चांदीच्या किमती प्रति किलो दोन लाख पार गेल्या आहेत. इथे त्या थांबतील अशी सुतराम शक्यता नाही. चांदीच्या दराची नवनवी भाकिते केली जात आहेत. जगात एकूणच चांदीचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशा प्रकारची स्थिती असताना चीनमुळे बाजारात दुष्काळात तेरावा महिना सुरू झालेला आहे. जागतिक बाजारपेठेत चीन हा एक महत्वाचा निर्यातदार आहे. एकूण जागतिक निर्यातीच्या १४.९ टक्के चांदी चीनकडून निर्यात केली जाते. चांदीच्या या निर्यातीला चाप लावण्यासाठी चीनने १ जानेवारी २०२६ पासून नवे नियम जाहीर केलेले आहेत. गेल्या काही वर्षात चांदीचा मोठ्या प्रमाणात औद्योगिक वापर सुरू असल्यामुळे नव्याने सुरू झालेले चीनी नियंत्रण जगातील अनेक देशांसाठी तापदायक ठरण्याची शक्यता आहे.
जगभरातील खाणीतून चांदीचे जेवढे खनिज काढले जाते, त्यापैकी ४० ते ४५ टक्के खनिजाचे शुद्धीकरण, म्हणजे खनिजापासून शुद्ध चांदी उत्पादीत कऱण्याची प्रक्रिया चीनमध्ये केली जाते. २०२५ मध्ये चीनमध्ये चांदीचे ३४०० ते ३५०० मे. टन उत्पादन अपेक्षित आहे. चीन चांदीच्या १५ टक्के उत्पादनासह जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चांदी उत्पादक देश बनला आहे. २४ टक्के उत्पादनासह मेक्सिको पहिल्या क्रमांकावर आहे. २०२४ मध्ये भारताने सुमारे ७,६६९ टन चांदीची आयात केली होती. चीन हा भारताचा सर्वात मोठा निर्यातदार आहे.
सोलर पॅनल आणि इलेक्ट्रीक वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात चांदीची आवश्यकता असते. चीन हा सोलर पॅनलचा सगळ्यात मोठा उत्पादक आहे. जगातील ८० टक्के सोलर पॅनल चीनमध्ये तयार होतात. इव्ही उत्पादनातही चीनने आघाडी घेतली असून जगातील ६० टक्के इलेक्ट्रीक वाहने चीनमध्ये तयार होतात. २०२४ मध्ये चीनने १२.४ दशलक्ष इव्हीची निर्मिती केली. टेस्लाला मागे टाकून बीवायडी ही चीनी कंपनी इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत नंबर वन बनलेली आहे.
अर्थ स्पष्ट आहे की, चीनमध्ये जगातील ४५ टक्के चांदीचे शुद्धीकरण होत असेल, जगातील १५ टक्के चांदीची निर्मिती होत असली तरी गेल्या काही वर्षात चीनमध्ये औद्योगिक वापरासाठी चांदीचा खप वाढलेला आहे. भविष्यात तो वाढतच जाणार आहे. चीनमध्ये २०२५ च्या पहिल्या सहामाहीत चीनने आपल्या सोलार वीज निर्मिती क्षमतेते २१० गिगावॅटची भर घातली. हजार गिगावॅट सोलर वीज निर्मितीची क्षमता असलेला चीन हा जगातील पहिला देश बनला आहे. चीनची सोलर क्षमता लक्षात घेतली तर जागतिक महासत्ता असलेला अमेरिका चीनच्या तुलनेत किती तरी मागे आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायम ग्रीन एनर्जीवर कायम आगपाखड करणारी विधाने करत असतात. कदाचित चीनने या क्षेत्रात घेतलेल्या प्रचंड आघाडीमुळे ट्रम्प यांना ग्रीन एनर्जीबाबत पोटदुखी झालेली असण्याची दाट शक्यता आहे. २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यात चीनने सोलर एनर्जीच्या क्षेत्रात घातलेली भर ही अमेरिकेच्या २०२४ च्या अखेरपर्यंत असलेल्या एकूण क्षमतेपेक्षा जास्त आहे. २०२४ मध्ये अमेरिकेची एकूण सोलर ऊर्जा निर्मितीची क्षमता १७८ गिगावॅट इतकी होती. औद्योगिक वापरासाठी ज्या प्रमाणात चीनमध्ये चांदीची आवशकता वाढत आहे हे पाहिले की, चांदीचा साठा निर्माण कऱणे चीनची औद्योगिक आगेकूच कायम राखण्यासाठी अनिवार्य बनले आहे. चीनसह जगाची चांदीची भविष्यात वाढतच जाणार आहे. चांदीची जागतिक मागणी आणि पुरवठा यातील तफावत पाच हजार टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तुलनेने उत्पादनात मात्र घट होत आहे. चीनमध्ये २०२३ मध्ये ३,४०० मे. टन चांदीचे उत्पादन झाले. २०२४ मध्ये हे ३,३०० टनांवर आले.
