बांगलादेशात एकीकडे निवडणुकांचा माहोल आहे तर दुसरीकडे राजकीय हिंसाचारात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) मध्ये अंतर्गत कलहामुळे हिंसाचाराच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. ताज्या माहितीनुसार, ढाका विद्यापीठातील किमान तीन शिक्षकांना ढाका युनिव्हर्सिटी सेंट्रल स्टुडंट्स युनियन (डीयूसीएसयू)च्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने छळले आणि त्यांच्यावर हल्ला केला. हे तिन्ही शिक्षक अवामी लीग समर्थक शिक्षक पॅनेल “नील दल”शी संबंधित आहेत.
ही घटना गुरुवारी दुपारी विद्यापीठ परिसरात घडली, जेव्हा या शिक्षकांनी कुलगुरूंच्या कार्यालयात एक निवेदन दिले. यात वर्ग घेण्यास बंदी घालण्यात आलेल्या शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला. व्हिडिओमध्ये डीयूसीएसयूचे सोशल वेल्फेअर सेक्रेटरी ए. बी. जुबैर हे “नील दल”चे कन्व्हीनर अबुल कासिम मोहम्मद जमाल उद्दीन यांना पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रोफेसर कारमध्ये बसण्याचा प्रयत्न करत असतानाच जुबैर त्यांचा पाठलाग करताना आणि त्यांना कारमध्ये जाण्यापासून रोखताना दिसला.
हेही वाचा..
संसद हल्ला : राज्यसभेत शहीदांना नमन
ममता बॅनर्जी यांनी SIR वर पसरवला गोंधळ
‘द डेली स्टार’ला दिलेल्या माहितीत जमाल उद्दीन म्हणाले, “आम्ही कुलगुरूंच्या कार्यालयात सात मुद्यांचे निवेदन दिले होते, ज्यात वर्ग घेण्यास रोखलेल्या शिक्षकांना पुन्हा बोलावण्याची मागणी होती. त्यानंतर आम्ही शिक्षक लॉन्जमध्ये चहा घेत असताना विद्यार्थ्यांचा गट आत आला, आम्हाला फॅसिस्टांचा साथीदार म्हटले आणि आम्ही बाहेर जाऊ देणार नाही, असे सांगितले.” जमाल उद्दीन यांनी पुढे सांगितले की, हातापायांच्या धक्काबुकीदरम्यान त्यांचा स्वेटर फाडण्यात आला आणि त्यांची बॅग ज्यात चेकबुक, बँक कार्ड आणि पुस्तक होते हिसकावून घेण्यात आली. बॉटनी विभागातील आणखी एक शिक्षक अजमल हुसेन भुईयां यांनाही त्रास देण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला.
या घटनेवर ढाका विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या महासचिव जीनत हुडा यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “ढाका विद्यापीठासारख्या कॅम्पसमध्ये दिवसा ढवळ्या शिक्षकांवर अशी घटना कशी घडू शकते?” जीनत यांनाही सोशल सायन्सेस फॅकल्टी बिल्डिंगच्या लॉन्जमध्ये त्रास देण्यात आला होता. ढाका विद्यापीठ शिक्षक संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध केला असून निष्पक्ष चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली, जेणेकरून दोषींवर कारवाई होऊ शकेल.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, यापूर्वी मुहम्मद यूनुस यांच्या अंतरिम सरकारने या शिक्षकांवर गेल्या वर्षी जुलै मधील आंदोलनादरम्यान माजी पंतप्रधान शेख हसीना यांना समर्थन दिल्याचा आरोप केला होता आणि विद्यापीठातील ५० पेक्षा जास्त शिक्षकांना “अनवाँटेड” घोषित केले होते. राजकीय सूडभावनेतून विद्यापीठ प्रशासनाने या शिक्षकांना शैक्षणिक कामकाजातून निलंबित केले आणि एक “फॅक्ट-फाइंडिंग कमिटी” बनवली. परंतु अनेक महिने उलटूनही या शिक्षकांना पुन्हा वर्गात परत आणले गेले नाही. रिपोर्ट्सनुसार, यूनुस यांच्या सत्तेवर आल्यानंतर बांग्लादेशातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना विनाकारण निलंबित करण्यात आले. अंतरिम सरकारच्या कार्यकाळात बांग्लादेशातील कायदोव्यवस्था ढासळत चालली आहे. देशातील परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली असून कामकाज करण्याचे वातावरण असुरक्षित झाले आहे. राजकीय हस्तक्षेप, शिक्षणातील स्वातंत्र्यावर मर्यादा आणि मतभिन्नता व्यक्त करणाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांमुळे चिंतेत भर पडली आहे.







