24 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरसंपादकीयगब्रूंना पाठीशी घालणारे पुरोगामी, विचारी

गब्रूंना पाठीशी घालणारे पुरोगामी, विचारी

Google News Follow

Related

एखाद्या हिंदी सिनेमाला लाजवेल असा घटनाक्रम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर उघड झालेले सज्जड पुरावे नाकारून वनमंत्री संजय राठोड यांना पाठीशी घालण्याचे काम राज्यातील ठाकरे सरकार करते आहे. देशात महिला धोरणाचा पाळणा प्रथम महाराष्ट्रात हलवण्याचे श्रेय ज्यांच्याकडे जाते ते ‘जाणते’ शरद पवार मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक आणि सरकारचे ‘रिमोट कंट्रोल’  आहेत. परंतु असे असताना राज्यात महिलांवर अत्याचार वाढल्याचे चित्र आहे. अत्याचार करणारा सत्ताधाऱ्यांच्या गोतावळ्यातला असेल तर त्याच्यावर कारवाई होत नाही. त्याला अभय दिले जाते. पाठीशी घातले जाते. एवढेच नाही तर सत्ताधाऱ्यांकडून त्यांचे निलाजरे समर्थन केले जाते (आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न वगैरे, वगैरे..). अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांबद्द्ल बेपर्वा असलेले सरकार बदनामीमुळे अत्याचारींचे आयुष्य बदनाम होणार नाही, याबाबत प्रचंड संवेदनशील आहे. शेण खाणाऱ्यांची तोंडे शेणाने माखली आहेत, परंतु सरकारच्या म्होरक्यांना हे बरबटलेले चेहरे दिसत नाहीत.

काहीही केले तरी काहीही होत नाही असा अत्याचार करणाऱ्या नराधमांना विश्वास आहे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेतृत्वालाही. आरोपांचा चिखल उडाल्यानंतरही नेत्यांची स्थितप्रज्ञता ढळत नाही. ते मख्ख असतात, परंतु विरोधकांनी आवाज उठवल्यावर मात्र ही मंडळी ‘ऍक्टीव्ह मोड’ मध्ये येतात. राज्याच्या नेतृत्वाची न्यूनतम पातळीपर्यंत खालावलेली कार्यक्षमता फक्त आणि फक्त विरोधकांना चिरडण्यासाठी काही काळासाठी उंचावते. शेतकरी, कष्टकरी, महिला, नोकरदार यांच्या प्रश्नाबाबत झोपा काढणारे राज्यकर्ते सोशल मीडिया आणि मीडियातून भडीमार होतो तेव्हा सूड, सूड असे किंचाळत जागे होतात.

पूजा चव्हाण हिला आत्महत्या करण्यास भाग पाडणारे सहीसलामत सुटावेत म्हणून नेमके हेच होताना दिसत आहे.

शिवसेनेच्या संजय राठोडांवर कारवाई होताना दिसत नाही. आत्महत्येच्या घटनेनंतर बरेच दिवस तोंड लपवत फिरणारे राठोड अचानक प्रकट काय होतात, पोहरागडावर जाऊन दर्शन काय घेतात आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत बालिश खुलासे काय करतात, सगळंच किळसवाणं राजकारण.

‘विचारी’ आणि ‘सुसंस्कृत’ मुख्यमंत्री मुकदर्शक म्हणून हे सगळ पाहातायत असे वाटण्याचे काही कारण नाही. राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा तरी मुख्यमंत्री त्यांचे कान उपटतील, त्यांच्याकडून राजीनामा घेतली अशी अपेक्षा होती. परंतु यातले काहीच झाले नाही उलट राठोड मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ रोज आवाज उठवतायत. आज त्यांचे पती किशोर वाघ यांच्या मागे एसीबीचे शुक्लकाष्ठ लागल्याची बातमी आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे हा महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे. कागदी वाघ आवाज उठवणाऱ्यांवर तुटून पडण्याच्या तयीत आहेत.

अलिकडेच न्यूज डंकाच्या कार्यालयात चित्रा वाघ आल्या होत्या. ठाकरे सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोय, तुम्हाला याची भीती वाटत नाही का, असा सवाल त्यांना विचारला, तेव्हा त्रास झाला तरी मी आवाज उठवायचे बंद करणार नाही असे त्यांनी बेधडक सांगितले. आजच्या पत्रकार परीषदेत त्यांनी याचा पुनरुच्चार केला.

चित्रा वाघ यांची न्युज डंकाने घेतलेली मुलाखत

आवाज उठवणाऱ्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून ते गप्प बसतील अशा गैरसमजात सरकार आहे. विरोधकांना चिरडून विरोध संपवण्याचा प्रयत्न यापूर्वीही या देशात झाला आहे. ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांचे काय झाले हे विसरण्या इतपत हा इतिहास जुना झालेला नाही. इंदीरा गांधींसारख्या खमक्या नेतृत्वाने लादलेली आणीबाणी देशाने उलथून लावली, उद्धव ठाकरे इंदीराजींच्या तुलनेत कुठे आहेत?

लोकांची स्मरणशक्ती कमकुवत असते हा गैरसमज राज्यकर्त्यांनी न ठेवलेला बरा. हजारो वर्षांनंतरही या देशात रावण जाळण्याची परंपरा कायम आहे. लोक अराजक माजवणाऱ्यांना माफ करत नाहीत. विसरतही नाहीत. लोकशक्ती हीच राजसत्तेची खरी ताकद असते. तिची मुस्कटदाबी करून सत्तेचा पाया मजबूत होईल अशा भ्रमात कोणी राहण्याचे कारण नाही.

इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा या न्यायाने संजय राठोड यांच्या पाठीराख्यांचा न्यायही निश्चित होईल. कोणीही याबाबत मनात किंतु-परंतु बाळगण्याचे कारण नाही. तो कधी होईल याचे उत्तर मात्र काळाच्या उदरात दडले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा