प. बंगाल विधानसभा निवडणुकांची चर्चा फक्त देशभरातच नाही, तर परदेशातही या निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. पॉलिमार्केट या अमेरिकी ऑनलाइन सट्टा बाजारावर २० लाख डॉलर्सचा सट्टा लागला आहे. सट्टेबाजांनी भाजपाला झुकते माप दिले आहे. तृणमूल आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत असून भाजपाचे सरकार बनेल, असे संकेत पॉलिमार्केटचे आकडे देत आहेत.
पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यांतील १५२ जागांसाठी मतदान झाले. २९ एप्रिल रोजीचा दुसरा टप्पा भाजपासाठी जड आहे, परंतु सत्ता कोणाची येणार याचा निर्णय पहिल्याच टप्प्यात झालेला आहे. जनतेचा निर्णय ईव्हीएममध्ये बंद झाला आहे. पहिल्या टप्प्यात १५२ पैकी किमान १०० जागा आल्यास भाजपाला सत्ता मिळण्याची अपेक्षा करता येईल.
हे ही वाचा:
मारुती सुजुकीचा विक्रम: एका वर्षात २३.४ लाख गाड्यांचे उत्पादन
मारुती सुजुकीचा विक्रम: एका वर्षात २३.४ लाख गाड्यांचे उत्पादन
राज्यात उष्णतेचा कहर; अकोल्यात तापमान ४६°C च्या उंबरठ्यावर
“आपली बस, आपली सेवा” : एसटीची नवी मोहीम १ मेपासून
भारतातील फलौदी आणि दिल्ली सट्टा बाजारांच्या आकड्यांची निवडणुकीच्या काळात चर्चा होतेच; परंतु अमेरिकेच्या सट्टा बाजारातही भारतातील विधानसभा निवडणुकांबाबत बेटिंग केले जात आहे. पॉलिमार्केट या बेटिंग साईटची यंदा चर्चा आहे, कारण पॉलिमार्केटचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे अंदाज बारीक-सारीक तपशिलांसह अचूक ठरले होते. त्यांच्या आकडेवारीनुसार, प. बंगाल निवडणुकीत भाजपाच्या विजयाची शक्यता ५३ टक्के, तर तृणमूल काँग्रेसची शक्यता ४७ टक्के आहे. डाव्यांच्या वाट्यालाही एक टक्का आलेला आहे; म्हणजे देशभरात संपलेल्या डाव्या पक्षांचाही विजय होऊ शकतो, असे वाटणाऱ्या लोकांचा एक टक्का अजूनही शाबूत आहे. भारतात बेटिंग बेकायदेशीर आहे, त्यामुळे पॉलिमार्केटवर भारतात बंदी आहे.
पॉलिमार्केटने २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीचे अचूक अंदाज व्यक्त केले होते. या निवडणुकीत भाजपाने ज्या प्रकारची वातावरणनिर्मिती केली होती, त्यात पॉलिमार्केटचे अंदाज अशक्यप्राय वाटत होते. परंतु निकालानंतर त्यांची तीन भाकिते खरी ठरल्याचे उघड झाले.
पहिले भाकीत होते—भाजपाला २७२ हा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाने ‘४०० पार’ची घोषणा दिली होती. अनेक राजकीय पंडित ही घोषणा प्रत्यक्षात येईल असे छातीवर हात ठेवून सांगत होते. त्या काळात या बेटिंग साईटने दिलेला हा धाडसी कल तंतोतंत अचूक ठरला. भाजपाला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही आणि एनडीएलाही ३०० पेक्षा कमी जागा मिळतील, असे संकेतही या बेटिंग साईटने दिले होते. हे आश्चर्यकारक होते, कारण निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी हे असंभव वाटत होते.
भाजपाला बहुमत मिळणार नाही असा कल दिल्यानंतर, पुन्हा असे म्हणणे की नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान बनतील, हा अंदाज म्हणजे कल्पनातीत वाटत होता; तोही खरा ठरला. हे तिन्ही अंदाज खरे ठरले, त्यामुळे पॉलिमार्केटच्या अंदाजावर चर्चा करावीशी वाटते. यंदा तामिळनाडू आणि प. बंगाल या दोन निवडणुकांवर पॉलिमार्केटवर सट्टा लागलेला आहे. त्यात रालोआ तामिळनाडूमध्ये पराभूत होणार आणि द्रमुक पुन्हा सत्तेवर येणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प. बंगालमध्ये भाजपा येणार असा दावा केला जात आहे.
हे भाकीत खरे होण्याचे संकेत विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा नेते अमित शाह, प. बंगालचे भाजपा नेते शुभेंदु अधिकारी, दिलीप घोष ही सगळी मंडळी विजयाचा दावा करताना काही मुद्दे प्रामुख्याने मांडताना दिसत आहेत. त्यांचा भरोसा हिंदू एकगठ्ठा मतांवर दिसतो आहे. पहिल्या टप्प्यात ९२.८८ टक्के मतदान झालेले आहे. वाढलेले मतदान हे हिंदू मतदान आहे आणि त्याचा लाभ भाजपाला होणार, असा त्यांचा विश्वास आहे.
महुआ मोईत्रांसारख्या तृणमूल नेत्या असा दावा करत आहेत की मतदानाचा टक्का वाढला आहे, परंतु प्रत्यक्ष मतदान वाढलेले नाही; काही ठिकाणी ते कमी झाले आहे. त्यांनी ओंदा विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले. येथील बूथ क्रमांक १९० मध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १०१२ मते होती. त्यापैकी ८९४ मतदान झाले होते; म्हणजेच मतदानाचा टक्का ८८ होता. २०२६ मध्ये ‘एसआयआर’मुळे (SIR) ही मते कमी झाली. त्याच बूथमध्ये एकूण मतांचा आकडा ८९४ झाला, त्यापैकी ८५४ लोकांनी मतदान केले. ४० मते कमी झाली तरी मतदानाचा टक्का ९५ झाला.
त्याच वेळी मोईत्रा दावा करतात की, ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ या उपक्रमाच्या विरोधात मतदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले.
ममता बॅनर्जी यांची हक्काची मतपेढी असलेले मुस्लिम मतदार दर निवडणुकीत पूर्ण क्षमतेने मतदान करतात. ते नेहमीच ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान करतात, जे यापुढे जाणे कठीण आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वाढलेले मतदान हे हिंदूंचे आहे. दहशतीच्या प्रयोगामुळे ज्या हिंदूंना मतदानाच्या दिवशी घरातून बाहेर पडू दिले जात नव्हते, अशा हिंदूंनी केलेले हे मतदान आहे.
जेव्हा हिंदू मतदार ‘हिंदू’ म्हणून मतदान करतो, तेव्हा भाजपाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हे स्पष्ट झालेले आहे. यंदा प. बंगालमध्ये हेच चित्र दिसत असल्याचा भाजपाचा दावा आहे. हिंदू म्हणून मतदान करण्याची प. बंगालमधील बांग्लाभाषिकांची परंपरा नाही; तिथे बांग्ला अस्मिता ही हिंदू अस्मितेपेक्षा जास्त प्रभावी राहिलेली आहे. हे चित्र यंदाच्या निवडणुकीत बदलण्याची शक्यता आहे.
मूळचा बांग्लाभाषिक हिंदू मतदार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बिहारी, मारवाडी, उत्तर भारतीय, नेपाळी, आदिवासी हिंदू मतदार वेगळा, असा हिशोब यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये होत असे. बहुसंख्य बांग्लाभाषिकांचा कल ममता बॅनर्जी यांच्याकडे होता. मात्र, मुस्लीम तुष्टीकरणाच्या धोरणामुळे नाराज झालेला आणि भयभीत झालेला हिंदू यंदाच्या निवडणुकीत एकवटलेला दिसतो. तो भाजपाचे समर्थन करताना दिसत आहे.
तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या मतांमध्ये २०२१ मध्ये ९.८ टक्क्यांचा फरक होता. भाजपाला ३८.४ टक्के, तर ममता यांना ४८.५ टक्के मतदान झाले होते. अत्यंत कठीण आणि अटीतटीची वाटणारी ही लढाई केंद्रीय सुरक्षा दलांच्या उपस्थितीमुळे थोडी सोपी झालेली आहे. निवडणुकीत हिंसाचार झाला असता, तर भाजपाला निवडणूक जिंकण्याची आशाच करता आली नसती. आता किमान जिंकण्याची अपेक्षा करता येते आहे. ममता यांची ५ टक्के मते खेचण्यात भाजपाला यश आले, तरी निवडणुकीचे गणित फिरते; कारण ममता यांची ५ टक्के मते कमी होतात आणि भाजपाची ५ टक्के वाढतात, ज्यामुळे १० टक्क्यांचा फरक पडतो.
गेल्या वेळी डावे पक्ष, काँग्रेस आणि इतर अशा एकत्रित मतांचा टक्का सुमारे १३ होता. यात हिंदू मते आहेत जी ममता विरोधी आहेत. त्यातील २ टक्के मते जरी भाजपाकडे वळली, तरी चमत्कार होऊ शकतो. निवडणुकीचा दुसरा टप्पा अजून झालेला नाही, त्यामुळे पूर्ण निवडणुकीचे भाकीत करणे कठीण आहे; परंतु लोकांचा कल पहिल्या टप्प्यात स्पष्ट झालेला आहे. ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ आज व्हायरल झाला आहे. एकाच मतदारसंघात भाजपा आणि ममता यांच्या सभा होत्या. दोन्ही सभांमध्ये शंभर मीटरचे अंतर होते. भाजपाच्या सभेत होणारा जनतेचा जल्लोष ऐकून ममता यांनी सभा अर्धवट सोडली आणि त्या निघून गेल्या. ममता इतक्या बचावात्मक कधीच नव्हत्या.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







