29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरसंपादकीयलाल माकडं आणि नव लिबरल डोंबारी

लाल माकडं आणि नव लिबरल डोंबारी

Google News Follow

Related

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा पायदळी तुडवायचा चंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधला आहे. नक्षलवादाला आयुष्य वाहिलेल्या स्टेन स्वामीचा प्रचंड पुळका आल्यामुळे ‘सामना’चे कार्यकारी संजय राऊत यांनी स्टेन स्वामीसाठी आज प्रसिद्ध झालेल्या ‘रोखठोक’ या स्तंभात प्रचंड अश्रू ढाळले आहे. हा लेख वाचून बाटला हाऊस एन्काऊण्टरनंतर कपाळ बडवणाऱ्या सोनिया मातोश्रींची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.

मुळात या लिखाणासाठी संजय राऊत यांना दोष का द्यावा? मालक जी भूमिका घेईल ती मुखपत्रात मांडणे हे त्यांचे काम. ते त्यांचे काम इमाने इतबारे करतायत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संपादक होते तेव्हा सामना म्हणजे हिंदुत्वाचा जाळ होता. बाळासाहेब गेले, त्यांच्यासोबत शिवसेनेने त्यांच्या भूमिकेलाही भडाग्नी दिला असावा. ‘मी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा माझे दुकान बंद करेन’, असे शिवसेनाप्रमुखांनी एका मुलाखतीत सांगितले होते. परंतु त्यांच्या लेकाने काँग्रेससोबत जाऊन वेगळे दुकान मांडले आहे. सोनिया मातोश्री आणि काँग्रेसच्या पसंतीला उतरेल असा विचार या दुकानातून विकला जातो. तोच विचार अग्रलेख आणि रोखठोकमधून वाचकांच्या माथी मारला जातो. तोही ‘ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक’, या टॅगलाईनसह.

शिवसेनाप्रमुखांनी माओवादी, नक्षलवादी यांचा जाहीर भाषणात कायम ‘लाल माकडे’ असाच उद्धार केला आहे. स्थापनेनंतर सुरूवातीच्या काळात याच लाल माकडांशी शिवसेनेचा संघर्ष झाला. सध्या त्या लाल माकडांना डोक्यावर घेऊन शिवसेनेने डोंबाऱ्याचा खेळ सुरू केला आहे. ८४ वर्षांच्या म्हाताऱ्यापासून केंद्र सरकारला एवढे कसले भय? स्टेन स्वामीबद्दल असा साळसूद सवाल ‘रोखठोक’ मधून केला आहे.

हे ही वाचा:

‘उज्ज्वल’ भविष्यासाठी शिवसेना प्रयत्नशील

ईडी करणार सचिन वाझेवर प्रश्नांचा मारा!

दहशतवाद्यांना मदत कराल तर याद राखा!

सहकार क्षेत्र पिंजून काढण्यास अमित शहांनी केली सुरुवात

हाच निकष शिवसेना आसाराम बापूलाही लावणार काय? तो बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असला तरी त्याचे वयही आता ७९ आहे. गुन्हेगाराला त्याच्या कर्मामुळे तुरुंगात डांबले जाते, देशद्रोही कारवाया करताना वय आडवे येत नसेल तर शिक्षा भोगताना का यावे?

कायद्यासमोर सगळे सारखेच, असा दिव्य विचार राऊतांना केवळ अर्णब गोस्वामीच्या अटकेच्या वेळी का सुचावा? सगळे समान असतील तर मग स्टेन स्वामीच्या वयामुळे राऊत इतके सद्गदीत का झाले? ही हळहळ त्यांनी जरा जपून ठेवावी. ‘ईडी’चा फास केसांना कायम कलप लावणाऱ्या महाविकास आघाडीच्या अनेक म्हाताऱ्या नेत्यांच्या गळ्याभोवती हळूहळू कसला जातोय. त्यावेळी ही हळहळ उपयोगी पडेल.

डाव्या विचारवंतांकडून मानवतावादी कार्य़ाचा शिक्का मारून घ्यायचा आणि गोरगरीब आदिवासींची दिशाभूल करायची, त्यांना देशाविरुद्ध भडकवायचे, त्यांच्या हाती शस्त्रे द्यायची, असे ‘मानवतावादी’ कार्य करणाऱ्या स्टेन स्वामीच्या मुसक्या सुरक्षा यंत्रणांनी आवळल्या तर शिवसेनेला इतके दु:ख का व्हावे? त्याचा मृत्यू तुरुंगात झाला तर त्यासाठी इतके कष्टी होण्याचे तरी कारण काय ?

