तुंबाड हा सिनेमा ज्यांनी पाहिला आहे, त्यांना हस्तर माहीत असणार. एका देवतेचा पुत्र, जो जगातील सगळे सोने त्याच्याकडे खेचून घेतो. जगात चांदीचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे. अक्षरश: काळाबाजार सुरू आहे. चढ्या दराने बाजारात चांदी विकली जात आहे. अमेरिकेने चांदीचा समावेश दुर्मिळ खनिजांमध्ये केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वित्त संस्था जे.पी.मॉर्गनला चांदीचा साठा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. चांदी झटपट आपल्या देशात पोहोचावी म्हणून लोकांनी जहाजांचा पर्याय तुर्तास बाजूला ठेवलेला आहे. विमानांनी चांदी आयात केली जाते आहे.
जगात सोन्या चांदीचे दर कडाडतायत. अर्थकारणाच्या दृष्टीने हे काही शुभसंकेत नाहीत. हे डॉलरच्या पतनाचे इशारे आहेत. डॉलरची माती होईल या भीतीने जगभरातील केंद्रीय बँका सोन्याची खरेदी करत आहेत. चांदीबाबत सध्या तरी हे फक्त चीन करतोय. बाकीचे जग आता कुठे जागे होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे. पी. मॉर्गन या नामांकीत वित्त संस्थेला चांदी खरेदी करण्याचे आदेश दिलेले आहेत. चांदीचा समावेश रेअर मिनरल्समध्ये केलेला आहे. कारण धोक्याची घंटा अमेरिकेच्या कानावर गेलेली आहे. लंडन मेटल एक्सचेंजमध्ये चांदीचा खडखडाट निर्माण झालेला आहे. कारण जगभरातील मेटल कमॉडीटी एक्सचेंजवर चांदीचे जे दर आहेत, त्या तुलनेत अधिक दर शांघाय एक्सजेंवर आहे. ही तफावत आठ डॉलरची आहे. जगात प्रति औंस ५० डॉलर असेल तर शांघायमध्ये ५८ डॉलर. एक औस म्हणजे साधारण ३२ ग्रॅम.
हा एकप्रकारे अधिकृत काळाबाजार आहे. सभ्य भाषेत त्याला प्रिमियम म्हणायचे एवढेच. लोकांनी सिनेमाच्या तिकीटांचा, अन्नधान्याचा, सिमेंटचा काळाबाजार पाहिला आहे. २०२५ मध्ये सोन्या चांदीचा काळाबाजार पाहायला मिळतोय. एमसीएक्स म्हणजे मल्टी कमॉडीटी एक्सचेंजवर जो भाव आहे, त्यावर अधिकचा प्रिमिअम घेऊन बाजारात विक्री सुरू आहे. चांदीची इतकी तातडी आहे की, सुमद्रमार्गे चांदी देशात आणण्या ऐवजी ती विमानाने मागवली जात आहे. प्रशांत महासागरावरून चांदीने भरलेली किती तरी विमाने चीनच्या दिशेने जात आहेत. अमेरिकी सरकार आणि माध्यमांमध्ये याबाबत प्रचंड रोष आहे. ब्लूमबर्ग आदी मीडियातून चीनवर साठेबाजीचा आरोप करत झोड उठवली जात आहे.
हे का घडतेय ते लक्षात घ्या. चांदीचा वापर ज्या ठिकाणी होतो, तिथे दुसरा कोणताही पर्याय चालत नाही. चांदीचे काही गुणधर्म त्याला जबाबदार आहेत. इलेक्ट्रीक वाहाने, सोलार पॅनलमध्ये त्याचा वापर अपरीहार्य आहे. जगाचा विचार केला तर ही निर्मिती आज सर्वाधिक प्रमाणात चीनमध्ये होते आहे. एक काळ असा होती की चांदी फक्त इलेक्ट्रॉनिक उपकरणात वापरली जायची. नंतर त्यात मोबाईलची भर पडली. परंतु, ईव्ही आणि सोलार पॅनलमध्ये वापरले जाणारे चांदीचे प्रमाण मोठे आहे. चीन हा आज घडीला ईव्ही आणि सोलार पॅनलचा सर्वात मोठा उत्पादक आहेत. टेस्लाच्या इलेक्ट्रीक कार चीनमध्ये बनतात. बीवायडी ही चीनी कंपनी या क्षेत्रात टेस्लाला टक्कर देते आहे. युरोपच्या बाजाराचा बीवायडीने कब्जा घेतला आहे. भारतात इलेक्ट्रीक कारचा प्रवेश अगदी अलिकडचा. हा वापर आता झपाट्याने वाढताना दिसतो आहे. परंतु चीनमध्ये ज्या प्रमाणात ईव्ही आणि सोलार पॅनलचे उत्पादन होते, त्याला तोड नाही. चीन जगात या क्षेत्रात नंबर वन आहे.
जगभरात चांदीचा तुटवडा आहे, परंतु मागणी वाढते आहे. चांदीचा ७० टक्के वापर इंडस्ट्रीमध्ये होतो. चीनमध्ये ही मागणी सर्वाधिक आहे. शांघाय एक्सचेंजवर चांदी चढ्या दराने खरेदी केली जाते आहे, त्याचे कारण हेच आहे. साधारण एक औंसामागे ८ डॉलर, याचा अर्थ १०० ग्रॅम चांदीसाठी चीन आज जगाच्या तुलनेत २५ डॉलर आणि किलो मागे २५० डॉलर जादा मोजतो आहे. चांदी हा त्यांच्या सोलार पॅनल आणि ईव्ही इंडस्ट्रीचा प्राण आहे. रेअर अर्थ मिनरल्स विना अमेरिकी डीफेन्स इंडस्ट्रीचे जसे धिरडे झाले तेच चांदीमुळे चीनच्या ईव्ही आणि सोलार इंडस्ट्रीच्या वाट्याला येऊ शकते. डीफेन्स आणि स्पेस इंडस्ट्रीसाठीही चांदीचे महत्व मोठे आहे. क्षेपणास्त्रे, रडार, रॉकेट, उपग्रहांमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
ज्याला जगभरात मागणी आहे, त्याचा ताबा घ्यायचा हा चीनचा स्वभावधर्म आहे, त्यामुळे चीनने चांदीची साठेबाजी करायला सुरूवात केली आहे. चांदीच्या खाणीतील पुळण विकत घेण्यातही चीन सर्वात पुढे आहे. पेरु, बोलिव्हीया आणि रशियातून चीन मोठ्या प्रमाणात चांदीची पुळण विकत घेऊन शुद्ध चांदीची निर्मिती करतो. युरोपातील देश जो दर देतायत, त्याच्या दुप्पट पैसे मोजून ही खरेदी सुरू आहे. अर्थकारण डबघाईला आलेले युरोपातील देश या स्पर्धेत चीनचा सामना करू शकत नाहीत. त्यातून चीन ज्या चांदीची निर्मिती करतो ती भारतासह अनेक देशांना निर्यात करण्या एवढी मोठी असते.
२०२२ हाँगकाँगने ३.५ अब्ज डॉलरची तर चीनेने २.५ अब्ज डॉलर किमतीची चांदी निर्यात केली. भारताने याच वर्षी आयात केलेल्या ९,५३४ टन चांदीपैकी मोठ्या प्रमाणात वाटा चीन आणि हाँगकाँगचा होता. चीनवरचे वाढचे अवलंबित्व लक्षात घेऊन भारताने चांदीच्या आयातीवर १५ टक्के कर लावला. त्यामुळे २०२३ मध्ये चांदीची आयात ३,६२५ टनापर्यंत खाली आहे. ही चांदी आपण यूएईकडून आयात केली. भारत आणि यूएईमध्ये सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (काँप्रेहेन्सिव्ह इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट) असल्यामुळे आयातदारांवर आकारण्यात आलेला कर आठ टक्क्यांवर आला.
हेही वाचा..
छत्तीसगडच्या उत्तर बस्तरमधील अबुझमाड डोंगराळ वनक्षेत्र नक्षलमुक्त!
ऑपरेशन सिंदूर आमच्या आत्मनिर्भरतेचा जिवंत पुरावा
किती टक्के भारतीय गाडी खरेदी करणार ?
एअर इंडियाच्या विमान AI171 अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची मागणी
आयातदारांवर आकारण्यात आलेले शुल्क कमी झाल्यामुळे यात कोट्यवधींचा घोटाळा झालेला आहे, असा आरोप काँग्रेसने केला. प्रशांत भूषण, सागर गोखले आदींनी ओरडा सुरू केला. अर्थात त्यात नेहमीप्रमाणे तथ्य नव्हते. यूएईशी असलेला करार आणि दुबईत कर नगण्य असल्यामुळे आपल्याला फायदा झाला होता. चीनवर असलेले अवलंबित्व आपण कमी केले होते. मोदी सरकारने जे केले ते भारताच्या हिताचे होते, चीनच्या नव्हते हेच काँग्रेसला खटकले असण्याची शक्यता आहे. चीनवर अवलंबून राहणे हे किती धोकादायक आहे, याचा अनुभव रेअर अर्थ मिनरलच्या निमित्ताने सगळे जग घेते आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, की चांदीबाबत भारताचे धोरण सजग आहे.
२०२४ मध्ये भारताने ६९९८ टन चांदी विकत घेतली. २०२५ च्या पहील्या आठ महिन्यात हे प्रमाण ३३०२ टनपर्यंत खाली आले आहे. कारण स्पष्ट आहे. जगात चांदीचे भाव कडाडले आहेत. आखाती देशांकडे जे तेलाचे साठे आहेत, ते कधी तरी संपणार आहेत, तीच स्थिती सोने आणि चांदी या धातूंची आहे. पृथ्वीच्या पोटात जे आहे, ते कधी तरी संपणार आहे. चांदीचा पुरवठा आणि मागणीत असलेली तफावत यातून ही बाब स्पष्ट होते आहे. जोपर्यंत चांदीला उद्योगजगतात पर्याय निर्माण होत नाही, तोपर्यंत चीनसारखे देश याचा फायदा उठवणार. पैशाच्या जीवावर साठेबाजी करून जगाला वेठीला धरणार. त्या दृष्टीने सरकार निश्चितपणे पावले उचलत असणार याबाबत आमच्या मनात शंका नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







