29.3 C
Mumbai
Wednesday, October 14, 2026
घरसंपादकीयदुग्धालयात राहुल गांधींना हवाय खिमा पाव...

दुग्धालयात राहुल गांधींना हवाय खिमा पाव…

Google News Follow

Related

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी भारी गडबड आहे, हे जनतेच्या हळूहळू लक्षात येत आहे. उडप्याच्या हॉटेलात जाऊन ते सांगतात, “मला माझी हजामत करायची आहे.” इथे हजामत होत नाही, असे उत्तर मिळताच ते आदळआपट करायला लागतात. त्यांच्या लक्षातच येत नाही की, हजामत केशकर्तनालयात होते, हॉटेलात नाही. देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना भेटण्याची वेळ काँग्रेस नेत्यांनी मागितली होती. सरन्यायाधीशांनी स्पष्ट नकार दिला आणि त्याची ठोस कारणेही दिली. राहुल गांधींची तऱ्हाच वेगळी! ते पत्रकारांसमोर पुरावे ठेवतात आणि जिथे पुरावे ठेवायचे, त्या सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढतात. प्रत्येक ठिकाणी त्यांची जागा चुकते आहे.

महत्त्वाच्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींमध्ये राहुल गांधी यांनी कमालीची दहशत निर्माण केली आहे. हा माणूस चार भिंतींच्या आड आपल्याला भेटायला येईल आणि बाहेर जाऊन आपल्या नावावर वाटेल त्या थापा मारेल, अशी भीती त्यांना वाटू लागलेली आहे. अलीकडेच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा अनुभव घेतला आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत बहुधा त्यामुळेच सावध झाले. त्यांची भूमिका स्पष्ट आहे, ‘ज्या मुद्द्यावर तुम्हाला बोलायचे आहे, ते मुद्दे न्यायप्रविष्ट आहेत. त्या मुद्द्यांवर मी चर्चा करू शकत नाही. त्या संदर्भात काही बोलायचे असेल, तर पुराव्यांसह तुम्ही न्यायालयात बोलू शकता. सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे देशात सर्वांसाठी खुले आहेत.’ सरन्यायाधीश हे काही लोकसभेचे अध्यक्ष नाहीत. त्यांच्याकडे शिष्टमंडळ न्यायचे नसते. न्यायालयात त्यांच्यासमोर तर्कपूर्ण युक्तिवाद करायचा असतो आणि त्या तर्काची पुष्टी करणारे पुरावे ठेवायचे असतात. काँग्रेसचा दुटप्पीपणा टीपेला पोहोचला आहे. एका बाजूला न्यायालयात काँग्रेसचा अजेंडा रेटणारे कपिल सिब्बल म्हणतात की, आता सर्वोच्च न्यायालयावर विश्वास उरलेला नाही; तर दुसऱ्या बाजूला सिब्बल यांच्या गळ्यात ज्यांचा पट्टा आहे, ते राहुल गांधी सरन्यायाधीशांकडे भेटीची वेळ मागतात.

हे ही वाचा:

सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढून ५.५४ टक्क्यांवर

कुठे आहे हुकुमशाही… ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना चहा, समोसे

गुरुद्वाराबाबत दिशाभूल करणाऱ्या केजरीवाल आणि टीमवर गुन्हा

शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंविरोधात गुन्हा

काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. भेटून बाहेर आल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, ‘मी वोटचोरीचा दावा केल्यानंतर राष्ट्रपती हा दावा फेटाळतील, भारतात निष्पक्ष निवडणुका होतात, असे ठणकावून सांगतील, असे मला वाटले होते. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी आमचा वोटचोरीचा आरोप मान्य केला.’ ही राहुल गांधींची लायकी आहे. जनतादेखील त्यांच्यासारखी बिनडोक आहे, असे राहुल गांधींना वाटते. विरोधी पक्षनेते पदावर येऊन लफंगेगिरी करणारा असा नेता देश पहिल्यांदाच पाहतो आहे.

देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीबाबत ते बिनधास्त खोटे बोलतात. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही राहुल गांधी यांनी हेच केले होते. “मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या संदर्भात विरोधी पक्षनेता म्हणून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्यासोबत बैठकीत सहभागी झालो असताना, ‘आम्ही गेल्यानंतर तुम्हालाच सत्ता सांभाळायची आहे’,” असे मोदी म्हणाले होते, असे राहुल गांधी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. हे सोनिया गांधी यांचे संस्कार आहेत. राहुल गांधींच्या या ट्रॅक रेकॉर्डची माहिती असल्यामुळे बहुधा सरन्यायाधीशांनी त्यांना भेट नाकारली. सरन्यायाधीशांकडे काँग्रेसचे शिष्टमंडळ ज्या मागण्या करणार होते, त्यापैकी पहिली मागणी मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची आणि दुसरी एसआयआर प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची होती. काँग्रेसच्या मागणी यादीतील दोन्ही मागण्यांचा सरन्यायाधीशांशी काहीही संबंध नाही. दोन्ही मागण्या त्यांच्या अखत्यारीत येतच नाहीत. मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा घेण्याचा अधिकार सरन्यायाधीशांकडे नसतोच. म्हणजेच राहुल गांधींनी पुन्हा तेच केले; चुकीच्या जागी चुकीच्या मागण्या! दुग्धालयात जायचे आणि खिमा पाव मागायचा. मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी महाभियोग हा एकच पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी संसदेत तुमच्या बाजूने आकडेवारी असावी लागते.