स्टेनसारख्यांच्या वयाचा विचार करून मोकाट सोडले तरी बाहेर पडून पुन्हा तो तेच मानवतावादी कार्य सुरू करणार. याच लोकांमुळे कधी सुकमा, कधी दंतेवाडासारख्या आडरानात नक्षली टोळकी आमच्या जाँबाज जवानांचा घात करतात. राऊतांना हे माहीत नाही?

एनआयएच्या तपासानंतर कोर्टाने स्वामीची रवानगी तुरुंगात केली. त्याच्यावर दलित आणि मुस्लीमांना सशस्त्र उठावाची चिथावणी देण्याचा आरोप आहे. देशद्रोही कारवायांसाठी लावण्यात येणाऱ्या UAPA कायद्यांतर्गत त्याला अटक करण्यात आली होती. एनआयएचा तपास हा सकाळी उठून अग्रलेख खरडण्याइतका किंवा चॅनलवाल्यांसमोर बरळण्याइतका सोपा नसतो. गुन्हेगाराच्याविरुद्ध ठोस पुरावे एकत्र करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो. न्यायालयाच्या कसोटीवर हे पुरावे खरे उतरावे लागतात. कोर्टाने स्टेन स्वामीवर एनआयएने ठेवलेल्या आरोपपत्रावर शिक्कामोर्तब करून त्याला तुरुंगात पाठवले. उतारवयाच्या या लाल माकडाला त्याची खरी जागा दाखवली.

लिबरल, नव बाटगे लिबरल, डावे, उघड-छुपे काँग्रेसी काय बोलतील आणि काय प्रचार करतील याचा विचार न करता नरेंद्र मोदींच्या सरकारने बाटवाबाटवी करणारे मिशनरी, नक्षलवादी, दहशतवादी यांच्यावर वरवंटा चालवला आहे. काश्मीरमध्ये लष्कराला मोकळा हात दिल्यामुळे दहशतवाद्यांना रोज ठोकले जाते आहे. दर चार दिवसांनी दहशतवादी संघटनांना एक नवा कमांडर जाहीर करावा लागतो, अशी परीस्थिती आहे. ही मोदी नीती आहे, हा मोदींचा नवा भारत आहे. मीडियाला काय वाटेल याचा विचार करण्यापेक्षा देश या देशद्रोही अजगरांच्या विळख्यातून कसा सुटेल याचा ते जास्त विचार करतात.

हिंदूविरोधी गरळ ओकून कोणत्याही कारवाईशिवाय शरजील उस्मानी सुरक्षित आपल्या राज्यात परतला. दहशतवाद्यांना कुरवाळण्याचे काम राज्यातील ठाकरे सरकार करते आहे. हिंदू पंचाग फाडून टाका, अशी बकबक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतायत, वारीचा आग्रह करणाऱ्या वारकऱ्यांना बेडया ठोकल्या जातायत, पोलिस वारकऱ्यांच्या खांद्यावरची भगवी पताका उतरवण्याची फर्मानं काढतायत. पण हा ‘निर्भीड’पणा फक्त हिंदूंच्या बाबतीत मर्यादीत आहे. भिवंडीत मुकूंद लेले या मराठी माणसाच्या गोठ्यातून दोन गाभण गीर गायी रातोरात पळवण्याचा प्रकार घडला, इतके कट्टरवाद्यांचे धाडस वाढले आहे. या गायी कत्तलखान्यात नेण्यासाठी पळवल्या, असा लेले यांचा आरोप आहे, त्यांनी तशी तक्रारही पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. ठाकरे सरकार अशा प्रवृत्तीला कुरवाळण्याचे काम करते आहे. महाराष्ट्रात मोगलाई अवतरल्याचा भास व्हावा इतके वातावरण बिघडले आहे.

यापूर्वी टुकडे गँगचा म्होरक्या असलेल्या कन्हैया कुमारची भलामण करणारे लेख सामनाने छापलेत. कोणाला कुरवाळायचे, कोणाचे चरण चाटण करायचे हे धोरण एक पक्ष म्हणून ठरवण्याचा अधिकार निश्चितपणे शिवसेनेकडे आहे. परंतु त्याआधी त्यांनी ज्वलंत हिंदुत्वाच्या गप्पा मारणे बंद केले पाहीजे. हिंदूद्रोह करून देशद्रोह्यासाठी आसवं ढाळून काँग्रेसने स्वत:चे पोतेरे करून घेतले आहे. शिवसेना त्या मार्गावर गेल्या दोन वर्षात खूप वेगाने पुढे जात आहे. काँग्रेसचे जे झाले तेच शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. नियती कुणालाही माफ करत नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

Leave a Reply to Kirit Gore प्रतिक्रिया रद्द करा

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा