पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अदियाला जेलमध्ये हत्या झाल्याची अफवा पसरल्यानंतर देशातील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) तसेच त्यांच्या बहिणी अलीमा खान यांनी शहबाज सरकारकडे इम्रान यांची भेट घेण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. विरोधी आघाडीनं संपूर्ण देशभर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
पाकिस्तानी मीडिया आउटलेट ‘डॉन’च्या माहितीनुसार, पख्तूनख्वा मिल्ली अवामी पार्टी (पीकेएमएपी) चे अध्यक्ष महमूद अचकजई यांनी शुक्रवारी संसद भवनाबाहेर पत्रकार परिषद घेत हा इशारा दिला आहे.
अचकजई यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, सरकारने संसदेला रबर स्टॅम्प बनवले आहे आणि राष्ट्रीय सभेचे स्पीकर अयाज सादिक कुठेतरी दुसऱ्या ठिकाणाहून आदेश घेत आहेत. आदिवासी भागात लोक मारले जात आहेत, पण स्पीकर विरोधकांना या गंभीर विषयावर बोलू देत नाहीत.
हे ही वाचा:
बिहारमध्ये किती आमदार जिंकले, हे राहुल गांधींना ठाऊकच नाही?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर येतोय माहितीपट
अल- फलाह संस्थापकाचा जमीन घोटाळा; मृतांना दाखवले जमिनीचे मालक
सरकारवर हल्ला चढवत त्यांनी विचारले की इम्रान खान यांना जेलमध्ये का ठेवले आहे आणि त्यांना त्यांच्या बहिणीला किंवा पक्षाच्या नेत्यांना भेटण्याची परवानगी का दिली जात नाही? त्यांनी सांगितले, “खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अदियाला जेलबाहेर बसले आहेत, पण पीटीआयच्या संस्थापकांना भेटण्याच्या त्यांच्या विनंतीकडे कोणी लक्ष देत नाही.”
पीटीआयचे नेते असद कैसर यांनी आरोप केला की, नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांत लोकशाहीच संपवली गेली. हरिपूरमधील पोटनिवडणुकीचा निकालच बदलण्यात आला. येथून माजी विरोधी नेते उमर अय्यूब यांच्या पत्नी उमेदवार होत्या. त्यांनी आरोप केला, “फॉर्म 47 वर जो निकाल होता, तो संगणकावर बदललेल्या निकालापेक्षा वेगळा होता.”
एक दिवस आधीच इम्रान खान यांचे पुत्र कासिम खान यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून वडील जिवंत असल्याचे पुरावे मागितले होते आणि आंतरराष्ट्रीय संस्था व इंटरनॅशनल कोर्टने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती.