दोन दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आंदोलन करत होते. ज्यांना हटवण्याची ते मागणी करतायत, त्यांना भेटण्याचे कारण काय? तर भेटून राहुल गांधींना ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागायचा होता. बहुधा आम्ही सत्तेवर आलो तर तुम्हाला तुरुंगात पाठवू, अशी धमकी सुद्धा द्यायची होती.

राहुल गांधी यांनी २०२५ च्या ऑगस्ट महिन्यात निवडणूक आयोगाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली होती. कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र, हरियाणामधील काही मतदारसंघात वोट चोरी झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी त्यांना जाहीर आव्हान दिले होते, ‘आठवड्याभरात तुम्ही जे काही म्हणताय, ते प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून लेखी द्या, अन्यथा माफी मागा.’ राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र दिले नाही.

राहुल गांधी यांची परिस्थिती त्या खेळाडूंसारखी झाली आहे, ज्याला खेळण्याची संधी असते तेव्हा तो जुलाब होत आहेत असे कारण देऊन मैदानात उतरतच नाही; आणि जेव्हा सामना संपतो, तेव्हा तो मध्यरात्री पंचाच्या घरी जाऊन सांगतो, “मला बॅटिंग करायची आहे.”

ही काँग्रेसची गोची आहे आणि नाіलाजही, कारण सत्य, तथ्य आणि तर्क काहीच त्यांच्यासोबत नाही. त्यांच्याकडे पुरावेच नाहीत. लाखो लोकांची नावे मतदारयादीतून कापली गेली, असे राहुल गांधी सतत सांगतायत. आहेत कुठे ते लाखो मतदार? ते जर लाखो आहेत, तर काँग्रेसच्या मोर्चाची संख्या हजारावर सुद्धा का जात नाही? लोक देशभरात रस्त्यावर का येत नाहीत? कारण जनता त्यांच्या पाठीशी नाही. मतदारयादीतून खरोखरच मतदार असलेल्यांची नावे कापली गेली आहेत, हे सत्य असले, तरी त्यांची संख्या एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत मूठभर सुद्धा नाही.

निवडणुकीत मतदारांनी ज्यांना तोंडावर पाडले, ते आता निवडणूक आयोगाच्या विरोधात बोंब ठोकतायत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षामागे प. बंगालमध्ये लोक उभे नाहीत. शिवसेना भवनासमोर पाच-पन्नास लोक एकत्र करायला उबाठा शिवसेना आणि मनसे यांना एकत्र यावे लागते.

आता राहुल गांधी मोर्चा काढणार आहेत. काँग्रेसने नवी दिल्लीत शुक्रवार आणि शनिवार असे सलग दोन दिवस आंदोलन केले. या दोन्ही आंदोलनात राहुल गांधी यांच्यासोबत शंभर-सव्वाशे लोक होते. त्या आंदोलनात पोलिसांनी किती लोकांना ताब्यात घेतले? सुमारे तीन हजारांच्या आसपास! याचा अर्थ, अराजकवादी मंडळी जे मुद्दे उपस्थित करतायत, त्याचे समर्थन करणारे मूठभर लोक आहेत. देशभरात रस्त्यावर उतरणारे लोक नेमके कोण आहेत? तर असे लोक, ज्यांना लोकांनी निवडणुकांमध्ये नाकारले आहे— दिल्लीत आम आदमी पार्टी, महाराष्ट्रात उबाठा शिवसेना, मनसे, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस.

या सगळ्याचा निचोड असा आहे की, देशातील पडेल पक्षाचे नेते, त्यांचे छटाकभर कार्यकर्ते, आणि काही मूठभर डावे यांनी एकत्र येऊन हे आंदोलन उभे केलेले आहे. या लोकांची मानसिकता लक्षात घ्या, कोणी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या की, या लोकांना मिर्च्या झोंबतात; भगवा पाहिला की त्यांचा रक्तदाब वाढतो; ‘वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या की यांचा पोटशूळ वाढतो. ‘आझादी’च्या घोषणा देणारे देशबुडवे यांच्या मंचावर दिसतात. यांच्या मंचावरून उमर खालिद आणि शरजील इमामच्या अटकेबाबत हळहळ व्यक्त केली जाते. थोडक्यात, देशात सुरू असलेला हा संघर्ष ‘हनुमान अंश’ आणि ‘बाबर अंश’ यांच्याविरोधात आहे.

मोदी विरोधकांना जनतेने निवडणुकीत जागा दाखवलेली आहे. पडलेल्यांचे मूठभर पडेल समर्थक जर रस्त्यावर उतरून तमाशा करू शकतात, तर ज्या कोट्यवधी लोकांनी मतदानाच्या माध्यमातून यांना पाडले, ते जर रस्त्यावर उतरले, तर काय होईल, याची कल्पना या आंदोलनजीवींनी करावी.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा