30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरसंपादकीयसोनिया गांधींचे भाषण ऐकून उद्धव ठाकरेंची आठवण का येते?

सोनिया गांधींचे भाषण ऐकून उद्धव ठाकरेंची आठवण का येते?

Google News Follow

Related

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची काल नवी दिल्लीतील रामलीला मैदानात जाहीर सभा झाली. ही सभा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा भाग होती. १९६८ मध्ये सोनियांचा राजीव गांधी यांच्याशी विवाह झाला. तेव्हापासून त्या भारतात आहेत. परंतु गेली अनेक वर्षे भारतात राहून त्यांचे हिंदी लगान सिनेमातील इंग्रज अधिकाऱ्यांसारखेच आहे. ‘ठुम्हे धुगना लघान ढेना पडेगा…’. गेली ५४ वर्षे भारतात राहून त्यांच्या हिंदीत सफाई आली नाही. टॉम ऑल्टर नावाचा एक नट हिंदी सिनेमात कामं करायचा. अनेक हिंदी सिनेमात त्याने ब्रिटीश अधिकाऱ्याच्या भूमिका केल्या. बऱ्याच अन्य भूमिकाही केल्या. अनेक वर्षे सिनेमात कामं करून त्याने हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषा अस्खलित आत्मसात केल्या. त्याच्या भाषेत इकती सफाई आली की, त्याने हिंदी थिएटरमध्येही बरंच काम केले. शक्तीमान या गाजलेल्या हिंदी मालिकेत तर त्याने एका भारतीय ऋषीची अर्थात महागुरुची भूमिका केली आहे. परंतु त्यासाठी मुळात तुमचे भाषेवर प्रेम लागते, ती शिकण्याची तळमळ लागते.

सोनियांकडे या दोन्ही गोष्टींचा अभाव असल्यामुळे आजही त्या रोमन लीपीत लिहून दिलेले भाषण हिंदीत वाचतात. त्यामुळे भाषणात उत्स्फूर्तता नाही. विंदांच्या शब्दात सांगायचे तर तेच ते आणि तेच ते… गेल्या आठ वर्षे त्यांच्या भाषणातील मुद्देही बदलले नाहीत. आजारपणामुळे बराच काळ जाहीर कार्य़क्रमात न दिसलेल्या सोनिया बऱ्याच काळानंतर रामलीला मैदानात दिसल्या. भाषणात मात्र तेच जीर्ण झालेले मुद्दे होते. देशातील तरुणांना नोकऱ्या नाहीत, शेतकऱ्याला बियाणे नाहीत, महिलांवर अन्याय होतोय, संविधान खतरे में असे तेच तेच मुद्दे. आणि जोडीला धारा ३७०, सीएए कायदा आदी चार मुस्लीम धार्जिण्या मुद्यांचा तडका देण्यात आला होता. संरजामशाही गांधी परिवाराच्या रक्तात इतकी भिनली आहे की, देशाच्या पंतप्रधानांचा आणि गृहमंत्र्यांचा एकेरी उल्लेख त्यांच्या भाषणात असतो. सत्ता जाऊन आठ वर्षे झाली, दरम्यानच्या काळात अपवाद वगळता काँग्रेसच्या वाट्याला पराभवांची मालिका आलेली आहे. पण आपण या देशावर राज्य केले आहे, आपण या देशातील फर्स्ट फॅमिली आहोत हा गैरसमज त्यांच्या मनातून अजून जात नाही.

रामलीला मैदानात सोनियांचे भाषण झाले त्यात एकही नवा मुद्दा नव्हता. त्यांच्या भाषणाचा हाच पॅटर्न लोक गेली अनेक वर्षे पाहातायत. ना संघटनेला दिशा देणारा उपक्रम, ना देशाला दिशा देणारे विचार, ना देशद्रोही कारवायांची कठोर शब्दात हजेरी. अत्यंत रटाळ भाषण असल्यामुळे सोनियांच्या सभेचा माहोल कायम जत्रेसारखा असतो. लोक येतायत, जातायत, गप्पा मारतायत हे चित्र रामलीला मैदानातही होते. सभेत लोकांना टाळ्या आणि घोषणांसाठी मार्गदर्शन करण्याचीही व्यवस्था होती. सोनियांच्या मागे उभा राहिलेला काँग्रेस नेता हात वर करायचा मग लोक घोषणा द्यायचे. टाळ्या वाजवायचे. काहीच उत्स्फूर्त नाही, गर्दीसह प्रत्येक गोष्ट जुळवून आणलेली.