जगात सोलर पॅनल, इव्ही, शस्त्रास्त्रांची निर्मिती, उपग्रह आणि रॉकेट्स अशा प्रत्येक महत्वपूर्ण निर्मितीसाठी चांदीची आवश्यकता आहे. सध्या तरी चांदीला पर्याय नाही. चांदी नसेल तर यापैकी कोणतीही निर्मिती शक्य नाही. त्यामुळे चीनने चांदीची साठेबाजी सुरू केलेली आहे. जेणे करून चीनी उद्योगांना चांदीचा सुरळीत पुरवठा सुरू राहिल. चीनने साठेबाजी केली किंवा निर्यातीला चाप लावला तर त्याचा परिणाम चांदीच्या जागतिक पुरवठ्यावर होणार हे निश्चित. पुरवठा कमी झाला तर किमती वाढणार हे उघडच आहे. इतर देशांमध्ये सोलर पॅनल, इव्ही आदींची निर्मिती महागेल, रेअऱ अर्थ मटेरिअल प्रमाणे चांदीचाही शस्त्र म्हणून वापर करता येईल. जसे रेअर अर्थ मिनरल्सचा पुरवठा रोखून चीनने अमेरिकेला नमवले तोच प्रयोग भारताबाबतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चीन १ जानेवारी पासून निर्यातीवर नियंत्रण आणणार आहे. चीनने हे जाहीर केल्यानंतर चांदीच्या किमती सुसाट आहेत. निर्यातीचे निकष अधिक कठोर बनवण्यात आले आहेत. जेणे करून फक्त बड्या कंपन्या निर्यात करू शकतील. स्वत: ची निर्मिती किमान ८० टन आहे, अशा कंपन्याच नव्या नियमांनुसार निर्यात करू शकतील. ज्यांच्याकडे २०० दशलक्ष युवानची बॅंक क्रेडीट लाईन आहे, ज्यांना निर्यातीचा चांगला अनुभव आहे, त्यांनाच निर्यातीचा परवाना मिळेल. म्हणजे निर्यातीच्या धंद्यातून चीनने त्यांच्याच देशातील छोट्या निर्यातदारांचा काटा काढला आहे. चीनमध्ये सगळ्या बड्या कंपन्या चीनी कम्युनिस्ट पार्टी नियंत्रित करते. हे नियंत्रण प्रत्यक्ष असते. चीनी कम्युनिस्ट पार्टीचे पदाधिकारी या कंपन्यांमध्ये महत्वाच्या पदावर असतात. त्यामुळे या कंपन्यांचे नियंत्रण, निर्यात आणि निर्णय प्रक्रिया सगळेच चीनी सरकारच्या हाती असते. कोणाला निर्यात करायची याचा निर्णय चीनी सरकार घेणार आहे. चांदी त्यांनाच मिळेल ज्यांचे चीनशी संबंध चांगले आहेत.
प्रत्येक देश हेच करत असतो. तुर्कीयेशी भारताचे संबंध बिघडलेले आहेत. तुर्कीयेने भारताला गव्हाचा पुरवठा करण्यासाठी तीन वेळा पत्र पाठवली. परंतु, भारताने या विनंती पत्रांना केराची टोपली दाखवली. भारताकडे गव्हाचा भरपूर साठा आहे, तरीही भारत तुर्कीयेला गहू देत नाही. हाच प्रकार चीनकडून अशा प्रत्येक गोष्टीबाबत केला जाईल, जिथे जिथे चीनला शक्य असेल.
जगभरातील देशांना चांदीच्या वाढत्या किमतींचा ताप झालेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चांदीचा समावेश रेअर कमॉडीटीच्या यादीत केला आहे. त्यानंतर चीनने निर्यातीवर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले. या सगळ्या घडामोडींचा भारतावर परिणाम होणे अत्यंत स्वाभाविक आहे. चांदीच्या किमती कडाडल्या तर सोलर पॅनल असो इव्ही असो वा शस्त्रनिर्मिती सगळीकडेच आर्थिक गणित बदलणार आहे. चांदीची किंमत महागली आहे. त्यामुळे ही निर्मितीही महागणार आहे.
भारतात २०२४ मध्ये ७०० मे. टन चांदीचे उत्पादन झाले. परंतु, आपली आयात साधारण आठ हजार टनांच्या आसपास आहे. राजस्थान, झारखंड, कर्नाटक आणि आंध्रमधील तांब्यांच्या खाणीतून काही प्रमाणात चांदी सापडते. त्यामुळे आपले चांदीवरील अवलंबित्व मोठे आहे. येत्या काळात ते वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात चांदीचे दरही अधिक कडाडण्याची शक्यता आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर प्रति किलो २,०४,२६० आहे. हा दर २०२६ च्या अखेरपर्यंत तीन लाखपर्यंत जाईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. डॉलरमध्ये सध्या चांदीचा दर प्रति औंस ६४ डॉलर आहे. तो वर्षभरात १०० डॉलरच्या जवळपास पोहोचेल असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. चांदीचे दर कडाडल्याची चर्चा आहे. वर्षभरात चांदीने १२७ टक्के परतावा दिलेला आहे. परंतु, ही नुकतीच चांदीच्या बुल मार्केटची सुरूवात आहे, असा दावा अनेक नामांकीत तज्ज्ञांनी केलेला आहे. भारताने २०२४ मध्ये केलेली चांदीची आयात २०२३ च्या तुलनेत दुप्पट होती. भविष्यात चांदीचा तुटवडा होऊ शकेल ही शक्यता लक्षात घेऊन भविष्यात आयातीचे प्रमाण चढे राहील, अशी शक्यता आहे. रेअर अर्थ मिनरल्सबाबत जगाने एकदा तोंड पोळून घेतले असल्यामुळे आता चांदीबाबत जग सावध झालेले आहे. त्याचाच परिणाम चांदीच्या भावावर दिसतो आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







