्याचे एक कारण असू शकते. तो इराणशी संबंधित आहे का याविषयीही अनेक ठोकताळे बांधले जात आहेत. तसा तो इराणच्या प्रभावाखाली हे काम करत असेल तर त्याविषयी बोलणेही विरोधकांना जड जात असावे. मात्र इतकी कसली मजबुरी. आपण हे सगळे अंदाज, संशय बाजूला ठेवले तरी एका भारतीयाने हा पराक्रम केला त्याचे कौतुक करण्यात कसली कंजुषी ?

त्यावेळीही आपण राजकारणच पाहणार? इतके तास लोटले तरी ना राहुल गांधींनी त्यावर आपले मत व्यक्त केले, की इंडी आघाडीतील कोणत्या पक्षाने. ना उद्धव ठाकरे, ना आदित्य ठाकरे, ना शरद पवार, सुप्रिया सुळे कुणीही त्या स्मितचे तोंडभरून कौतुक करायलाच तयार नाही. याचे कारण केवळ सदर हल्लेखोर हा जिहादी मानसिकतेचा असेल या शक्यतेत दडलेले नाही तर सदर प्रवासी हे इस्रायलचे होते आणि त्यांना वाचविण्यासाठी स्मितने आपल्या प्राणांची बाजी लावली यात आहे. त्या इस्रायली नागरिकांना शुभेच्छा तरी कोणत्या तोंडाने द्यायच्या, त्यांचे अभिनंदन तरी कसे करायचे, विरोधकांचा तोच तर अजेंडा आहे. इस्रायलने ज्या पद्धतीने या जिहादी मानसिकतेला गेल्या काही वर्षात ठेचून काढले आहे, त्याचे विरोधकांकडून कधीही स्वागत झाले नाही, ते होणारही नाही. कारण इस्रायलबद्दल सहानुभूती दाखवणं म्हणजे मुस्लिम लांगुलचालनाचे चलनी नाणे तिजोरीत बंद करून ठेवण्यासारखे आहे. सेव्ह गाझाचे टीशर्ट घालून, सेव्ह पॅलेस्टिनच्या पिशव्या खांद्यावर घेऊन संसदेत फिरणाऱ्यांची भारतात कमी नाही. भारताचे झेंडे न फडकावणारे इथे पॅलेस्टिनचे झेंडे मात्र आवर्जून फडकावतात, गाझातल्या नागरिकांच्या अवस्थेवर अश्रु ढाळतात. पण तेच लोक पाकिस्तान, बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर एक अश्रुही ढाळू शकत नाहीत. त्यांना ही सगळी घटना एक प्रोपोगंडा वाटते. इस्रायली लोकांनी हा दुष्प्रचार केल्याचे त्यांना वाटते, हे किती दुर्दैवी आहे.

मुस्लिमांचे व्हिक्टीम कार्ड खेळणाऱ्या अरफा खानुम शेरवानी, राणा अयुब यासारख्या भारतविरोधी महिलांना स्मितचे नावही घ्यावेसे वाटलेले नाही. भारत इस्रायल यांच्यातील संबंधांचे त्यांना कोण वाईट वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमध्ये जाऊन नेतान्याहू यांची भेट घेतल्यामुळे भारतातील कित्येकांनी आपले उर बडवून घेतले. इराणचे राष्ट्राध्यक्ष खामेनी यांच्या मृत्यूनंतर इथे दुःख व्यक्त केले गेले. पण त्यापैकी कुणालाही स्मितने केलेल्या या मानवतावादी कामाचे कौतुक नाही. तेच समजा स्मितने काही मुस्लिम नागरिकांना वाचवले असते तर सगळा नूरच बदलून गेला असता.

त्यापेक्षाही समजा याठिकाणी भारतीयाकडून काही चूक झाली असती तर हेच सगळे विरोधक मोदींच्या राज्यात असेच होणार म्हणत देशभर नाचले असते. पण आता स्मितच्या या शौर्यामुळे भारताची जगभरात वाहवा होत असताना विरोधकांना ती बघवत नाही. मुळातच नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून देशात घडलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोधकांनी नाके मुरडली आहेत. सगळे कसे वाईटच चालले आहे, यावर त्यांचा प्रचंड विश्वास बसला आहे.

यातला आणखी एक मुद्दा असाही आहे की, स्मित हा गुजरातचा आहे. एरवी गुजरात म्हणजे आपले शत्रूराष्ट्र असल्याप्रमाणे सातत्याने डिवचणाऱ्या विरोधकांना तेदेखील बोचले असणार. प्रामुख्याने महाराष्ट्रात मराठीच्या नावावर राजकारण करणाऱ्या उबाठा, मनसे या पक्षांना स्मितचे कौतुक का करावेसे वाटले नाही, याचे कारण त्याचे गुजराती असणे हेच असले पाहिजे. निवडणुकीत मराठी आणि गुजराती असा वाद निर्माण करायचा, सगळे उद्योग कसे गुजरातला चालले आहेत, यावरून काहूर माजवायचे. अमराठी कसे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणायचे. दोन गुजराती कसे देशावर राज्य करतात, यावरून बडबड करायची तर मग गुजरातच्या असलेल्या स्मितचे कौतुक करायचे कोणत्या तोंडाने, ही मूळ अडचण आहे. ज्यांचे स्वतःचे कोणतेही करिअर नाही, कोणते भवितव्य नाही, मोठा इतिहास नाही, अशा आंदोलनजीवींसाठी, कॉक्रोचसाठी सगळे विरोधक रोज कौतुकाचा वर्षाव करत असताना त्यांना स्मितसाठी काही शब्द खर्च करावेसे वाटले नाही. याचेच आश्चर्य आहे. एरवी दुसऱ्या राज्यातील कुणावर अन्याय झाल्याची ओरड करत त्यावरून राजकारण करणाऱ्यांना काही लोकांचे जीव वाचवणाऱ्याबद्दल मनात जराशीही कणव नसावी याला काय म्हणणार?

स्मित माछरने त्याबाबतीत या सगळ्या विरोधकांची, पुरोगाम्यांची पाचर मारली आहे. त्यांना बोलायला सोयच राहिलेली नाही. कौतुक करायचे तर मुस्लिम मते गमावण्याचा धोका, गुजराती व्यक्तीला पाठिंबा दिल्याचे ‘पाप’ केल्याची भावना या सगळ्या कात्रीत विरोधक चांगलेच अडकले आहेत. खरे तर याला विरोधकच कारणीभूत आहेत. स्वतःभोवती ज्या चौकटी घालून घेतल्या आहेत, त्याच चौकटींमध्ये ते बंदिस्त झाले आहेत. अद्याप त्या ओमानी वैमानिकाचे नाव समोर आलेले नाही. तेही यथावकाश समोर येईलच. त्यावेळी विरोधकांची काय भावना असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मुळात सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी एका भारतीय वैमानिकाने प्रसंगावधान राखून पार पाडलेल्या कर्तव्याचे कौतुक करण्याची एक नामी संधी विरोधकांनी गमावली आणि आधीच जनतेपासून दूर गेलेल्या विरोधकांचे जनेतापासूनचे अंतर आणखी वाढले आहे, एवढेच म्हणता येईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा