थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर झालेल्या भीषण लष्करी चकमकींमुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत. या संघर्षात किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे तर एक लाखांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. गेल्या दशकात दोन आग्नेय आशियाई शेजाऱ्यांमधील दीर्घकाळापासून वादग्रस्त सीमेवरून झालेला हा सर्वात गंभीर संघर्ष आहे.
शुक्रवारी (२५ जुलै) दोन्ही देशांनी चार प्रांतांमध्ये अतिरिक्त पायदळ रेजिमेंट पाठवल्या आणि त्यांच्या लढाऊ विमानांना सज्ज ठेवले. गुरुवारी, थायलंडने कंबोडियातील सहा लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यासाठी आपली F-१६ लढाऊ विमाने तैनात केली, कारण कंबोडियाने थायलंड सीमावर्ती शहरांवर गोळीबार केला.
थायलंड आणि कंबोडियामधील सीमा तणावाचे केंद्रबिंदू असलेल्या प्राचीन ‘ता मुएन थॉम मंदिरा’जवळ सकाळी लवकर पुन्हा संघर्ष सुरू झाला. कंबोडियाने दावा केला आहे की गुरुवारी झालेल्या लढाईत चार नागरिक जखमी झाले आहेत आणि ४,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये अनेक कंबोडियन कुटुंबे सीमेवरून पायी जाताना दिसत आहेत. अनेक कुटुंबे त्यांचे सामान ट्रॅक्टरमधून तात्पुरत्या छावण्यांमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत.
एका अधिकृत निवेदनात, थायलंड सरकारने म्हटले आहे की “जर कंबोडियाने सशस्त्र हल्ला आणि थायलंडच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन सुरू ठेवले तर” ते स्वसंरक्षण उपाय तीव्र करण्यास तयार आहेत. इस्रायल आणि इराणमधील युद्धानंतर काही दिवसांतच सुरू झालेल्या या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही बाजूंना जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आणि संवादाद्वारे समस्या सोडवण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदी मालदीवमध्ये पोहोचले!
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट आणखी ६ महिन्यांसाठी वाढवली!
बलात्कार-हत्ये प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी तुरुंगाचे लोखंडी बार कापून पसार!
सिगारेट न दिल्याने पठ्ठयानी दुकानदारावर पिस्तूल रोखली, मिर्झापूर मधील घटना
दरम्यान, कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला पत्र लिहून “थायलंडची आक्रमकता” थांबवण्यासाठी तातडीने बैठक बोलावण्याची विनंती केली. शुक्रवारी एक बैठक होण्याची शक्यता आहे. थायलंडच्या आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, सुरिन प्रांतात एका मोठ्या रुग्णालयावर गोळीबार झाला आहे, हा हल्ला “युद्ध गुन्हा” मानला पाहिजे. दरम्यान, थायलंड आणि कंबोडिया त्यांच्या ८१७ किमी लांबीच्या सीमेवरील वादग्रस्त भागांवरून अनेक दशकांपासून संघर्ष करत आहेत. या वादाच्या केंद्रस्थानी ‘ता मोआन थोम’ आणि ‘प्रेह विहार’ या प्राचीन हिंदू मंदिरांच्या मालकीचा मुद्दा आहे.







