26 C
Mumbai
Thursday, February 26, 2026
घरसंपादकीयआदित्य ठाकरेंची पवारांच्या नावावर फुली

आदित्य ठाकरेंची पवारांच्या नावावर फुली

Google News Follow

Related

आता राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. या सात जागांपैकी ६ जागा आम्ही सहज जिंकणार असा विश्वास महायुतीकडून व्यक्त होत आहे. तेवढे संख्याबळ त्यांच्याकडे आहे. पण महाविकास आघाडीला एक जागा मिळेल एवढे संख्याबळ त्यांच्याकडेही आहे. मात्र यावरून सध्या उबाठा गटात मतभेद असल्यासारखी स्थिती आहे.

संजय राऊत यांनी या एका जागेसाठी निवडणूक लढविण्याची शरद पवार यांची इच्छा असल्याचा दावा केला होता एवढेच नव्हे तर त्यांना उबाठा शिवसेना पाठिंबा देईल असेही म्हटले होते. मात्र उबाठा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ही जागा उबाठा शिवसेनेची असल्याचे सांगत संजय राऊत यांच्या दाव्यावर फुली मारली. एकप्रकारे आदित्य ठाकरे हे शरद पवारांना किंवा त्यांच्या पक्षातील कुणालाही राज्यसभेचे उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यास तयार नाहीत हे स्पष्ट दिसते.

संजय राऊत तेव्हा म्हणाले होते की, आपली शरद पवारांशी चर्चा झाली तेव्हा ते म्हणाले की, त्यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे. पण तेव्हा ती जागा शिवसेनेची आहे, असे मात्र संजय राऊत म्हणाले नव्हते. त्यामुळे उबाठा शिवसेनेकडून शरद पवारांना या जागेसाठी पाठिंबा देण्यात येणार का, असा सवाल उपस्थित होत होता.

महाराष्ट्रातून ज्या खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे त्यात शरद पवार, रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील, प्रियांका चतुर्वेदी, रजनी पाटील आणि फौजिया खान यांचा समावेश आहे. या सर्वांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपतो आहे. त्यामुळे त्यासाठी सगळीकडे तयारी सुरू आहे.
या सात जागांसाठी प्रत्येक खासदारामागे ३७ आमदारांची आवश्यकता आहे. महायुतीकडे ६ खासदार निवडून आणण्याची ताकद आहे त्यामुळे महाविकास आघाडीला एक जागा निवडून आणणे शक्य आहे. मात्र आता शरद पवार यांचे नाव एकप्रकारे उबाठाकडून तरी मागे पडले आहे.

ही जागा आमचीच असल्याचा दावा आदित्य ठाकरे करत आहेत त्यामागे त्यांच्याकडे असलेले २० आमदार आहेत, त्यामुळेच आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार असल्यामुळे आपल्याला ती एक जागा हवी असा त्यांचा हट्ट आहे. स्वाभाविकच आता उबाठा शिवसेनेतून कुणाला ही लॉटरी लागते हे पाहावे लागेल. प्रियांका चतुर्वेदी यांनाच पुन्हा ही संधी दिली जाणार का, की अन्य कुणाचे नाव त्यासाठी पुढे येईल हे पाहावे लागेल. मराठीच्या मुद्द्यावर पालिका निवडणुका लढवणारी उबाठा शिवसेना आता मराठी उमेदवार राज्यसभेत पाठवणार का, याकडेही सर्वांचे लक्ष असेल.

हे ही वाचा:

समुद्राखालील डिजिटल महामार्ग

महाकुंभसोबत ‘केरळ कुंभ’चा ‘मन की बात’मध्ये उल्लेख

आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीत तेजी

लग्नाच्या आदल्या दिवशी दोन सख्ख्या बहिणींची आत्महत्या

 

तूर्तास शरद पवार हे आजारी आहेत. दोनवेळा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या निवडणुकीसाठी उभे राहतील अशी शक्यता फारशी दिसत नाही. तरीही त्यांच्याकडून निवडणुकीला उभे राहण्याची तयारी दाखविण्यात आली तर उबाठा शिवसेना त्यांच्यासाठी त्याग करायला तयार होईल का? हा प्रश्न आहेच. सध्या तरी आदित्य ठाकरे ही जागा आमची असल्याचे म्हणत आहेत त्यामुळे शरद पवारांना त्यांच्या पक्षाचा तूर्तास पाठिंबा नाही.
शिवाय आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी विचारल्यावर त्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत शंका येऊ लागली असावी. या पक्षाने महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाशी युती केली, एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी पाठिंबा दिला, याची आठवण आदित्य ठाकरे करून देतात. सध्या महाराष्ट्रात विलिनीकरणाची चर्चाही सुरू आहे, हा मुद्दाही ते आवर्जून आपल्या बोलण्यात आणतात. २०२०मध्ये आमची एक जागा आम्ही राष्ट्रवादीला दिली होती, याचीही आठवण ते करून देतात त्यावरून आदित्य ठाकरे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षासाठी उबाठा शिवसेनेने आणखी त्याग करावा या मताचे नाहीत, हेच दिसून येते.
महाविकास आघाडीच्या सुरुवातीच्या काळातील स्थिती आता राहिलेली नाही. महाविकास आघाडीकडे तेव्हा बहुमत होते, तरीही २०२२मध्ये संजय राऊत एकीकडे जिंकले असताना संजय पवार मात्र पराभूत झाले होते आणि भाजपाचा अतिरिक्त खासदार निवडून आला होता. हे पाहता उबाठा शिवसेना आता ताकही फुंकून पिणार आहे. आदित्य ठाकरेंनीही पत्रकारांशी संवाद साधताना २०२२च्या निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला त्यावरून उबाठाला तो पराभव जिव्हारी लागल्याचे दिसते.
मात्र मधल्या मधे काँग्रेसच्याही अपेक्षा आहेत. काँग्रेसचे म्हणणे आहे की, जर उबाठा शिवसेना राज्यसभेसाठी आग्रही आहे तर मग आम्हाला विधान परिषदेची एक जागा द्या. मे मध्ये उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपुष्टात येत आहे. आता पुन्हा उद्धव ठाकरे हे त्यासाठी पुन्हा तयार आहेत का हे पाहावे लागेल. मात्र जर ते तयार नसतील तर ती जागा उबाठा शिवसेना सोडेल का आणि ती काँग्रेसला देईल का हा प्रश्न आहे. शेवटी कशासाठी तरी त्याग करावाच लागेल. मविआमधील प्रत्येक पक्षाला ही त्यागाची, बलिदानाची तयारी ठेवावी लागेल. ती तयारी करण्याची त्यांची तयारी आहे का हे बघावे लागेल. नाहीतर या तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ होईल हे स्पष्ट आहे. जे २०२२मध्ये झाले तीच स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी महाविकास आघाडीला आता बलिदानाची तयारी ठेवावी लागेल. विधान परिषदेची जागा दिलीत तर आम्ही राज्यसभेसाठी पाठिंबा देऊ असे डील काँग्रेस करू शकते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा तिघांमध्ये कमी आहेत त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी आहे. पण उबाठाने आम्हालाच राज्यसभा पण हवी आणि विधान परिषदही हवी असे म्हटले तर त्याला काँग्रेस तयार होईल का, हे पाहावे लागेल. लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा उबाठाने आपल्याकडे खेचून घेतली होती. पण त्यांचे चंद्रहार पाटील पराभूत झाले होते तर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी बाजी मारली होती. तेव्हा उबाठा शिवसेना ही सांगलीच्या जागेसाठी अडून राहिली आणि शेवटी ती जागा त्यांनीच लढविली पण विशाल पाटलांनी चंद्रहार यांना पराभूत केले. काँग्रेस तो मुद्दा विसरलेली नसेल. ही बाबच आता या राज्यसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. एका हाताने दे दुसऱ्या हाताने घे हेच तत्त्व शेवटी कामाला येईल.

संजय राऊत हे सध्या थोडे बॅकफूटवर गेलेत की काय? संजय राऊत यांची भूमिका म्हणजे उबाठा शिवसेनेची भूमिका असते. सहसा त्याला कुणी छेद देण्याचा प्रयत्न करत नाही, असेच गेल्या अनेक वर्षात दिसलेले आहे. राज्यसभेच्या जागेसाठी संजय राऊत यांनी शरद पवारांचा मुद्दा उपस्थित केला होता. पण आदित्य ठाकरेंनी तो मुद्दाच खोडून काढत त्या चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे. यावरून संजय राऊत यांना एकप्रकारे त्या मुद्द्यावरून माघार घ्यावी लागल्याचे चिन्ह दिसते. स्वीकृत नगरसेवकावरूनही संजय राऊत यांनी वारंवार आपली भूमिका मांडली होती, पण आता त्या मुद्द्यावर पत्रकारांनी त्यांना छेडल्यावर नो कॉमेंट्स असे उत्तर संजय राऊत यांनी दिले. इतक्या वर्षात संजय राऊत प्रत्येक प्रश्नावर बोललेले आहेत. पण नो कॉमेंट्स म्हणत त्यांनी प्रश्न टाळलेला नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिलेली साथ यावरून टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता स्वतः उबाठाचेच नगरसेवक भाजपासोबत चंद्रपूरमध्ये गेले. तेव्हा मनसेने टीका केली होती. आता स्वीकृत नगरसेवकाचा मुद्दा चर्चेला आहे. उद्धव ठाकरेंकडून तीन स्वीकृत नगरसेवकांपैकी एकही जागा मनसेला देण्याविषयी कोणतीही भूमिका घेतली गेलेली नाही त्यावरून संजय राऊतांना विचारल्यावर त्यांनी भूमिका व्यक्त केलेली नाही. या दोन बंधूंमध्ये मिठाचा खडा पडला आहे का याची चर्चा सुरू असताना त्याला अधिक फोडणी मिळू नये असा प्रयत्न केला जात आहे. पण प्रथमच संजय राऊत हे आपला मुद्दा रेटू शकलेले नाहीत. शरद पवारांच्या मुद्द्यावर त्यांना माघार घ्यावी लागली तर स्वीकृत नगरसेवकपदाच्या मुद्द्यावरही त्यांना गप्प राहणे भाग आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा