अमेरिकन शेअर बाजार ५ जून २०२६ रोजी, म्हणजे शुक्रवारी कोसळला. गुंतवणूकदारांचे १.३ ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले. अमेरिकी बाजारात एआयचा बुडबुडा फुटणार, अशी चर्चा बराच काळ सुरू होती. तो खरोखरच फुटायला शुरुवात झाली आहे का, असा प्रश्न शुक्रवारच्या गडगडाटानंतर निर्माण झाला आहे. बाजारातील घसरणीमागे अलीकडे अर्थकारण कमी आणि पडद्यामागील शक्तिशाली सूत्रधारांचा खेळ जास्त असतो. ताज्या घसरणीमागे असेच एखादे अतर्क्य कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एखादे वक्तव्य करतात. ते सकारात्मक असते तेव्हा शेअर बाजार वर जातो, नसते तेव्हा कोसळतो. शेअर बाजारातील या ट्रम्प फॅक्टरमुळे त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या अनेकांचे भाग्य फळफळले आहे. बाजार उसळो वा कोसळो, हीच मंडळी पैसे कमावत आहेत. त्यामुळे शुक्रवारी कोसळलेल्या शेअर बाजारामागे काही आर्थिक कारण आहे की, असाच एखादा बिनचेहऱ्याचा अज्ञात सूत्रधार, याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ आहे.
अमेरिकेच्या नॅसडॅकमध्ये नोंदणी झालेल्या कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४६.४ ट्रिलियन डॉलर आहे. यात एनव्हिडियाचे बाजारमूल्य ५.३ ट्रिलियन, ॲपलचे ४.७ ट्रिलियन, अल्फाबेटचे ४.५ ट्रिलियन, मायक्रोसॉफ्टचे ३.११ ट्रिलियन, अॅमेझॉनचे २.६० ट्रिलियन इतके आहे. या पहिल्या पाच कंपन्यांचे बाजारमूल्य २०.०९ ट्रिलियन इतके आहे. यातील १.३ ट्रिलियनची एकाच दिवशी पडझड झाली आहे.
अमेरिकेच्या ‘ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स’ने जाहीर केलेल्या मे महिन्याच्या अहवालानुसार, तिथे अपेक्षेपेक्षा दुप्पट म्हणजेच १,७२,००० नव्या नोकऱ्यांची निर्मिती झाली. घडले चांगले, परंतु त्याचा परिणाम मात्र उलट झाला. अधिक नोकऱ्या, म्हणजे लोकांच्या हाती अधिक पैसा. हा पैसा बाजारात येणार, त्यामुळे महागाई वाढणार, असा या बातमीचा अर्थ काढण्यात आला.
ही महागाई रोखण्यासाठी अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याऐवजी उलट व्याजदर आणखी वाढवू शकते, अशी भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली. कारण व्याजदरात वाढ होते, तेव्हा लोक शेअर विकतात आणि सुरक्षित परतावा देणाऱ्या अमेरिकी बॉण्डमध्ये पैसा गुंतवतात. बाजार चढो वा कोसळो, या व्याजाच्या उत्पन्नावर परिणाम होत नाही.
अर्थात बाजार कोसळल्यामुळे तज्ज्ञांना काहीतरी कारण द्यावे लागते. सध्या परिस्थिती अशी आहे की, कारणे शोधावी लागत नाहीत. पश्चिम आशियातील युद्ध थांबण्याची शक्यता धूसर झालेली आहे. भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलचे दर ९३ डॉलर प्रति बॅरल झालेले आहेत, ज्यामुळे जागतिक स्तरावर महागाई भडकली आहे. याचा एकत्रित परिणाम अमेरिकी शेअर बाजारात दिसला. एआयच्या लाटेवर स्वार झालेल्या टेक कंपन्यांचे बाजारमूल्य प्रचंड वाढले होते, ज्यात आता नफा वसुली सुरू झालेली आहे. एकेका शेअरच्या दरात झालेली घसरण घबराट निर्माण करणारी आहे.
मायक्रॉन टेक्नॉलॉजी १३.३ टक्के घसरला, ब्रॉडकॉम ७.९ टक्के, एनव्हिडिया ६.२ टक्के, मेटा ५.५ टक्के घसरला. नॅसडॅकचा निर्देशांक एकाच दिवसात ४.४ टक्के घसरला. ही घसरण प्रचंड मोठी आहे. एस अँड पी ५०० आणि डाऊ जोन्स अनुक्रमे २.६% आणि १.४% ने घसरले.
अनेकांना या घसरणीमुळे २००० सालच्या डॉटकॉम बबल आणि २००८ च्या सबप्राईम क्रायसिसची आठवण झाली. म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रात बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्जे दिली होती. रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदीमुळे ही कर्जे बुडाली आणि बँका गोत्यात आल्या. त्याचा फटका अर्थकारणाला बसला.
अमेरिकी बाजारात घसरणीबाबत आणखी एका कारणाची चर्चा होते आहे. सिनेमा क्षेत्रात नवा सुपरस्टार येतो तेव्हा जुन्याची सद्दी संपते; राजेश खन्नाची सद्दी अमिताभने संपवली, अमिताभची सद्दी खानांनी संपवली, खानांची सद्दी कदाचित रणवीर सिंगसारखा स्टार संपवेल असे चित्र आहे.
हे ही वाचा:
‘महापौर असताना किशोरी पेडणेकरांनी केला टर्टल हॉटेल घोटाळा’
भारताचा जन्मदर घसरला; प्रजनन दर १.९ वर
मुंबई विमानतळावर ५ कोटीचे ३.२ किलो सोनं जप्त
सूर्यकुमारचे कर्णधारपद का गेले? तीन कारणे ठरली निर्णायक
नॅसडॅकमध्येही असेच होण्याची शक्यता आहे. अमेरिकी शेअर बाजाराच्या दरवाजावर अनेक बड्या कंपन्या उभ्या आहेत. या छोट्या-मोठ्या कंपन्या नाहीत. उद्या जगाचे चित्र बदलण्याची क्षमता या कंपन्यांमध्ये आहे. या कंपन्या प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या विश्वामित्राचे सामर्थ्य ठेवतात. त्यात एलॉन मस्कची स्पेसएक्स आहे, एन्थ्रॉपिक आहे, ओपन एआय आहे. स्पेसएक्सचे बाजारमूल्य १.७५ ते २ ट्रिलियन डॉलर, एन्थ्रॉपिकचे ८५२ अब्ज डॉलर ते १ ट्रिलियन डॉलर आणि ओपन एआयचे बाजारमूल्य ९०० अब्ज डॉलर ते १ ट्रिलियन इतके आहे. या केवळ तीन कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ३.९ ते ४ ट्रिलियन इतके आहे. यापैकी दहा टक्के रकमेचे शेअर त्यांनी बाजारात आणले तर ही रक्कम सुमारे ४०० अब्ज डॉलर इतकी होते. शेअर बाजारात एखादी कंपनी येते तेव्हा सामान्य गुंतवणूकदार, बड्या वित्तसंस्था यात पैसे गुंतवतात. पैशाची नदी जेव्हा प्रवाही नसेल, कोरडीठाक पडली असेल, तेव्हा नवे पैसे गुंतवण्यासाठी जुना माल काढावा लागतो. जागतिक अर्थकारणावर मंदीचे सावट असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्येही फारसा उत्साह नाही.
हे तिन्ही आयपीओ बाजारातून मिळून सुमारे $२०० अब्ज (₹१६ लाख कोटींहून अधिक) रोख रक्कम खेचून घेणार आहेत. २०२५ या वर्षी अमेरिकेच्या सर्व आयपीओंनी मिळून केवळ $४५ अब्ज गोळा केले होते. हे लक्षात घेतल्यावर २०० अब्ज डॉलर हा किती मोठा आकडा आहे, हे कळू शकेल. बाजारात या तीन कंपन्यांमध्ये २०० अब्ज डॉलर गुंतवण्याची वेळ येईल तेव्हा फंड मॅनेजरकडे जुन्या कंपन्यांचे शेअर्स काही प्रमाणात कमी करण्याशिवाय पर्यायच नसेल. त्यातून असे क्रॅश येत्या काळात वारंवार पाहायला मिळतील.
जगातील अनेक अर्थतज्ज्ञ अर्थकारणातील बुडबुड्याची चर्चा करताहेत. रे डॅलिओ हे ब्रिजवॉटरचे संस्थापक आहेत, अब्जाधीश आहेत. एलॉन मस्कच्या स्पेसएक्सचा आयपीओ १३५ डॉलर प्रति शेअर येत असल्याच्या बातमीवर व्यक्त होताना ते म्हणाले की, “एआयमध्ये आलेली तेजी बुडबुड्याचे संकेत देत आहे. कंपनीमध्ये सुरुवातीच्या काळात गुंतवणूक करणारे व्हेंचर कॅपिटलिस्ट आपला नफा काढून घेण्यासाठी आयपीओ आणतात आणि त्यात किरकोळ गुंतवणूकदार शेवटी अडकतात. हा बुडबुडा टिकणारा नाही.”
प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी वारंवार सांगताहेत, “एलन मस्क आणि ओपनएआयचे आयपीओ हे बाजारातील उरलेली सर्व रोख रक्कम शोषून घेतील. २००८ मध्ये जसे ‘सबप्राइम मॉर्टगेज’ने बुडबुडा तयार केला होता, तसेच आता ‘एआय’ने केला आहे. हा बुडबुडा फुटताना पाहणे भयानक असेल. ”
प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवेचे संस्थापक वॉरेन बफे सध्या पैशाच्या राशीवर उभे आहेत, कारण त्यांनी ॲपलसारख्या कंपन्यांचे शेअर्स विकून पैसा सुरक्षित केला आहे.
“एआय मॉडेल ट्रेन करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सच्या विजेची आणि डेटा सेंटर्सची गरज आहे. या कंपन्यांचे बिझनेस मॉडेल अजून ‘नफा’ कमवू शकलेले नाही. त्यामुळे बाजारातून या कंपन्यांनी एवढा पैसा उभारणे म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेसोबत जुगार खेळण्यासारखे आहे,” असे मत जेफ्री सॅक्स यांनी व्यक्त केले आहे.
५ जून रोजी अमेरिकेत जे काही झाले, त्याचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. इन्फोसिस, टीसीएस, विप्रो सारख्या भारतीय आयटी कंपन्या त्यांच्या महसुलाचा मोठा हिस्सा अमेरिकन कंपन्यांकडून मिळवतात. अमेरिकेत मंदी किंवा व्याजदर वाढल्यास तिथल्या कंपन्या आयटी बजेट कमी करतात, ज्यामुळे भारतीय आयटी शेअर्सवर तात्पुरता दबाव राहील.
गेल्या काही वर्षांत विदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पळ काढतायत, असे चित्र आहे. त्यांना पुन्हा खेचून आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे हे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर परत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी ५ जून २०२६ रोजी जारी झालेले रिझर्व्ह बँकेचे धोरण कारणीभूत ठरणार आहे. विदेशी वित्तसंस्थांसाठी आयकर आणि कॅपिटल गेन रद्द करण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे. १५ ते ४० वर्षे मुदतीच्या बॉण्ड गुंतवणुकीवर याचा थेट परिणाम होणार आहे.
जागतिक मंदी आणि अमेरिकन क्रॅशच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्था एक ‘ब्राइट स्पॉट’ म्हणून पुढे येते आहे. २०२५-२६ च्या अखेरच्या तिमाहीत भारताने विकासदरात ७.८ टक्के वाढ नोंदवली आहे, ज्यामुळे या वर्षाचा विकासदर ७.७ टक्के झाला आहे. जगाचे अर्थकारण डळमळत असताना भारत चांगली कामगिरी करतोय कारण, भारताची अर्थव्यवस्था ही केवळ निर्यातीवर अवलंबून नाही. देशांतर्गत मागणीही मोठी आहे. सरकार पायाभूत सुविधांवर मोठा खर्च करते आहे. भारतीय बँका ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात मजबूत स्थितीत आहेत. बँकांची थकीत कर्जे नीचांकी पातळीवर आहेत. FIIs बाँड मार्केटच्या माध्यमातून भारतात परतले तर घसरता रुपया मजबूत होऊन देशांतर्गत बाजारपेठेला बळ मिळेल. अमेरिकन बाजारात अनिश्चितता असल्याने विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हा उत्तम पर्याय ठरू शकेल.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