अलिकडे उद्धव ठाकरे यांच्यासभेचा पॅटर्न पाहिला की सोनिया गांधींची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. सोनिया गांधींचे भाषण ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लाखोली वाहण्यासाठीच वाहिलेलं असतं तो पॅटर्न उद्धव यांनी स्वीकारलेला आहे. दोघांच्या भाषणात प्रचंड साम्यस्थळं आहेत, सोनिया सासूबाई इंदीरा गांधी यांची कॉपी मारत, उद्धव हे पिताश्री बाळासाहेबांची कॉपी मारतात. सोनियांना कधी इंदीराजींची क़ॉपी जमली नाही तशी ती उद्धवनाही जमत नाही.
गेले अनेक महीने उद्धव ठाकरे यांच्या भाषणात काय मुद्दे असतात? वास्तविक अडीच वर्षे राज्याची धुरा सांभाळलेला नेता आपल्या कार्यकाळाविषयी भरभरून सांगू शकतो. ठाकरे यांच्या कारकीर्दीतला बराच काळ हा कोरोना महामारीचा काळ होता. लोकांसाठी बरंच काही करण्याचा काळ होता. परंतु लोकांना मात्र या काळात झालेला भ्रष्टाचार आठवतो आहे. मृत्यूदरात पहिल्या क्रमांकावर आलेला महाराष्ट्र आठवतो आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणात आम्ही महाराष्ट्रासाठी अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात काय केलं या मुद्याचा नेहमी अभाव असतो. ते आकडे सांगायचे नेहमीच टाळतात. चांगल्या कामामुळे आपण बेस्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळवले, असे सांगून वेळ मारून नेण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो. कारण स्पष्ट आहे, अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांची घनघोर निष्क्रीयता. सांगायला केलेली कामे नसल्यामुळे कोथळा, खंजीर, वाघनखं, मर्द, बाळासाहेब, मुंबई तोडायचा डाव या पलिकडे त्यांच्याकडे काहीच नसते.

पीएफआय़वर बंदी आली, भारताने स्वदेशी बनावटीची लढाऊ हेलिकॉप्टर बनवली… असे काहीही घडो सामनाचा प्रत्येक अग्रलेखात फक्त भाजपाला लाखोली वाहिली जाते, तसेच उद्धव यांच्या भाषणाचे झाले आहे. प्रत्येक भाषण भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांना शिव्या घालण्यासाठी असते. त्यात महाराष्ट्राला ना दिशा मिळते ना ऊर्जा. शिवसैनिकाला ना विचार मिळत ना प्रेरणा, ना कार्यक्रम. दुसऱ्याच्या नावाने बोटं मोडून संघटना चालवता येत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर मराठी तरुणांना बँका, खासगी कंपन्यात नोकऱ्या मिळाव्या म्हणून आंदोलने केली. लोकाधिकार समितीच्या माध्यमातून त्यांनी हा विषय लावून धरला. शिवसेनेच्या शाखातून रक्तदान, रुग्णवाहिका असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात. ही कमाल बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाची होती. परंतु उद्धव यांचे नेतृत्व मात्र संघटनेत नकारात्मक विखार भरण्याचे काम करत आहे.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलण्याआधी नागपूरमध्ये रा.स्व.संघाच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहनराव भागवत यांचे भाषण ऐकण्याची तसदी घेतली तरी त्यांना बरेच मुद्दे सापडतील, जे देशाला आणि महाराष्ट्राला दिशा देणारे आहेत. पण त्यांची मुद्यांवर बोलण्याची सवय सुटली आहे. भाषणात फक्त टोमणे आणि कोट्या करण्यापलिकडे ते बोलूच शकत नाहीत. सामनाच्या अग्रलेखात पीएफआय़ आणि सीबीआय-ईडी सारखेच आहेत असे म्हणण्या इतपत बौद्धिक कडेलोट झालेल्या नेतृत्वाकडून मुद्यांची अपेक्षा करावी तरी कशी.

सत्ता गेल्यामुळे गांधी परिवार हतबल झाला आहे. मोदींच्या नेतृत्वामुळे नजीकच्या काळात देशात काँग्रेसची सत्ता येण्याची चिन्हे दूरदूर पर्यंत नाही. त्यामुळे कोणतीही क्षमता नसताना सत्तेची चव चाखलेला हा परीरवार, म्हणजे सोनिया, राहुल, प्रियांका आणि रॉबर्ट वाड्रा ही मंडळी पिसाटलेली आहेत. मोदींमुळे आपली चंगळ संपली हा भाव डोक्यात इतका घट्ट झालाय की मोदींना शिव्या घालण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा उपक्रम त्यांच्याकडे उरला नाही. उद्धव ठाकरे यांची परिस्थितीही वेगळी नाही.

हे ही वाचा:

विचारांचे सोने लुटायला आलेल्या शिवसैनिकांना मिळाले टोमण्यांचे खोके

खड्ड्यात लपवलेले ४० लाख हस्तगत

‘निष्ठावंत शिवसैनिक म्हणाला गेट आऊट तर निघून जाईन’

‘कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता’

 

गांधी आणि ठाकरे हे कायम मोदींच्या आणि भाजापाच्या नावाने बोटं मोडत असतात. जनतेला भडकवण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु जनता त्यांना फार मनावर घेत नसल्यामुळे त्यांची चरफड वाढत जाते. स्वकर्तृत्व शून्य असल्यामुळे आपण केलेल्या काही चांगल्या गोष्टी सांगण्याची सोय नाही, त्यामुळेच आपल्या बापजाद्यांनी केलेला त्याग आणि भाजपाला शिव्या या पलिकडे भाषणात काहीच नसते. हा लेख लिहीला त्याच्या आदल्या दिवशी दिल्लीत सोनियांची सभा झालेली आहे, परंतु उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सभेला सुरूवात झालेली नाही. पण विचारांचे सोने लुटायला आलेले शिवसैनिक फक्त लाखोली आणि टोमण्यांची माती घेऊन घरी परतणार हे मात्र नक्की.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा